उपा(हा)स – एमेल आल्मेडा

उपा(हा)स

  •  एमेल आल्मेडा, चौकाळा

       आता बस झाले. एकदम निश्चितपणे ठरवले की ही पोटाची ढेरी कमी करायची. कितीही प्रयत्न करावे लागले तरी मागे हटायचे नाही. मोह टाळायचा, संयम म्हणजे संयम!

         गेले कित्येक दिवस मी हे मनाशी ठरवत होतो, परंतु उद्यापासून सुरुवात करू ह्या एका वाक्याच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो होतो. ३६ची कंबर आणि ८८ किलो वजनाचा मी फारच बेढब दिसत होतो. शर्टांच्या बटणांना मनोगत व्यक्त करायची संधी मिळाली असती तर त्यांनी माझ्या पोटाचा निश्चितच उपहास केला असता.

         शेवटी मोबाईलवर सदर विषयाशी निगडित अनेक रिल्स पाहून मी एकदाचे मनावर घेतले आणि ऑक्टोबर महिन्यात मॉर्निंग वॉक पासून सुरुवात करून मी माझ्या आरोग्यदायी प्रवासास आरंभ  केला. अपेक्षा होती की न्यू ईयर पर्यंत एकदम फिटम फाट व्हायचे. डॉ.दिक्षित ह्यांचा फंडा वापरण्याचे मी ठरवले. दिवसातून दोनच वेळा खायचे, बाकी वेळा खायचा मूड झाला तरी फक्त पाणीच प्यायचे. सलग आठवडाभर मी हा कार्यक्रम फॉलो केला. अपवाद फक्त एकदा मित्राबरोबर ताडी प्यायचा कार्यक्रम झाला व एकदा वडापाव खाण्याचा योग आला तसेच एकवेळा विनीतमध्ये तंदूरी खायचा बेत पार पडला. बाकी पूर्ण आठवडा मी काटेकोरपणे नियमबद्ध वागलो म्हणजे दिवसातून दोनदाच खाल्ले.

         सात दिवसातच मला हलके वाटायला लागले. पोटाचा आकार काहीसा कमी झाल्यासारखे वाटले. अंगाला टाईट येणारा शर्ट आता प्रमाणात दिसू लागला. ऑक्टोबरचा महिना हे सगळं व्यवस्थित सुरू होते पण नोव्हेंबर उगवला आणि माझ्या संकल्पास धक्के बसू लागले. लग्नसोहळे, कार्यक्रम, जेवणावळी ह्या चक्रव्यूहात मी पुरता रमून गेलो आणि माझा संकल्प धारातीर्थी पडला. स्टार्टर, ड्रिंक, चखणा, मेनकोर्स, डेझर्ट सगळं मनमुराद उपभोगताना मी काहीच उणीव ठेवली नाही. फारसा अभ्यास न करताही वजनाचा आकडा डिस्टिंक्शन मिळवत वरच्या इयत्तेत पोहोचला. मनाला कितीही आवरले तरी जीभ काही बाधत नव्हती. बुफेमधील प्रत्येक पदार्थ ताटात घेतल्याशिवाय पाय पुढे सरकत नव्हते. थोडे थोडे चाखू मनात चमच्याने व्यंजन भरत होतो. पोट भरत होते पण मन काही भरत नव्हते. महिनाभर जवळजवळ हा रोजचा शिरस्ता होता आणि पुढे डिसेंबर जानेवारी पर्यंत हे चालणार होते. शरीर कुरकुरत होते. कळत होते पण वळत नव्हते. आता मी जवळजवळ ‘मेजवानीडिक्ट’ झालो होतो. ह्यावर मीच माझ्यापुरता उपाय शोधला. कोणत्याही कार्यक्रमाला जायचेच नाही. एकदोन वेळा तसा प्रयत्न केला पण त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंध दुरावण्याची शक्यता आहे ह्याची मला अनुभूती आली. तसेच समस्येपासून पळणे हा काही समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हे आणि इकडे समस्या ही माझी व्यक्तिगत होती. सोशल गॅदरिंग हा समाज जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नव्हते.

         हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावावा तसे माझ्या पोटाच्या मदतीला माझे दात धाऊन आले. ह्या काळात माझे दात माझ्या मनापेक्षा जास्त संवेदनशील झाले होते. माझ्या दाढांमध्ये गॅप झाले होते. घेतलेला मांसाहार दातात अडकत होता त्यामुळे मला त्रास होत होता. परिणामी मी मांसाहारापासून दूर राहू लागलो. मांसाहार नाही त्यामुळे मग आपोआपच मधू आणि सुधाही टाळता आली. सुंठेवाचून खोकला गेला आणि मला समस्येतून मोकळा केला.

         डेंटिस्टकडे जाऊन दाताचा ईलाज करावा म्हणून ओळखीच्या डॉक्टरकडे जाऊन दाखवले तर मॅडम म्हणाल्या बरंच डॅमेज झाले आहे. सिजन थांबेपर्यंत थांबला असता तर कदाचित दोन दाढा काढव्या लागल्या असत्या. ट्रीटमेंटचा अपेक्षित खर्च २५ हजार इतका होता. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. घरी विचारून दोन दिवसांनी ट्रीटमेंट सुरू करू म्हणत मी डॉक्टरला कट मारला.

         अहो पुढे सरकताय ना? मागच्या व्यक्तीने सांगताबरोबरच माझ्या विचारांची तंद्री भंग पावली. आता मी बुफे काउंटरवर पोहोचलो होतो. आज डेझर्टमध्ये जिलेबी रबडी पाहून मी मनोमन निश्चय केला. आज जेवल्यावर फक्त सहा जिलेब्या आणि थोडीशी रबडी ह्यांचा आस्वाद घ्यायचा. आईस्क्रीमच्या बाजूला अजिबात जायचे नाही दाताचे दुखणे एक बाजूला पण संयम नावाची काही गोष्ट आहे की नाही. स्वतःला बजावत मी प्लेट हातात घेतली.