करशील जे…. – बर्नड लोपीस

करशील जे….

  • बर्नड लोपीस, आगाशी

         रात्री दिड दोनचा सुमार. तो निर्जन रस्त्यावरून अनवाणी चालत होता, कपडे मळलेले, केस विस्कटलेले, कुठून निघालो कुठे जाणार आहोत याचं भान नसलेला तो जीव उपाशीपोटी फिरत होता.

         अवघ्या विसाव्या वर्षाच्या वयात त्याची ही अशी अवस्था झाली होती. बारावी झाल्यानंतर केवळ आपण आयपीएसची परीक्षा द्यावी व चांगली नोकरी करून आपल्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवावे ते स्वप्न पाहत तो रात्रीचा दिवस करत होता. चार भावंडात तो मधला,  दोन लहान असलेली भावंडे शाळेत शिकत होती. बाप नोकरी करत होता पण पोरांपेक्षा त्याचं लक्ष छानछोकीवर जास्त होते. पगाराची चौथा हिस्सा रक्कम सुद्धा घरात येत नव्हती. आईसोबत भावंडे एकमेकांना आधार देऊन तुटपुंज्या पैशात जगत होती परंतु छंदिफंदी बापाला मात्र त्याची तमा नव्हती.

         आपल्या कुटुंबाचा गाडा आपल्यालाच चालवायला लागणार आहे याची जाणीव मुलांना झाली होती. आपल्याला पुढे कसंही करुन आयपीएस अधिकारी बनायचंय हे ध्येय घेऊन तो झपाटून अभ्यास करत होता. पण दैवगती वेगळीच होती.

         रोज भल्या पहाटे उठून घरकामात गुंतणारी आई अचानक एक दिवस ऊठलीच नाही. तीचे प्राणपाखरू झोपेतच उडून गेले होते….

         रात्री खूप उशिरा दारू पिऊन आलेला बाप अजून जागाही झाला नव्हता… शिवमच्या भोवती संबंध घर गरागरा फिरू लागले….

         माणूस इतका निष्ठूर कसा असू शकतो या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या पौगंडावस्थेतील मनाला मिळत नव्हते…

         आईच्या चितेत उडी घेऊन डोक्यात भिरभिरणारा भुंगा कायमचा जाळून टाकावा अशी अवस्था झाली होती. आईच्या चितेच्या प्रकाशात त्याचं विश्व मात्र अंधारून गेले.

         रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेडातही एरव्ही रहदारीने भरलेला तो रस्ता सुनसान  होता. चालता चालता त्याची नजर एका ठिकाणी खिळली. ती एक लहानसे ऊघडे मंदिर होते… आत एका क्रूसावर येशूची मुर्ती होती, खाली स्वच्छ शुभ्र टाईल्स लावलेल्या दिसत होत्या. तो नकळत तेथे वळला. तीन बाजुला तीनचार फूट उंच स्टीलच्या ग्रील असलेल्या त्या मंदिराचा लहानसा जाळीचा दरवाजा लोटून तो आत गेला. क्रुसावरील तो पुनरुत्थानाचे प्रतिक असलेला अतिशय दयार्द नजरेचा येशू, दोन्ही बाहू पसरून जणू आपल्याला कवेत घेण्यासाठी उभा असल्याचा त्याला भास झाला….

         त्याने त्याला मिठी मारली व तत्क्षणी ती इमाज चक्क जणू जिवंत होऊन क्रूसावरून त्याच्या मिठीत आली. तो क्षणभर गांगरून गेला.. अनवधानाने त्याने हात सोडले व फायबरची फक्त एक खिळ्यावर भिंतीवरच्या घड्याळासारखी अडकवून ठेवलेली ती इमाज खालच्या फरशीवर पडून तुटली… तो ते पहातच उभा राहिला..

         अपरात्री झालेल्या आवाजाने शेजारच्या दुकानात झोपलेले कामगारही जागे झाले. बाहेर येऊन पाहतात तो येशूच्या इमाजीचे हात तुटलेले व जवळच एक मुलगा तेथे शांतपणे उभा होता. घटना चक्रावून टाकणारी होती. प्रसंग गंभीर वळण घेऊ शकत होता. त्यांनी फोन करून आपल्या मालकाला हकीकत कळवली.

         गावाच्या सार्वजनिक प्रार्थनेचे ते ठिकाण असल्याने त्याने दोन-चार तरूणांना उठवले, वस्तुस्थिती सांगितली व त्यांना सोबतीला घेऊन घटनास्थळी आला…

         आपल्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू घेऊन आलेल्याला चा़ंगला चोप दिला पाहिजे अशा मनोभूमिकेतून आलेले ते चारपाच तरूण समोरचे दृश्य पाहून चक्रावले…

         तो तरुण मुलगा येशूचे तुटलेले हात हातात घेउन शांत बसून होता. गावातील तरुणांनी सारी चौकशी केली. आश्चर्याची गोष्ट तो असंबद्ध उत्तरे देखील अतिशय शांतपणे देत होता.

         आपल्या हातून काही चूक झाली असावी. या परक्या ठिकाणी आपल्याला मारहाण होईल वगैरे भीतीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. तो या जगात वावरतच नसावा हे लक्षात येत होते.

         मात्र कुठून आला हे सांगताना  तो दोन तीन मोबाईल नंबर सहज बोलून गेला… स्वतःच्या आधारकार्डाचा नंबर सांगणारा हा मुलगा मनोरूग्ण झालेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मिळालेल्या मोबाईल नंबरवर फोन लावताच पलिकडून एक पोरसवदा आवाज आला…

         उत्तरप्रदेशातील एका खेडेगावात राहणारा अभ्यासात अतिशय हुशार असलेला हा मुलगा शिवम पाठक होता. भ्रमिष्ट होऊन दोन महिन्यांपूर्वीच घरातून निघून गेला होता. त्याला  शोधण्यासाठी त्याचा एक भाऊ मुंबईच्या कानाकोपऱ्यात वणवण भटकत होता. या महासागरात त्याला शोधणं जवळजवळ अशक्यच होते. मामला वाटला त्याहूनही अधिक गंभीर होता.

         सोपस्कार व खबरदारी म्हणून पोलिसांना त्वरित कळविण्यात आले… तोवर मुंबईला पहिल्या गाडीने जाणारी फुल वाली मंडळी, फर्स्ट शिफ्टचे कामगार यांना ही गोष्ट जाता वरवर समजली व बघता बघता ती षटकर्णी झाली…

         येथे गावातील त्या समंजस तरुणांनी मात्र येशूचे तुटलेले इमाज उचलून आपल्या कारमध्ये ठेवले‌ व या मानसिक धक्का बसलेल्या मुलाचा सकाळपर्यंत सांभाळ व्हावा म्हणून त्या मुलाला पोलिसांकडे ठेवले. रात्रीच कल्पना देऊन सकाळी मुंबईहून बोलावण्यात आलेल्या भावाकडे रितसर चौकशी करून सुपूर्द केले व विषय संपवला.

         पण शेवटी गावच ते. सकाळपर्यंत ही बातमी पंचक्रोशीत पसरली होती. वस्तुस्थिती माहिती नसल्यामुळे उलटसुलट प्रतिक्रियाही येऊ लागल्या. गाववेशीवर मंडळी जमू लागली. ख्रिस्ती व अख्रिस्ती लोकांनाही झालेल्या प्रकाराबद्दल औत्सुक्य होते. त्यातही हौसे,गवसे नव्हे होतेच. निवडणुकाही नुकताच पार पडल्या होत्या. आगीत तेल टाकून पळणारे मुद्दामच संशय व्यक्त करू लागले‌ होते.

         रिकामा क्रूस पाहून मुर्ख लोक भावनिक होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे आवश्यक होते. मामला सार्वजनिक होता… परंतु शेवटी येशूची शिकवण कामी आली. गावाच्या वेशीवर एकमताने सर्व जमावाला जाहीर सांगण्यात आले…

         ही घटना एक अपघात आहे‌ तरीही तो एक चमत्कारच समजू या ! कारण उत्तर प्रदेशातील एक तरुण व हुशार मुलगा जो मनोरूग्ण बनला होता. आपल्या घरापासून हरवला होता. कुटुंबाला तो परत मिळणं केवळ अशक्य होते. येशूचे फायबर इमाजही जर असे अलगद टांगलेले नसते‌‌ व जर त्याच्या हातून पडून तुटले नसते तर. त्या कुटुंबाला देखील घरापासून पंधराशे किलोमीटरवर लांब हे हरवलेले कोकरू कदाचित सापडले नसते‌.

         खुद्द ख्रिस्ताचेच शब्द आहेत. “हे माझे शरीर आहे व ते तुमच्यासाठी अर्पण केले जाईल”

         ही तर फक्त प्रतिमा होती‌ ती कधीही सांधता येते. परंतु तिच्या‌ तुटण्याच्या योगायोगाने आज एक कुटुंब सांधले गेले आहे.

         ही भेट असंभव ज्या परमेश्वराने घडवून आणली, त्या प्रभूचा गौरव असो!