एव्हरी प्रॉब्लेम हॅज ए सोल्यूशन
- बावतीस पेडीकर, नंदाखाल
आपण इतिहासात वाचतो की सिकंदर राजा जग पादाक्रांत करत होता आणि एके दिवशी तो जास्त आजारी झाला तेव्हा त्यांचे शेवटचे मनोगत, माझी शवपेटी डॉक्टरांनी वाहावी व माझे दोन्ही हात शवपेटी बाहेर पुढे ठेवावेत, तात्पर्य मी जगाचा राजा पण डॉक्टर माझे प्राण वाचवू शकले नाहीत आणि मी देवाकडे परत जाताना रिकाम्या हाताने जात आहे, काहीही बरोबर घेऊन जात नाही, जे येथील आहे ते येथेच राहणार आहे.
हिटलरने लाखो ज्यू लोकांचे हाल हाल करून त्यांना जीवे मारले, शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली. आपण हे वाचत असताना रशियाचे पुतीन काय, चीनचे झी पंग पॅग काय किंवा आपल्या भारताचे नरेंद्र मोदी काय, सर्वांना जगाचे मालक व्हायचे आहे, किती काळ ? माहित नाही.
वाल्याचा वाल्मिकी झाला! सौलचा पौल झाला, गेल्या महिन्यात लाखो कोटीचे मालक असलेले अब्जाधीश रतन टाटाचे निधन झाले, त्यांनी लग्न न करता आयुष्यभर गरीब, गरजवंत उपेक्षितांची सेवा केली, त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी केले, त्यांचेही शेवटचे मनोगत फारच महत्त्वाचे आहे, पैसा हे सर्वस्व नाही, गमावलेल्या भौतिक वस्तू परत मिळू शकतात पण जीवन नाही, जीवनाला समजून घेण्यासाठी ‘रुग्णालय, तुरुंग आणि स्मशानभूमी’ ही तीन ठिकाणे फार महत्त्वाची आहेत असे ते म्हणाले आहेत.
त्यांच्यासाठी मुंबईच्या कार्डिनल ऑझवल्ड ग्रेशस यांनी चर्चमध्ये मिस्सा अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
एका प्राप्त झालेल्या माहितीनुसार आपल्या भारत देशात ११५० वृद्धाश्रम आहेत, त्यामध्ये ९७ हजारापेक्षा जास्त वृद्ध राहत आहेत. भारताची लोकसंख्या १४० कोटीच्या वर आहे, सरासरी ११ ते १२ टक्के हे ज्येष्ठ नागरिक. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटी आहे.
वैद्यकीय शास्त्रात प्रचंड प्रगती झाली आहे, त्यामुळे वयोमानात वाढ झालेली आहे, आपल्या स्वातंत्र्याचे वेळी सरासरी आयुष्यमान ३८ होते ते आज ७२ पेक्षा जास्त आहे, याला कारण बदलती जीवनशैली आणि आर्थिक, सामाजिक, स्थर उंचावला आहे आणि हे सर्व असताना अनेक लोकांना वृद्धाश्रमात जावे लागते यामागे जशी मानसिकता आहे तशीच परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे.
सर्वच लोक आपल्या एक किंवा दोन मुलांसाठी जीवाचे रान करतात, त्यांचे लाड करतात पण त्याचबरोबर त्यांना उच्चशिक्षित करतात. प्रत्येकाला वाटते की माझा मुलगा / मुलगी डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक सीए वगैरे व्हावी आणि त्यासाठी ते पात्र व्हावेत म्हणून प्रत्येक आई-वडील, आजी-आजोबा त्यांच्यासाठी आपले सर्वस्व देत असतात.
मग अशा सर्व मुलांना आपल्या वसई मुंबई व इतर शहरात मनासारखी, हवी असलेली परिस्थिती सर्वांसाठी उपलब्ध नाही, त्यामध्ये रोजच्या जीवनात करावी लागणारी कसरत, धावपळ, स्कूटर मोटरसायकलचा प्रवास, रिक्षा, बसचा प्रवास, खड्डे रस्ते, रेल्वेचा प्रवास, गाडीमधील गर्दी, विजेचा खेळखंडोबा, पिण्यासाठी नळाचा शुद्ध पाण्याचा अभाव, आरोग्य समस्या, त्यासाठी डॉक्टर हॉस्पिटल इत्यादीचा अभाव, छानपैकी जीवन जगण्यासाठी परिस्थिती येथे नाही मग असे पात्र उमेदवार मुलगा किंवा मुलगी परदेशात जातात एकदा तिथे गेल्यावर तेथील परिस्थिती त्यांना आकर्षित करते मग त्यांचा विवाह होतो, होणाऱ्या मुलांचे भवितव्य, इत्यादी विचार करून ती तिथेच स्थायिक होतात.
काही वर्षे, त्यातील काही महिने, ते आपल्या आईवडील, आजीआजोबा, सासू-सासरे यांना तिथे नेतात. त्यांनाही तेथील वातावरण एकंदरीत जीवनशैली आवडते पण ते तिथे कायम राहण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. मग या वयस्कर ज्येष्ठ नागरिकांचे पुढे काय ? हा मोठा प्रश्न निर्माण होतो.
येथे राहण्यासाठी सर्व सोयी सुविधा असलेले घर, बंगला सर्व आहे पण माणसे दोनच, कधी कधी एकच मग त्यांची देखभाल कुणी, कशी करायची ? जोपर्यंत चालत फिरत आहेत, काही छोटी छोटी घरातील कामे करता येतात तोपर्यंत ठीक, काही आजार मधुमेह, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, लघवीचा त्रास, डायलेसिस, पोटाची विकार आणखीन इतर प्रकारचे रोग आणि त्यात कर्करोगाने शिरकाव केला तर बघायलाच नको, अशा वेळी त्या परदेशात राहणाऱ्या मुलाने वा मुलीने नेमके काय करायला हवें?
ते स्वतः इथे येऊन किती दिवस महिने सेवा करू शकतील ? मग त्यांचा जॉब, त्यांचे कुटुंब, त्यांची मुले त्यांचे संगोपन, शिक्षण आणि त्यांचे भवितव्य इत्यादी बाबत त्यांनी काय भूमिका घ्यावी ?
येथील ज्येष्ठांनी त्यांच्या मुलामुलीसाठी वाटेल ते कष्ट घेतले मग त्या मुलामुलींनी त्यांच्या मुलासाठी काही करायला हवे की नको ? तसा हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. दोन्ही बाजूने विचारपूर्वक योग्य निर्णय घ्यायला हवा, प्रत्यक्ष आपल्या मुलाने मुलींनी किंवा सुनेने आपली सेवा करायला हवी ही अपेक्षा ज्येष्ठांनी आता बाळगण्याची दिवस निघून गेले आहेत.
काळ बदलत आहे तशी ज्येष्ठांनी आपली मानसिकता बदलायला हवी. तसेच मुला-मुलींनी त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्याबरोबर रोजचा रोजचा संपर्क ठेवणे, काय हवं नको त्याची तजवीज करणे आणि अतिशय महत्त्वाच्या इमर्जन्सीवेळी प्रत्यक्ष येऊन सेवा करणे योग्य होईल.
माझ्या एका मित्राने त्याचे वडील शेतकरी, नोकरी न करणारे, त्यांना पेन्शन मिळत नाही किंवा त्यांच्याकडे काही पुंजी सुद्धा नाही मात्र त्यांची मुले अमेरिकेत राहतात. त्यांनी आपल्यासाठी मस्त बंगला बांधला आहे. त्यांच्यासाठी तसेच आई-वडिलांसाठी सर्व भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून ठेवलेले आहेत. घरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, एक वयस्कर ३०/३५ वर्षाची बाई पूर्ण वेळ, २४ तास त्यांच्याबरोबर राहणारी, सर्व काही खाणं-पिणं कपडे धुणे इत्यादी कामे करून येथेच राहते, तिला पंधरा हजार रुपये महिना मोबदला दिला जातो आणि ती त्यांच्या आई-वडिलांची काळजी घेते आणि हा सर्व व्यवहार व्हाट्सअपवर, व्हिडिओवर रोज पाहिला जातो, सांगितलं जातो.
दुसरा एक मित्र आहे, त्याची दोन्ही मुले कॅनडामध्ये नोकरी करीत आहेत. त्या आई-वडिलांना विजासुद्धा मिळाला आहे. त्याला तीन वर्षे होऊन गेली पण त्याला तिथे जाता येत नाही, मुलाकडे दोन-तीन महिने राहण्यासाठी का असेना गेलो तर ८० च्या घरात असलेल्या आई-वडिलांचे काय करायचे ? एखाद्या वृद्धाश्रमात ठेवावीत तर लोक, नातेवाईक काय म्हणतील ? मुलाकडे जाणे, ते कसे राहतात, काय खातात पितात त्यांचे जीवन कसे चालले आहे हे फक्त फोनवर प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटावे त्यांच्याबरोबर थोडे दिवस राहावे. आपणही तेथील अनुभव घ्यावा असे त्यांना मनोमन वाटते ती सुद्धा त्यांची मुलं आहेत त्यांनाही आकर्षण आहे मग त्यांनी अशा परि-स्थितीत काय करायला हवे ? आईवडील तीन महिन्यासाठी वृद्धाश्रमात जायला तयार नाहीत, काम करणारी बाई, प्रामाणिक सेवा करणारी, मिळणे हे सुद्धा आजकाल मुष्कील झाले आहे.
मी काही परदेशी वास्तव्य करणाऱ्या आपल्या येथील मुलामुलींशी संवाद साधला तर त्यांचीही इच्छा आहे की आई-वडील, आजी आजोबा आपल्या स्वतःच्या घरात ऐशआरामी जीवन जगावे, त्यांना वृद्धाश्रमात जायला नको आणि त्यांना तेथे पाठविण्याची इच्छा सुध्दा नाही. पण…
तसेच काही आई-वडील, आजीआजोबाशी बोललो तर ते सुद्धा सांगतात की आम्ही आता किती दिवस जगणार, आमच्यासाठी मुलांनी, नातवंडांनी त्यांच्या भवि-तव्याचा त्याग करू नये. आम्ही तिथे मुलाकडे, नातवंडाकडे जाऊन आलो आहोत, तेथील परिस्थिती आणि येथील पुष्कळ फरक आहे. मुलांना आणि सूनांना तिथे व्यक्ती स्वातंत्र्य, मनासारखे राहता येते. येथे सासू-सासर्यांच्या घरात त्यांच्या वर्चस्वाखाली राहायला त्यांची तयारी नसते, तसेच ही ज्येष्ठ मंडळी मुलांच्या आणि सुनेच्या अधिपत्याखाली राहायला तयार नसतात ही खरी मेख आहे.
अनेक लोक, आजीआजोबा यांना वृद्धाश्रमात पाठवतात म्हणून मुलांनी पर-देशात जाऊ नये, की चर्चमधील लोकसंख्या कमी होत आहे म्हणून बोंब मारत असतात का. आजी आजोबा यांची काळजी असेल तर यावर चर्च असो, संस्था असो किंवा काही सामाजिक कार्यकर्ते असो त्यांनी पुढाकार घ्यावा, एकाच ठिकाणी मोठी पाच-सहा मजली यू आकाराची इमारत उभारावी आणि तेथे शंभर, सव्वाशे, दीडशे वृद्ध लोकांची एकत्र राहण्याची सोय करावी.
प्रत्येकी दोन बेडची सेल्फकंटेन रूम त्यात सर्व सोयी सुविधा (पलंग, बेड, उशा, बेडशीट, चादर, टेबल, खुर्च्या, कपाटे, बाथरूम टॉयलेट इत्यादी) यामध्ये पती-पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, दोन नातलग, दोन मैत्रिणी, दोन मित्र अशी दोघे दोघे एकत्र एकाच रूममध्ये राहू शकतात.
या इमारतीत कॉमन किचन, डायनिंग हॉल कॉमन, स्टेज, चॅपल, प्रेअर हॉल, दवाखाना, दोन नर्स, वॉचमन केअर टेकर, अशा अनेक सुविधा असतील. शिवाय दोन रूम्स धर्मगुरूसाठी फादर आणि दोन रूम्स धर्मभगिनी सिस्टर साठी सुद्धा असतील.
जुन्या काळात म्हणजेच आताचे ज्येष्ठ आई वडील, आजीआजोबा हे एका जुन्या कौलारू घरात जिथे जन्मले तेथील मोठा ओटा, एका बाजूला हिंदोळा, दुसऱ्या बाजूला माची काही मोठे बाक, आणि त्या ओटीवर लहान मोठे एकत्र नांदले, तसे वातावरण निर्माण करून पूर्ण दिवसाचा कार्यक्रम त्यात करता येईल.
आजूबाजूच्या परिसरातील शाळा कॉलेजमधील मुलांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी बोलवायची त्यांची प्रॅक्टिस होईल आणि ज्येष्ठांची करमणूक. शिवाय अशा ठिकाणी आरोग्य शिबिरे, प्रबोधन शिबिरे आयोजित करता येतील, अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम सुद्धा राबवता येतील.
इथे राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एका बेडसाठी पाच लाख रुपये म्हणजेच एका रूमसाठी दहा दहा लाख रुपये भरून संस्थेचे सभासद होता येईल, संस्था रजिस्टर करायची, 80Gचा फायदा तसेच महापालिका, सरकारी अनुदान शिवाय बँका पतपेढ्या येथून मदत मिळू शकेल.
त्यांच्या महिन्याचा (खाण्या पिण्याचा राहण्याचा) मेंटेनन्स खर्च दर महिन्याला त्यांना द्यावा लागेल. ज्या ठिकाणी आपले घरगुती वातावरण आपले गावातले वातावरण निर्माण केले की अनेक प्रश्न एकमेकांना मदत करणे, सोबत करणे, एकत्रित प्रार्थना करणे असे रोज कार्यक्रम केले जावेत. येथे सुरक्षा रक्षक, वॉचमन कम ड्रायव्हर, २४ तास सेवा केअरटेकर असतील साफसफाई साठी कामगार असतील,
नर्स असतील.
किचनमध्ये सकाळी चहा, नंतर नाश्ता दुपारचे जेवण म्हणजे लंच, संध्याकाळी चहा नाश्ता व रात्रीचे जेवण म्हणजे डिनर. दररोजचा मेनू वेगवेगळा असेल, मोठे मोठे हॉस्पिटल मध्ये जशा सुविधा आहेत तशा इथे करता येतील. आपल्याच परिसरात, आपलीच माणसे असल्याने कोणी कधीही येऊन भेटू शकतात, घरी जाऊन येऊ शकतात अशी मुभा असेल.
ज्यांची इच्छा आहे व ज्यांना परवडेल त्यांना सभासद करून घेता येईल, हे सर्व ऐच्छिक ना नफा तोटा या तत्त्वावर या संस्थेचा कारभार चालेल निदान ४० ते ५० व्यक्ती साठी असा प्रयोग करायला हरकत नाही. आज साठीचे आहेत त्या जवळपास सर्वाकडे सर्व काही आहे. ते सर्वजण शाळेत होते त्यावेळी असलेल्या परिस्थितीपेक्षा आता श्रीमंत झालेले आहेत.
पूर्वी शेती बागायतीमधून तुटपुंजी उत्पन्न मिळत होते, जुनी कौलरू घरे, किमान गरजा कशातरी भागवल्या जात होत्या. आज शिक्षणामुळे चांगल्या नोकऱ्या कामधंदा उद्योग व्यापार यामधून चांगले आणि भरपूर उत्पन्न मिळते, त्यामुळे राहण्यासाठी बंगले, गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर इतर आधुनिक सुविधा, डांबरी रस्ते, वीजपुरवठा प्रवासाच्या सोयीसुविधा अशा अनेक बाबतीत प्रगती झालेली आहे.
त्या काळात घरातील कुटुंबातील बारसे, फर्स्ट कम्यूनीयन, वाढदिवस, लग्न इत्यादी कार्यक्रम कसेबसे करत असत आज ती दणक्यात करून दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे. याला कारण आर्थिक सुबत्ता, सामाजिक स्तर उंचावला आहे त्यामुळे अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत.
अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना कॅम्पस जॉब असिस्टंट, इंटरनशिप, पुढे थेट वर्क व्हिसावर पूर्णवेळ नोकरी मिळून ती एक दोन वर्षात, शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करतात, आणि ते ही मजेत राहून. अमेरिकेतील शिक्षण संशोधनावर तसेच औद्योगिक, तांत्रिक आणि व्याव-सायिक उपयोजनावर आधारित असते तसेच नियमाधारित लोकशाही व्यवस्था, राहणीमानाचा उत्तम दर्जा, शुद्ध हवा पाणी, स्पर्धात्मक भेदभाव रहित वातावरण व गुणाची कदर ही अमेरिकेची अंगभूत गुणवैशिष्ट्ये आहेत त्यामुळे तिथे गेलेली विद्यार्थी तिथे स्थायिक होण्याच्या प्रयत्नात असतात.
शेवटी काय ! डॉ नीतू मांडके, हार्ट स्पेशालिस्ट, हार्ट अटॅक होऊन गेले. डॉ शंतनु अभ्यंकर, आपले मरण पाहिले म्या डोळां, यामध्ये शेवटचे मनोगत वाचण्यासारखे आहे. स्वतः डॉक्टर असूनही काही उपयोग होत नाही. म्हणून जेवढे समाधान मानू तेव्हढे कमीच. ….