करोना पश्चात आपली मुले आणि शिक्षण
- प्रकाश आल्मेडा
संपर्क : ८६००१७८८२५
करोना संपला असला तरीही त्याचे आघाती परिणाम अजून टिकून आहेत. चीनमध्ये करोना आजही वेगाने पसरत आहे आणि त्यामुळे तेथे केल्या जाणाऱ्या कडक उपाययोजनेविरुद्ध नागरीक बंड करून उठलेत. करोनाबाधितांना आरोग्यविषयक अनेक समस्यानाही सामोरे जावे लागत आहे. या लेखात आपण विद्यार्थी वर्गावर करोनाचे जे आघाती परिणाम टिकून आहेत त्यांविषयी चर्चा करणार आहोत. सगळे बऱ्यापैकी सुरळीत झाले असले तरीही शाळकरीच नव्हे तर महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनाही अध्ययन व वर्तणूकीच्या समस्या जाणवत आहेत. शिक्षकांना मुलांच्या या समस्या अजूनही जाणवतात.
करोनाच्या दोन वर्षाच्या लॉकडाऊनमुळे केवळ शिक्षणाचीच नव्हे तर शिकण्याच्या क्षमतेचीही हानी झाली आहे. मुलांची एकूण दिनचर्याच विस्कटली गेली. शिक्षकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून नवे तंत्रज्ञान आत्मसात करून शाळा नाही पण शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू ठेवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला खरा पण त्यातही अनेक अडचणी असल्याने ऑनलाइन शिक्षणाचे यशापयश संमिश्र आहे. काही अभ्यास अहवालानुसार केवळ पंधरावीस टक्केच एवढेच हे प्रमाण आहे. वर्गात शिकविण्याला पर्याय नाही हे लक्षात आले आहे. मुळात स्वाध्यायनासाठी आपली शिक्षण व्यवस्था मुलांना सुसज्ज करीत नाही. स्वाध्यायनासाठी आवश्यक क्षमता विकसीत केल्या जात नाहीत.
खरेतर सगळे शिकणे हे स्वाध्यायनच असते. मात्र त्यासाठी काही अनुबोधात्मक (कॉग्निटीव्ह) क्षमता लागतात. भाषा, विचारशक्ती, तार्किक बुद्धी, लेखन वाचन, मनन चिंतन, अभिव्यक्ती अशा क्षमता किमान स्तरापर्यंत विकसीत व्हायला हव्यात. करोनाकाळात मुलांना कॉग्निटिव्हा डॅमेजला सामोरे जावे लागले. त्याचे परिणाम अजूनही टिकून आहेत आणि ही चिंताजनक आणि केवळ गमाविलेला अभ्यास भरून काढण्याच्या पलिकडे जाऊन जी हानी झाली आहे त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा भाग आहे.
आज ज्ञानरचनावादावर भर आहे ज्यात विद्यार्थी स्वतः शिकून स्वतःच्या ज्ञानाची रचना करील अशी धारणा आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थी सक्षम असायला हवा. मुळात पाठयपुस्तक (जे केवळ टेक्स्टबुकच नव्हे तर अनेक अर्थाने कोर्स बुक आहे) हाताशी असतानाही अनेक विद्यार्थी स्वाध्यायनात कमी पडतात. सगळेच शिकवावे लागते आणि शिकणे म्हणजे परीक्षेची तयारी करणे असा सगळा मामला असल्याने स्वाध्यायनाची बैठक व क्षमता विकसीत होत नाही. त्यात दूरस्थ पद्धतीने शिकणे शाळकरी मुलांसाठी मुळातच अवघड. दूरस्थ पद्धत वयस्क लोकांसाठी, किमान शिक्षण व त्यातून स्वाध्यायनक्षमता विकसीत झालेल्यांसाठी आहे. अगदी पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्यायन तेही ऑनलाइन स्क्रिनच्या माध्यमातून करायचा प्रयत्न झाला. प्राप्त परिस्थितीत त्याला दुसरा पर्यायही नव्हता. मात्र यात व्हिडीओ जास्त झाला आणि वाचन व लेखन कमी झाले. मुले पॅसिव्ह लर्नर झाली.
अनेकांना आता एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे अवघड जाते. व्यवधान नाही, मुले पटकन विचलीत होतात. एकाग्रता नाही, लिहीण्या-वाचण्याची क्षमता कमी झाली आहे, मुलांमध्ये आक्रमकता वाढली आहे, सगळयांशी मिळून मिसळून राहाणे अजूनही अवघड जाते, भाषेचा विकास खोळंबल्याने अनेक बौद्धीक क्षमता विकसीत होण्यावर परिणाम झाला आहे. अभ्यासात लक्ष नाही, मोबाइल हातातून सुटत नाही, मोबाईलने मुले इम्मोबाइल झालेत जणू ! दिवसाचे धड वेळापत्रक नाही, आळस जात नाही. मुले स्वयंप्रेरित नाहीत, स्लो झालीत, सुस्तावलीत, पालकांचे, शिक्षकाचे ऐकत नाहीत, सगळे काही मोबाईलच्या स्क्रिनभोवती अडकलय… अशा अनेक तक्रारी अजूनही आहेत. अर्थात मुलांच्या शिकण्याविषयीच्या व वर्तणूकीच्या या अशा समस्या याआधीही होत्याच मात्र आता वर्तणूकीच्या समस्यांमुळे अडचणी वाढल्या आहेत अशा पालकांच्या तक्रारी आहेत.
एकूण करोनाकाळामुळे मुलांची विपरीत जडणघडण झालीय. या काळात मुलांचीही होरपळ झाली. घरात कोंडल्याचे दुष्परिणाम झालेच. घरची आर्थिक स्थिती काय आहे, समस्या काय आहेत याची वेदनाप्राय जाणिव झाली. नातेसंबंधांचे दाहक चित्र त्यांना अनुभवायला मिळाले. अनेक हुशार व मेहनती मुलांनी आर्थिक स्थितीची जाणिव झाल्याने व पालकांच्या हतबलतेचे भान आल्याने मोठेपणी डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए वगैरे होण्याच्या महत्त्वाकांक्षा सोडून दिल्याचे लक्षात येते. अनेकांना शाळा सोडाव्या लागल्या, गावी परतावे लागले, परवडत नसल्याने सवंगडी सोडून सरकारी शाळांत जावे लागले. मुलींना करोनाचा मोठा फटका बसला आहे. अनेक शिक्षकांकडून व्यथित करणारे अनुभव ऐकायला मिळतात. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा लागत नाही. अनेक शाळकरी मुलीची लहान वयात थेट लग्न झाल्याची, त्यांचे शिक्षण संपल्याचीही प्रकरणे ऐकायला मिळतात. शिक्षकांना “समुपदेशक शिक्षक” व्हावे लागले. आजही शिक्षकांना मुलांना त्यांच्या चिंताजनक समस्यांविषयी समुपदेशन करावे लागत आहे.
सुस्थितीत असलेल्या घरातही अजून करोनाचे दुष्परिणाम टिकून आहेत. मुले थेट आठवीतून बारावीत आणि बारावीतून थेट पदवीच्या शेवटच्या वर्षात गेली. वागावे कसे याविषयीही गोंधळ झाला. त्यामुळे अभ्यासाविषयीच्या समस्या झाल्या तशाच वर्तणूकच्याही. जो मोबाईल मुलांच्या हातून काढण्यासाठी सगळी धडपड होत होती तोच मोबाईल ऑनलाइन शिकण्यासाठी त्याच्या हाती द्यावा लागला आणि तो दिवसभराचा सोबती झाला. आता त्यापासून वेगळे होणे अवघडच होत आहे. करोनाकाळात मुलांचे स्वतःचे असे “ऑनलाइन लाइफ’ तयार झाले. त्यांना अनेक गोष्टींचा शोध लागला, नवी तंत्रे कळली, नको त्या गोष्टीचा परिचय झाला. आता सगळे सुरळीत झाले असले तरिही अनेक मुलांचा स्वतःचा असा “मोबाइल टाइम” व स्वतःचे “ऑनलाइन लाइफ” असा प्रकार दिसून येतो. मोबाइल दिला नाही तर मुले आक्रमक होत असल्याच्या मुलांमध्ये एक बेदरकार बेफिकीरी निर्माण झाल्याच्या पालकांच्या तक्रारी दिसून येतात. ज्या मुलांना विविध अक्षमता होत्या अशा दिव्यांग मुलांना तर खूप सोसावे लागले. त्यांची अपार होरपळ झाली.
या लेखात आपण पालकांनी लक्षात घ्याव्यात अशा काही बाबी विचारात घेऊ या.
पालक म्हणून करोनाने आपली दाणादाण उडविली. आठवडयात वा महिन्याभरात सगळे सुरळीत होईल असे वाटत असताना करोना किती काळ घरात डांबून ठेवील याचा अंदाजच आला नाही. सगळेच भेलकांडले. मोठया लोकांच्या मोठया समस्या निर्माण झाल्या. जिवंत राहाणे सगळ्यात महत्त्वाचे ठरले. अशा अचानक उद्भवलेल्या जगण्याचा ना अनुभव होता ना कसले प्रशिक्षण होते. महामारीविषयी आपण केवळ ऐकून होतो. अनेकांची अटळपणे वाताहात झाली. सगळी घडी विस्कटली. अनेकांना सावरता आले नाही. पालकांच्या समस्या होत्या तशा मुलांच्याही होत्या पण त्या करोना काळात मुलांच्या समस्यांकडे, गरजांकडे लक्ष देता आले नाही. त्यांना सुरक्षित ठेवण्यावर सगळा भर होता. पोस्ट ट्रॉमा डिसोर्डरसारख्या काही डिप्रेशनवजा समस्या दिसून येत आहेत. त्यांवर मात करून मुलांना परत शिकण्याच्या वर्तणूकीच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी पालकांनी काही बाबी लक्षात घेऊन काही बदल करायला हवेत. आता तर सगळेच ठाकठिक आहे अशा भ्रमात राहू नये.
करोनाने मुलामध्ये एक प्रकारचा अकाली प्रौढपणा आला. मुलीवर अधिक परिणाम झाले. करोनाचा आघाती परिणाम हा दुसऱ्या महायुद्धापेक्षाही अधिक आहे असे काही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पालकांना घर जणू विषाणूपासूनच नव्हे तर इतर अनेक बाबींपासून सॅनीटाइझ करावे लागत आहे. नव्याने वर्तणूकीची जडणघडण करावी लागत आहे. करोनाकाळात वेळापत्रक असा फारसा प्रकार राहिला नव्हता. घराबाहेर पाऊलही टाकता येत नाही तेव्हा मुलांनी पूर्वीसारखे वेळेवर वगैरे उठून तरी काय करायचे असा पालकाचा प्रश्न होता. त्यामुळे नियोजनबद्ध दिवस असा प्रकार राहिला नसल्याने एक सुस्तावलेपणा आलाच. लवकर उठून करायचे तरी काय, जायचे कोठे, वाचायचे तरी काय, टिव्ही तरी किती बघायचा हे प्रश्न होते. मुलांनाही अभ्यासाविषयी जबाबदारी व उत्तरदायित्त्व पहिल्यासारखे उरले नसल्याने “चाललेय आपले, चलता है, सगळ्यांचेच असेच तर चाललेय” असा प्रकार सार्वत्रिक झाल्याने सुस्ती सगळयात मुरून गेला. सगळेच मरगळले, सुस्तावले, मंदावले. आणि सगळ्यांचेच असे असल्याने, सगळेच एकाच बोटीत असल्याने आपल्याकडलेच फार काही वाईट आहे असे वाटेनासे झाले.
मुलांनी किती वाजता उठायचे, झोपायचे, कधी काय करायचे, काय करायचे नाही. किती वेळ काही करायचे याचा काही नेमच उरला नाही. त्यातून मुलांच्या वर्तणूकीची घडी विस्कटत गेली ज्याचा परिणाम अभ्यासावर व एकूण व्यक्तीमत्त्वावर होणारच होता. हे सगळे किती काळ चालेल याचीही निश्चित कल्पना नव्हती. आजूबाजूला करोनाला बळी पडलेल्याच्या बातम्या धडकी भरवित होत्या. आर्थिक विवंचना लपविता येत नव्हत्या. हे सगळे दुःस्वप्नासारखे मागे पडले असले तरिही सगळेच मागे पडलेले नाही.
आता परत पालकांना मुलांना “वेळच्या वेळी उठणे व नियमित वेळच्या वेळी आवश्यक ते करणे” याकडे वळावे लागेल. काही मुलांना अजूनही यात समस्या आहेत. पालकांनी आरडाओरडा, आक्रस्ताळेपणा न करता मुलांना अजूनही अडचणी आहेत हे लक्षात घेऊन हलक्या हाताने शिक्षकांशी बोलून या समस्या सोडवायला हव्यात. मुलांना पालकाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. पालकानी सातत्याने शिक्षकांच्या संपर्कात राहून मुलांच्या वर्तणूकीच्या व शिकण्यातील समस्या, त्यातील बदल व त्यानुसार घरात बदल करायला हवेत. जी मुले प्राथमिक स्तरावर होती त्यांना एकदम शाळेच्या शिस्तबद्ध वातावरणात येताना त्रास झाला, अनेकांना आजही शाळेत जावेसे वाटत नाही आईबाबांची सवय झालीय. शाळेतही खूप कडक शिस्त असल्याचा अनेक विद्यार्थ्यांना, विशेषतः लहान मुलांना त्रास झाला. मुलांना शाळेत रूळविण्यासाठी शिक्षकाना सगळेच उद्व्याप करावे लागले. त्यात करोनाचा धोका असल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांचेही दडपण होते.
आता पालकानी “मूल असत कसं वाढतं कसं आणि शिकतं कसं” या तीन बाबी समजून घेतल्या पाहिजेत. मुलांचे शिक्षण केवळ शाळा व शिक्षकांवर (आणि महागडया टयुशन क्लासेसवर) सोडून चालणार नाही. कधी नव्हे इतकी पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रियरित्या सहभागी व्हायची गरज आहे. आमच्याकडे समुपदेशनासाठी मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांची एक तक्रार असते ती म्हणजे मुलांना अभ्यासात रस नाही. मोबाइल हातचा सुटत नाही, वाचन लेखनात अडचणी आहेत, एकाग्रता नाही. सतत विचलीत होतात, कितीही बोलले, समजाविले तरीही ढिम्मच असतात.
पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांनाही काहिशा समुपदेशकाच्या भूमिकेत शिरावे लागेल. घरी अभ्यासाचे वातावरण तयार करावे लागेल. मुले चुकली तर आक्रस्ताळेपणा न करता त्यांना भावनिकदृष्टया सुरक्षित वातावरण द्यावे लागेल. मुलांच्या अडचणी नेमक्या काय आहेत हे समजून घ्यावे लागेल. “एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा अध्ययनकर्ता” म्हणून स्वतःच्या मुलाकडे पहावे लागेल, त्याला समजून घ्यावे लागेल. त्यांच्या मनातील भीती असुरक्षिततेची भावना समजून घ्यावी लागेल. मुले बदललीत हे वास्तव स्विकारावे लागेल. मुलांची तुलना करणे चुकीचे आहे. कोणतीही दोन मुले एकाच पद्धतीने शिकत नाहीत, मुलांतील राजहंस वेळीच ओळखायला हवा, त्यातील वेगळे कलागुण व इतर विशिष्ट क्षमता समजून घ्यायला हव्यात; त्याचे कौतुक करायला हवे.
शिकणे म्हणजे केवळ परीक्षेची तंत्रबद्ध तयारी करून भरपूर गुण मिळविणे एवढेच नाही. क्षमता, कौशल्य, संवेदना, भावनिक बुद्धीमत्ता व विविध अनुबोधात्मक क्षमता विकसीत करीत एकूण व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर हवा. आपले मुल कोणापेक्षा ना श्रेष्ठ आहे ना कनिष्ठ आहे; आपले मुल वेगळे आहे आणि इतर मुले वेगळी आहेत. प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. मुलांना अनकंडीशनली ते आहेत तसेच स्विकारून त्यांची जडणघडण करायला हवी, कालच्यापेक्षा आज अधिक उत्तम होण्यासाठी त्यांची स्वतःशीच स्पर्धा लावायला हवी. पालकांना आपले मुल झटपट आइनस्टाइन व्हायला हवे असते, इतरापेक्षा एक टक्क्का तरी मार्क्स अधिक काढणारे हवे असते. अपेक्षित प्रश्न आणि अपेक्षित उत्तर असा परिक्षार्थी मामला करणे म्हणजे शिक्षण खचीतच नव्हे. आपल्या परीक्षा पद्धतीने शिक्षणाची अपार हानी केली आहे, शिक्षण आणि शिक्षकाचे मोठे अवमुल्यन केले आहे. शिकणे म्हणजे केवळ परीक्षेसाठी सज्ज होणे एवढेच नव्हे. ज्ञानाचे सर्जनशील उपयोजन करणे महत्त्वाचे आहे. एकात्मिक विकास हे शिक्षणाचे मर्म पालकांनी समजून घ्यायला हवे.
आज मेंदू आधारित शिक्षणाच्या जमान्यात शिकणं म्हणजे नेमके काय आणि पालक म्हणून केवळ “मार्क्सवादी” न होता आपल्याला काय सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका आहे, आपले मुल कसे शिकते, त्याची अध्ययनाची पद्धत वा लर्निंग स्टाइल कशी आहे अशा विविध बाबी पालकानी विचारात घ्यायला हव्यात, समजून घ्यायला हव्यात. घाई न करता मुलांच्या कालाने घ्यायला हवे. मग लक्षात येईल की मुलांना उत्तम भाषा देण्याची एक महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे. पालक भाषाशिक्षकही असतात. घरात भाषासमृद्ध वातावरण निर्माण करणे, वाचनाची गोडी लावणे यावर भर हवा पालक एकावेळी चारपाचशे रुपये मुलांना आइसक्रिम खायला खर्च करतील पण एक चांगली डिक्शनरी घेताना का कू करताना दिसतात. करोना काळात मुलांचे भाषाशिक्षण खोळंबले आणि त्याचा विपरित परिणाम त्यांच्या बुद्धीक्षमता विकासावर व एकूण शिक्षण्याच्या क्षमतेवर झाला.
भाषाविकास व बुद्धीचा विकास हातात हात घालून जातो. इंग्रजी माध्यमात शिकणे वेगळे व इंग्रजी भाषा शिकणे वेगळे. मुलांचा शब्दसंग्रह व एकूण भाषिक जाण तोकडी असल्याचे दिसून येते आणि त्यामुळे विचारशक्तीचा विकास व अभिव्यक्ती तोकडी राहात असल्याचे दिसते. जे कळत नाही ते मुले घोकमपटटी करतात. जे कळते तेच लक्षात राहाते. अनेक पालकांना मुलांच्या स्मरणशक्तीविषयी चिंता वाटते, अभ्यास करतो मात्र विसरतो अशी तक्रार असते. मुले स्लो लर्नर तर नाहीत ना अशी भीती वाटते. अनेकदा आमच्या लक्षात येते की मुलांच्या स्मरणशक्तीच नव्हे तर एकूण शिकण्याच्या क्षमतेचीच हानी भाषा तोकडी राहील्याने असल्याचे लक्षात येते. त्यामुळे पालकांनी मुलांना उत्तम भाषा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पालकांची भाषा उत्तम असेल तर पहिले लाभार्थी मुले असायला हवीत. उत्तम भाषा ही पालक मुलांना आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी देऊ शकतील. त्यासाठी जाणिवपूर्वक उपाय करायला हवेत. आपल्याकडे पालक मुले नववीला गेल्यावर फाडकन मुलांच्या शिक्षणाविषयी जागे होतात, मग टिव्ही बंद, मोबाइल बंद घरात बोर्डाच्या परीक्षेमुळे तंग वातावरण असे प्रकार होतात आणि मग महागडे क्लासेस, टेस्ट सिरीज यांचा मारा सुरू होऊन “कितना लाया ?” अशा चौकशा सुरू होतात. मुलांनी कोणत्या क्षेत्रात जावे, त्यांच्या क्षमता काय आहेत. व्यक्तिमत्त्व काय आहे याचा विचार न करता केवळ बोर्डाच्या मार्कलिस्टवर आधारित करीअरचे क्षेत्र निवडले जाते. सचिन तेंडुलकरला चार्टड अकाऊंटंट करण्याचा वा लता मंगेशकरांना अर्थतज्ज्ञ करायला जाण्याचा प्रकार असतो.
अनेक पालकांना समुपदेशनावेळी मुलांच्या मार्कलिस्टच्या पलिकडे मुलांची, त्यांच्या क्षमतांची व व्यक्तिमत्त्वाची, आवडनिवडीची, मानसिक कलाची फारशी माहिती नसते असे दिसते. त्यामुळे “प्रॉब्लम चिल्डन असतात त्याहून जास्त प्रॉब्लम पेरंटस् असतात” असे दुःखाने म्हणावेसे वाटते. मुलांना ऐशी टक्क्याहून जास्त गुण मिळाले की सायन्स, त्याहून कमी तर कॉमर्स, त्याहून कमी तर आर्टस व त्याहून कमी तर आयटीआय वा एमसीव्हीसी असा ढोबळ मामला असतो. यावर्षी तब्बल दहावीला बोर्डात शभर मुंबईत अठठयाण्णव टक्के काढणारेही आर्टसला जातात, मेडीकल व इंजिनिअरींगच्या पलिकडेही करीअरची उत्तम क्षेत्रे आहेत हे लक्षात घेतले जात नाही. कितीतरी डॉक्टर्स व इंजिनीअरर्स त्याचे क्षेत्र सोडून संगीत, नाटक अशा भलत्या क्षेत्रात रमल्याचे दिसतात.
बोर्डाने शहाणपणाने मेरीट लिस्ट हा प्रकारच बंद केला हे समजून घ्यायला हवे. मुलांनी नव्वद टक्केच्या वर गुण काढावेत पण ते कशासाठी याचे भान नसते. मुलांकडे त्यांच्या अभ्यासाला, कष्टाला, व्यासंगाला दिशा देणारा “व्हाय” नसतो आणि मन “हाऊ” साठी ते भरकटत असतात. मुलांना शॉपिंगसाठी नेणारे पालक अनेकदा सांगूनही आयआयटीत टेकफेस्ट असतो, नेहरू सेंटरला अनेक उपक्रम असतात त्यांना मात्र मुलांना घेऊन जायला, विविध क्षेत्रांचे, शिक्षणसंस्थाचे एक्सपोजर द्यायला मात्र टाळाटाळ करतात. मुलांना खूप आधीपासून समजून घेऊन करीअरसाठी तयार करणे हा एका स्वतंत्र लेखाचा वा विशेषांकाचा विषय आहे.
कोविडकाळात केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण २०२० जाहीर केले. जागरूक पालकांनी शिक्षण क्षेत्रात झालेले व होणारे बदल समजून घेतले पाहिजेत. बदल समजून घेतले तरच त्याचा लाभ घेता येतो अन्यथा निवडी चुकण्याची मोठीच दिर्घकालिन मारक किंमत द्यावी लागते. शैक्षणिक आकृतीबंधातील बदल, नव्या क्षेत्रांचा उदय, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, ज्ञानाधिष्ठित जागतिक अर्थवव्यवस्थेचा उदय, त्यातील संधी व आव्हाने, उच्च अध्ययनक्षमता शालेय जिवनातच विकसीत करण्यावर भर देणे, बदलत्या स्थितीला योग्य व समर्थ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज करते ते शिक्षण अशा अनेक अशा अनेक बाबी पालकांनी समजून घ्यायला हव्यात. अर्थव्यवस्थेतील बदल समजून घ्यायला हवेत. सेवाक्षेत्राचे प्राबल्य असणाऱ्या मुंबईत तुमची मुले हातांनी नव्हे तर डोक्याने काम करतील हे लक्षात घ्यायला हवे.
करोनापश्चात आता पालकांनी मुलांच्या मानसीक स्वास्थाकडेही लक्ष द्यायला हवे. मुले सगळच सांगत नाहीत आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पालकांना तीव्र धक्का बसून धावाधाव सुरू होते. मानसिक स्वास्थ हा एक ‘टिकींग बॉम्ब, एक सुनामी” आहे हे पालकानी लक्षात घ्यायला हवे. अर्थात हा ही एक मोठा स्वतंत्र विषय आहेच. माध्यमांचा मारा, काहितरी हटके चॅलेंजिंग करण्याची स्वतःच्या आयडेंटटीच्या शोधात असेलेली मुले, यावरील हानिकारक गोष्टी, मुलांना गिऱ्हाईक करण्यासाठी टपलेले व सापळे लावून बसलेली मंडळी, संस्काराचा अभाव, मनाची मशागत करणाऱ्या वाचनाचा सोशल मिडीयाच्या झाकोळातील अभाव. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, पालकांनी बदललेल्या प्रतिष्ठा, यश व सुखाच्या कल्पना, बदलते नातेसंबंध त्यात लवकर वयात येणारी हार्मोनल बदलांच्या वादळात सापडलेली व वेळीच मार्गदर्शन व आवश्यक ते सेक्स काऊन्सेलींग योग्य मार्गाने न मिळाल्याने भरकटलेली तरुणाई, त्यातून धक्का देणाऱ्या, सुन्न करणाऱ्या घटना; आपल्या मुलांचे सगळे आलबेल आहे. शिस्तीत आहे अशा भ्रमात असणारे आणि समस्या दिसल्या तरिही दुर्लक्ष करणारे पालक… चिंताजनक परिस्थिती आहे.
आपली मुले आपल्या लहानपणावेळच्या व तारूण्यावेळच्या परिस्थितीहून वेगळयाच नव्हे तर भलत्याच परिस्थितीत असल्याने बारकाईने लक्ष हवे. योग्य निवडी करण्याची क्षमता देते ते शिक्षण अशी जर शिक्षणाची व्याख्या केली तर आपले शिक्षण नक्की काय, कोठे व कसे आहे हे प्रश्न जाचक ठरतात. पालकानी जागृत होणे आवश्यक आहे. मुलांचे चालक व होता पालकांनी मित्र व्हायला हवे. करीअरची दिशा ठरविण्यासाठी त्यांच्याशी हातमिळवणी करायला हवी.
मुलांना जर ध्येय गवसले तर ते त्याची ओनरशीप घेतात, स्वयंप्रेरित होऊन आपल्या आदर्शाने भारावून अधिक मेहनत करतात आणि नकळत योग्य दिशेने जातात. त्यासाठी पालकांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा परिचय मुलांना द्यायला हवा. काहीतरी वेगळे करतोय या भावनेसाठी सरसकट कोडींग, रोबोटिक्स वगैरे उपक्रमाचा रतीब घालण्याऐवजी मुलांचे वाचन, स्वतंत्र विचारशक्ती, अभिव्यक्ती आत्मभान अशा बाबी विकसीत करण्यावर भर द्यायला हवा. मुलांनी शालेय जीवनात वाचावीत अशी अनेक पुस्तके आहेत. वाचणाऱ्या पालकांची मुलेही वाचन करतात. वाचते घर हे नेहमी शिकते व समृद्ध होणारे घर असते. उत्तम वेबसाइटस आहेत जेथे शासनाने सुरू केलेले उत्तम उपक्रम आहेत. पालकमुलांसोबत विविध मोफत असलेले इलर्निंग कोर्सेस करू शकतील एखादी विदेशी भाषा स्टडीबडी होऊन मुलाबरोवर व त्यांच्या मदतीने शिकू शक्तील. आपले मूल कसे शिकते हे कळेल. पालकानी मुलांना उत्तम मित्र मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. आपल्या मुलांवर प्रभाव टाकणारे मित्र कोण आहेत हे ठाऊक असायला हवेत. त्यांच्या सगळया मित्रांची खेळकरपणे माहिती हवी मात्र पोलीसींग करू नये. मुले ऑनलाइन काय करतात याकडे लक्ष हवेच. आवश्यक स्वातंत्र्य हा शिस्तीचा भाग हवा.
आमच्याकडे अध्ययन अक्षमताग्रस्त विद्यार्थी येतात तेव्हा त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत, काय करायला हवे याविषयी पालक अनभिज्ञ असतात. गतीमंद व मतीमंद यातील फरकही समजून घेतला जात नाही. मुलांना वाचनदोष, लेखनदोष, गणनदोष, अतिचंचलता अशा अक्षमता असल्यास वेळीच हस्तक्षेप व उपाययोजना न करता आणखी एक क्लासेस लावले जातात. मुळात या अक्षमता वेळीच लक्षात घेतल्या जात नसल्याने मुलांना त्याची मोठीच किंमत द्यावी लागते. म्हणूनच पालकांनी शिक्षण हे कुटुंबाचे शाळाकॉलेज बरोबर असलेले एक “जॉइन्ट व्हेंचर” आहे हे लक्षात घेऊन शिक्षकाच्या संपर्कात राहून सजग असायला हवे. अनेक पालकांचा शाळेपेक्षा टयुशन क्लासच्या शिक्षकावर मोठा विश्वास असल्याचे चित्र दिसून येते. मुलांना करोना पश्चातच्या काळात अध्ययनात समस्या येत असल्यास त्वरीत निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजना करायला हव्यात. अनेकदा शाळा करीत असलेल्या उपायांना पालकांची साथ मिळत नसल्याचे दिसते. वसईत अध्ययन अक्षमताग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणिय असून ते वाढत असल्याचे आमचे निरीक्षण आहे.
करोनाने मोठ्यांच्याच नव्हे तर शाळेत जाऊ लागलेल्या मुलापासून ते महाविद्यालयिन मुलांसाठीही समस्या निर्माण केल्या आहेत. त्यातून आपली मुले सावरू लागली असली तरिही सगळेच दुष्परिणाम संपलेले नसून अनेक समस्या अजूनही टिकून आहेत. पालकानी सगळे आता आलबेल असा समज करून न घेता शिक्षकांशी चर्चा करून मुलांच्या बौद्धीक व भावनीक स्थितीचा आढावा घ्यायला हवा. त्यांना चकामधून शिकू द्यावे. अध्ययनात येणारे अडसर समजून मुलांना शिकण्यासाठी सुसज्ज करण्यासाठी आवश्यक ते बदल (अगदी स्वतःपासून सूरूवात करून) करायला हवेत.
करोनाची काळी सावली खूप मोठी आणि लांबवर गेलेली होती. करोनाचा मोठा धडा हाच आहे की स्वतःला खूप सुरक्षित समजणे हे खचीतच धोक्याचे आहे. सावध राहायला हवेच. रात्र अजूनही वैऱ्याचीच आहे.
(लेखक करीअर समुपदेशक तसेच अध्ययनक्षमता विकास क्षेत्रात मार्गदर्शक आहेत. संपर्क : ८६००१७८८२५. इमेलः almeida.prakash@gmail.com)