इस्टर, ‘दया माता‘ आणि ब्रास बॅंड!
- अतुल काटदरे, 9969285045
वसंत ऋतुच्या आगमनासरशी वसईत गुलमोहर बहरायला सुरूवात होते. गानकोकीळेची संगीत साधना सुद्धा जोर धरू लागते. ऋतुमानानुसार जीवसृष्टीतला हा बदल जरी स्वागतार्ह असला तरी हवामानातला प्रचंड उष्मा नकोसा वाटतो. या भयंकर उकाड्यावर मात करण्यासाठी मी दर शनिवार-रविवार ‘आनंदी’सोबत (म्हणजे माझी ॲक्टिव्हा बरं का!) वसईतल्या रानगावापासून ते अर्नाळ्यापर्यंतचा अख्खा समुद्रकिनारा पालथा घालतो. संध्याकाळी पायावर पाय सोडून किंवा जोडीदारच्या हातात हात घालून, वाळूत रेघोट्या ओढत समुद्राच्या दिशेने नजरेस दिसणारा तांबडा गोळा अदृष्य होताना पहाणं ही माझी सुखाची कल्पना. त्याशिवाय वसईच्या किल्ल्यावरून किंवा अर्नाळ्याच्या हणमंत बुरूजावरून ‘बारडोली’ला निघालेली होडकं क्षितीजापलिकडे दिसेनाशी होईपर्यंत पहात रहाणं हा माझा आवडता छंद. अशावेळी मनात सहज येणारे विचार हे त्या दर्याइतकेच विशाल अन् आभाळाइतके अमर्याद असतात.
अशा त्या अथांग समुद्रात नांगरलेल्या, फार-फार तर किनाऱ्यावरून लाकडी ओंडक्यांच्या सहाय्याने खेचत नेणाऱ्या लहान मोठ्या ‘होऱ्या’ मी मनोरीपसून गोराईपर्यंत आणि वसईपासून ते पार सातपाटीपर्यंत पाहिल्यात. पण कधी मुद्दामहून बोट बांधणी, किंवा त्यामागील यंत्रणा याबद्दल जाणून घ्यायची संधी मिळेलसं वाटलं नव्हतं. उत्सुकता खुप होती.. मग अशावेळी अर्नाळ्याच्या गणेश तांडेलांकडून बोलावणं होतं. त्यांच्या घरापाठी किनाऱ्यावर एका होडीची बांधणी चालू असते. माझ्या आवडीचा विषय असल्याने मी लागलीच अर्नाळ्यात पोहोचतो. बांधकाम चालू असलेला तो ढाचा निरखून पाहतो. त्यावर चढून अगदी लहानसहान गोष्टींबद्दल मोघम माहिती मिळवतो. माझं कुतूहल आणि एकूणच कोळीवाड्याशी असलेला ऋणानुबंध पाहून तांडेल मला परस्पर आमंत्रण देतात, “महिनाभरात ह्या सांगाड्याची अद्ययावत बोट बनलेली असेल तेव्हा या; एक अप्रतिम सोहळा पहायला मिळेल. मी तारीख आणि वेळ फोन करून कळवतो..”
मग काय, मी दिवस मोजायला सुरूवात करतो! ‘माती असशी, मातीस मिळशी’ असे स्वर इथल्या चर्चमधून येऊ लागतात आणि ‘ॲश वेनसडे’ची चाहूल लागते. पुढले ४० दिवस दुखवटा म्हणून उपवास पाळले जातात. त्यागभावना, समर्पण म्हणून आवडत्या पदार्थांचं सेवन वर्ज्य केलं जातं. मातीशी नातं सांगणारा हिंदू समुदायसुद्धा भुमीला वंदन करून ‘धुलीवंदनाची’ पुरातन प्रथा साजरी करतो. होळी पौर्णिमेला अर्नाळ्यात सुपारीच्या झाडाची होळी पेटते. पाडव्याला उभारलेल्या गुढ्या रामनवमीला उतरवल्या जातात. रामनवमीला राममंदिराजवळ मोठी जत्रा भरते. हनुमान जयंतीची पालखी रात्रभर गावातून फिरते. यादरम्यान वाघोली, निर्मळ, कळंब भागांतून ग्रामदेवतांचे उत्सव, जत्रा, पालखी सोहळे दिमाखात सुरू असतात. वसईच्या किल्ल्यातल्या सात पुरातन चर्चेसच्या वाटेवरून ‘क्रुसाच्या वाटेची भक्ती’यात्रासुद्धा याच वेळी संपन्न होते आणि ख्रिस्ताला क्रुसावर चढवून देहदंड दिला गेला त्यावेळी घडलेला हृदयद्रावक प्रसंग डोळ्यांसमोर उभा रहातो. शेवटी ‘गुड फ्रायडे’ला तांडेल फोन करून ‘इस्टर’चा रविवार नक्की करतात.. शनिवारी रात्री उशीरापर्यंत आम्ही गास गावात भटकत असतो. बाराचे टोले पडतात तेव्हा ‘घोन्सालो गार्सिया’मधून घंटानाद होतो. रविवार उजाडतो, जगाचा तारणकर्ता पुनरूज्जीवित होतो आणि वसईत इस्टर साजरा होतो !
रविवारी सकाळी साडेदहा-अकराच्या सुमारास मी अर्नाळ्यात पोहोचतो. पारनाक्यापासून ते अगदी मच्छीमार सोसायटीच्या शीतगृहापर्यंत सर्वत्र लोक घोळक्या घोळक्याने थांबलेले दिसून येतात. गळ्यात मणभर वजनाच्या सोन्याच्या ‘सांकल्या’ न बोटांत जाडजूड अंगठ्या घातलेली ही मंडळी गप्पा मारत, हास्य विनोद करत उभी असतात. त्यांच्या पेहरावावरून होणारा कार्यक्रम किती भव्य असणार आहे याची कल्पना येतेच्! या सर्वांनी एकाच प्रकारचं डिझाईन असलेले पांढरे शर्ट आणि एकसारख्याच लुंग्या परिधान केलेल्या असतात. त्या त्रिकोणी लुंग्यांवर वेलबुट्टीच्या नक्षीने मधोमध ‘दया माता’ अशी अक्षरं रंगवलेली दिसून येतात. ती सर्व गंमत पहात मी हनुमान मंदीराहून सरळ पुढे येत बचाव पाड्याच्या दिशेने सुटतो. हनुमान जयंतीच्या पालखी उत्सवाचा ‘पोस्ट इफेक्ट’ म्हणून की काय अजूनही प्रत्येक गल्लीत रंगीबेरंगी पताकांच्या माळा लागलेल्या असतात. त्या रंगीबेरंगी गल्ल्यांतून वाट काढत मी इष्ट स्थळी पोहोचतो. तांडेल घरी नसल्यामुळे पडवीत विसावतो. चहा-पाणी होईस्तोवर पन्नास एक माणसांची मिरवणूक घरासमोरून किनाऱ्याच्या दिशेने जाताना दिसते. मघाशी पाहिलेले तेच सर्व कोळी लोक; त्यांच्यासोबत आता पारंपारिक वेषभूषेत नटलेल्या कोळीणीसुद्धा आहेत. डोक्यावर पाण्याचे हांडे-कळश्या, खोके, टोपल्या असं बरचसं सामान. पुढे बॅंडपथक. असा हा सारा लवाजमा वाजत गाजत समुद्राकडे निघालाय. पाठोपाठ तांडेल येतात आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत किनाऱ्यावर पोहोचतो. किनाऱ्यावर जणू जत्राच भरलेली असते. निमित्तंच तसं खास असतं.. ‘इस्टर’च्या निमित्ताने
गावातल्या ख्रिश्चन कोळ्याच्या ‘दया माता’ नावाच्या बोटीचा ‘जलावतरण समारंभ’!

महिन्याभरापूर्वी पाहिलेली ही भव्य बोट समुद्रापासून काहीच अंतराने किनाऱ्यावर उभी असते. जसंजसं त्या बोटीच्या जवळ पोहोचतो तशी तिची भव्यता अधिक जाणवू लागते. झेंडूच्या फुलांच्या असंख्य माळांनी सजवलेली ती बोट मला एखाद्या नववधूसमान भासते. सुंदर रंगसंगतीने नटलेल्या त्या बोटीच्या एका बाजूस मोठ्या अक्षरात ‘दया माता’ रंगवलेलं असतं. तिन्ही बाजूंना सुरेख अशी चित्रे रेखाटलेली असतात. मी त्या चित्रांच्या प्रेमात पडतो. सूर्योदयाच्या पार्श्वभूमीवर नाना रंगांची उधळण करणाऱ्या अवकाशात डुलणारी शिडाची होडी, सागरतळाशी स्वच्छंद विहारणारे मासे, सूर्यास्ताच्या रंगीत छटांत उजळून निघालेल्या नदीच्या काठावर वसलेलं कौलारू घर, क्षितीजापलिकडल्या ‘मावळत्या दिनकरा’कडे पहात प्रेमात आकंठ बुडलेलं कोळी जोडपं यासारखी अनेक निसर्गचित्र, व्यक्तिचित्रं मनात भरतात. ज्याप्रमाणे चित्रात चित्र असावं त्याप्रमाणे एका बाजूला फेसाळत्या लाटा कापत ‘बारडोली’ला निघालेली ‘दया माता’ बोट अगदी हुबेहूब रेखाटली असते. याव्यतिरिक्त दुबईतल्या काचेच्या गगनचुंबी इमारती किंवा सिडनीचं ओपेरा हाऊस, बर्फाळ प्रदेशातील घरं, पवनचक्की, विदूषक यांसारखी काहीशी वेगळी आणि म्हणूनच नेत्रसुखद वाटणारी पेंटिंग्ज बोटीच्या बाह्यभागावर सर्वत्र दिसतात. एखाद्या ‘ग्राफिटी’ प्रमाणेच या चित्रांमागील संकल्पना, व्हिज्युअलायझेशन तसंच त्यासाठी वापरल्या गेलेल्या रंगछटा…

फॉन्ट्स स्टाईल्स निव्वळ अप्रतिम असतात. एक वेगळ्याच प्रकारच्या कलाकारीचा नमुना. चालती फिरती आर्ट गॅलरीच् जणू! कुठल्याही प्रकारच्या आर्ट स्कूलची डिग्री नसलेल्या त्या तमाम चित्रकारांना मी मनोमन सलाम करत ती चित्र मनात व कॅमेरात भरून घेतो!
बोटीच्या पुढल्या अंगाला डेकवर उभ्या असलेल्या डोलकाठीला छत्रीचा मान असतो. त्याभोवती सहा दिशांना झुळझुळीत तलम ओढण्यांनी फेर धरलेला असतो. त्या ओढण्यांचा डेकवर एक सुंदर मांडव तयार झालेला असतो. दर्शनी भागावर एक धातूचा क्रूस; आणि सर्वात पुढे कपीश्वर, दत्तप्रसाद, सर्वस्व, Jesus, बेनसिस, आशापुरी माता, शिवदर्शन, समर्थकृपा, Godson, सत्यविजय, गौरीशंकर, स्वर्गराज यांसारखी अनेक नावं मिरवणारे वीस-एक कापडी झेंडे आभाळात फडकत असतात. मला ते झेंडे पाहून कुतूहल वाटतं. हे झेंडे म्हणजे यजमानांनी आमंत्रित केलेल्या इतर नाविक मंडळीच्या होड्यांचं प्रतिक! जमलेल्या त्या शंभर-एक माणसांच्या गर्दीतली ही लोकं म्हणजे वर घेतलेल्या नावांच्या होड्यांवरली तांडेल, नाखवा मंडळी. धंदा सर्वांचा असल्याने सग्या-सोयऱ्यांसोबतच मासेमारीच्या किंवा संबंधित व्यवसायातल्या सर्व मंडळींना त्यांच्या कुटुंबकबिल्यासकट आवतान असतं. बरं हे आमंत्रण केवळ तोंडी किंवा पत्रिका वाटून पूर्ण होत नाही तर त्यासोबत पाहुण्यांना खास आहेरदेखिल असतो. आमंत्रणासोबत पुरूषांना एकाच रंगाचे, एकाच प्रकारचे शर्ट व त्रिकोणी लुंग्या (कोळ्यांच्या भाषेत रूमाल) व बायकांसाठी एकाच डिझाईनची लुगडी भेट दिली जातात. सर्वसाधारणपणे लुगडी ही सहावारी असतात पण कोळीवाड्यात खास बारावारी लुगडी नेसण्याची पद्धत असल्याने दोन साड्या एकत्र शिवून ती तयार केली जातात. तर एकंदरीत असा सर्व थाट असतो…
सूर्य डोक्यावर येतो. उन्हं वाढत असतात तशी गर्दी देखिल वाढत असते. शेजारी घातलेले दोन्ही मांडव गर्दीने फुलून गेले असतात. बोटीच्या चहू दिशांना मंडळी पांगलेली असतात. काही अंतरावर शेगड्या लावून जेवणाचा घाट घातलेला असतो. मंडळी एकमेकांच्या भेटी घेण्यात, गप्पा-टप्पांत व्यस्त असतात. मी फोटोच्या निमित्ताने गर्दीतून वाट काढत बोटीच्या समोर पोहोचतो. काय गंमत असते पहा, नव्या नवरीप्रमाणे सजवलेल्या त्या बोटीचा सागरप्रवेशसुद्धा माप ओलांडून गृहप्रवेश करणाऱ्या वधूसारखाच होणार असतो. बोटीसमोर केळीचे खांब, नारळीच्या झावळ्या वगैरे वाळूत खोचून एक कमान उभारली असते. ती कमान झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवून त्याला एक नाजूक फित बांधलेली दिसते. जमिनीवर फुलांची रांगोळी काढून त्यावर ‘दया माता’ लिहिलेलं असतं. वास्तविक कोळीवाड्यात ‘लगीन’ असो, ‘हालद’ असो वा अगदी ‘हावलू’- ‘पुनवंचा’ सण; रांगोळी, झेंडूची फुलं, केळीचे खांब, नारळ या गोष्टींना अर्नाळ्यातल्या हिंदूंच्या सणा-समारंभात प्रचंड महत्व आहे. पण तितकचं महत्व कमी अधिक प्रमाणात ख्रिस्ती समाजातही बघायला मिळतं. याचं मुख्य कारण म्हणजे धर्म बदलले असले तरी भाषा एकच असल्याने संस्कृती समान भासते. पेहरावात, खानपानात एकात्मता आढळते. आजही केवळ अर्नाळ्यातच नव्हे तर संपूर्ण वसईतील ख्रिश्चन समुदायाची तोंडओळख ही त्यांच्या तत्कालिन व्यवसायानेच होते; जसं की कोळी (मासेमारी), आगरी (मिठागरी), वाडवळ (वाडीतील उत्पन्न घेणारे), सामवेदी (पूर्वाश्रमीचे ब्राम्हण). अशा विविधतेत एकता जपणाऱ्या वसई पट्टयातील भटकंतीत मला दर खेपेस अनपेक्षित पण नुतन अनुभूती सापडतात. कदाचित हीच गोष्ट मला पुन्हा पुन्हा माझ्या लाडक्या वसईच्या प्रेमात पडायला कारण ठरते! अशाच खास अनुभूती आज पुन्हा मला लाभणार या विचाराने मी आनंदून जातो तोच सर्व मंडळी प्रार्थनेसाठी एका बाजूस जमतात.
मांडवात शांतता पसरते. बोटीची मालक मंडळी व इतर नातलग डेकवर जमतात. आशिर्वाद विधीसाठी ‘सेंट पिटर्स’ चर्चमधून पाद्री आलेले असतात. समुद्रातल्या वादळ वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रभू येशू बोटीचा ताबा घेवो व यापुढील वाटचालीदरम्यान आपल्यावर कृपादृष्टी ठेवो म्हणून साकडं घातलं जातं. प्रार्थनेसोबतच पवित्र धर्मग्रंथातील येशूख्रिस्ताच्या कोळ्यांच्या सहवासातल्या गोष्टींना उजाळा दिला जातो. पवित्र क्रुस दोन्ही हातांनी आभाळाच्या दिशेने उंचावत प्रभूनामाचं गुणगान होतं. प्रार्थना संपते, फादर चर्चच्या दिशेने निघतात आणि बोटीवरला यापुढला संपूर्ण कारभार बायकांच्या स्वाधीन केला जातो. संपुर्ण बोटीला हळदीने माखून काढलं जातं. बायका आपल्या हाताला हळद लावून पंजांचे ठसे बोटीवर उमटवतात. चेष्टा मस्करी म्हणून हळद खेळलीही जाते. ‘ब्रास बॅंड’च्या गजरात मालकाच्या हस्ते फित कापली जाते. फटाकड्यांची माळ कडकडते आणि केक कापून आनंद साजरा केला जातो. यापुढला साधारण तासभर वेळ पाहुण्यांच्या भेटीगाठी आणि आभारप्रदर्शनात जातो. सावनकर, मेस्त्री, बॅंडपथक, धर्मग्राम पंचायतीचे पाटील, जमलेल्या तमाम बोटींचे नाखवा मंडळी यांचा नामोल्लेख करून आभार व्यक्त केले जातात. मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यजमानांतर्फे यथायोग्य सन्मान केला जातो तसंच पाहुणे मंडळींकडून भेटी स्वीकारल्या जातात.
यादरम्यान माईकवर अनेक नावं घेतली जातात. इथे बरीचशी नावं व्यावसायिक हुद्द्यांवरून पडलेली आहेत जसं की ‘नाखवा’ (होडीचा मालक), ‘तांडेल’ (होडीवरल्या तांड्याचा प्रमुख) तर काही हुद्द्यावरून जसं की ‘पाटील’. पण काही मात्र कधीही न ऐकलेली, एकदम वेगळीच् नावं ऐकायला मिळतात. किल्लेकर, देवळातला, भातखाऊ, केळीखाते, गोडखाते यासारख्या नावांमागे नक्कीच काही ना काही मजेशीर दंतकथा प्रचलित असणार हे नक्की. किल्ल्यात रहायचा तो ‘किल्लेकर’ अन् देवळात रहायचा तो ‘देवळातला’ ही जर त्या नावांतली साधी सोपी समीकरणं असतील तर केळीखाते नावाच्या व्यक्तीच्या पुर्वजाने नक्कीच केळी खाण्याचा काही अचाट विक्रम केलेला असणार! गावागावांतल्या प्रादेशिक भाषांची हीच तर गंमत असते. त्यातही वसईत जिथे मैलामैलावर भाषा बदलते तिथल्या इस्ट इंडियन, कादोडी यांसारख्या भाषांची गोडी काही औरच. या भाषांना जसा ‘कोकणी’ बाज आहे तसाच त्यांवर ‘पोर्तुगीज’ भाषेचा प्रभावसुद्धा जाणवतो. आजही इथल्या ख्रिश्चन लोकांच्या बोलण्यातून मद्रीन (आई), पद्रीन (वडील), इगर्जी (चर्च), पाद्री (प्रिस्ट) हे पोर्तुगीज शब्द जशास तसे किंवा किंचित अपभ्रंश होऊन ऐकण्यात येतात. इथे जिझस ला ‘जेजूस’ अन् ख्रिस्मसला ‘नाताळ’ म्हटलं जातं. गावातल्या काही वाहनांवर Ave Maria (Latinमध्ये Hail Mary) लिहिलेलं दिसून येतं. म्हणतात ना भाषेत इतिहास दडलेला असतो, तो हा असा!

आता लवकरच बोटीचा जलावतरण सोहळा सुरू होईल; तेव्हा त्यापूर्वीच डेकवर जाऊन यावं या विचाराने मी शिडी चढतो. होडीचा फायबरचा ढाचा बाहेरून रंगरंगोटी करून सुंदर दिसत असतो; पण आतूनही इतका वेगळा भासेल याची मला कल्पना नसते. लाकडी फळ्यांखाली शीतकपाटं बंदिस्त असतात. फुलांनी सजलेलं नाखवाचं केबीन चकाचक दिसत असतं. हातात ध्वज घेऊन ‘मार्ग सत्य, जीवन मीच आहे’ म्हणणाऱ्या मार्गदर्शक ख्रिस्ताचं एक विलक्षण सुंदर पेंटीग त्या केबिनच्या दर्शनी भागावर रेखाटलेलं असतं. केबिनमधल्या स्टिअरिंग व्हिलसमोर क्रूस असतो. सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी ‘दया माता’ पाण्यात उतरायला केवळ काही क्षणांचा अवधी असतो आणि मला अजून एक सुखद धक्का बसतो. केबिनच्या मागे लाकडी देव्हाऱ्यात एक लांब तस्बीर असते. मधोमध क्रुसाच्या शेजारी येशूख्रिस्त व मदर मेरी, त्याच तस्बीरीत उजव्या हाताला साईबाबा आणि डाव्या कोपऱ्यात बाळकृष्ण. बोटीवरल्या सर्वधर्मीय खलाशांच्या प्रार्थनेसाठी केलेला हा प्रपंच! एवढ्यात परमेश्वराच्या नावाचा जयघोष होतो. मी लगबगीने खाली उतरतो. ‘बाला’ लोक बोटीसमोर जमली असतात. दोन अवाढव्य क्रेन दोरखंडांच्या सहाय्याने बोट खेचायला तयार असतात. ‘हालेलुया’ पाठोपाठ ‘गणपती बाप्पा..’, ‘साईनाथ महाराज की..’, ‘पुंडलिक वरदे..’ करत करत भारत मातेचा जय जयकार होतो आणि बोट हलते. पूर्वी प्रचंड अंगमेहनतीचं असलेलं हे काम क्रेनमुळे बरंच सोप व हलकं होतं. एक रिवाज म्हणून काही पावलं हाताने दोर खेचले जातात व पुढे क्रेनवर भरवसा ठेऊन अर्धी मंडळी मांडवात नाचायला मोकळी होतात.
या पुढचा सोहळा हा टिपिकल कोळीवाड्यात होणारा सोहळा असतो. बियरचे खोक्यावर खोके फोडले जातात. वयात आलेल्या पोरांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्व मंडळी ग्लास भरतात. बायकामंडळी जेवणाच्या मांडवात जमतात. कोंबडीच्या रस्स्याचा घमघमाट सुटलेला असतो. मग मी सुद्धा तांडेलसोबत एका आडव्या पडलेल्या लाकडी ओंडक्यावर बसून मैफिल सजवतो. ग्लासाला ग्लास भिडतात अन् गप्पा सुरू होतात. काही आठवड्यांपूर्वी साधारणपणे वीस-पंचवीस लाख खर्चून बांधलेला फायबर कम लाकडी बोटीचा तो साचा रंगरंगोटी व इतर सोयी करून शेवटी तीसेक लाखापर्यंत गेला असेल. शिवाय आजच्या शाही सोहळ्यात खाण्यापिण्यापासून वाजंत्री, मांडव, सजावट, क्रेन व अगदी आहेरापर्यंत घातलेला घाट म्हणजे वारेमाप खर्च. अर्नाळ्यासारख्या एका लहानश्या गावात मासेमारी व्यवसायात इतक्या मोठ्या भांडवलाची गुंतवणूक पाहून मला नवल वाटतं. लाखो रूपये खर्चून साजरा होणारा हा भव्य, दिमाखदार सोहळा मला अचंबित करतो.. पण तांडेल म्हणतात यामागे विलक्षण भावनिक जिव्हाळा आहे. जिवाची जोखीम पत्करून वादळी वाऱ्याला न जुमानता होडीतून दर्याला भिडणाऱ्या कोळ्यांनाच तो ठाऊक! कोळ्यांच्या समुद्राशी अन् आपल्या होडयांशी असलेल्या प्रेमळ नात्यातली ही नाजूक गुंफण अशा सोहळ्यांतून हलकेच उलगडते !! आमचे विठ्ठलदादा उगाच नाय म्हणत, “डुलतान मचवं पान्यावर.. कोल्यांना पोसतोय समिंदर..”
कोळीगीतांचा विषय निघतो आणि मी भानावर येतो. खाणं पिणं अगदी पोटभर होऊनसुद्धा माझ्या अधाशी कानांची भुक काही अजून भागलेली नसते. बॅंडवाल्यांनी तिपारच्या प्रहरीच गाशा गुंडाळलेला असतो आणि त्यानंतर स्पीकरवर कायम डिजे वाजत रहातो. त्यामुळे माझ्या कानांची सांगितिक भूक शमवण्यासाठी मी अर्नाळ्याचा निरोप घेतो आणि नंदाखाल चर्चच्या दिशेने निघतो. तिथे इस्टर संडेनिमित्त एक भव्य ‘ब्रास बॅंड महोत्सव’ आयोजित केलेला असतो. चाळपेठेहून पुढे नंदाखालमध्ये दाखल होईपर्यंत काहीच मिनिटे लागतात. वाटेत इस्टरच्या शुभमुहुर्तावर अनेक नव्या दुकानांचे उद्घाटन व प्रार्थना समारंभ चालू असतात. साधारणपणे पाच-साडेपाच वाजले असतात. चर्चच्या पटांगणात स्टेज, खुर्च्या, म्युझिक सिस्टीम वगैरे मांडून माईक टेस्टींग चालू असतं. मी सावली बघून स्थानापन्न होतो तोच् ठरल्याप्रमाणे सुनिल डिमेलो येतात. आम्ही दोघेही तानसेन नसलो तरी कानसेन असल्याने तारा जुळलेल्या असतात. पण आज ‘तारा’ नसून ‘ब्रास’ची हत्यारं पाजळली जाणार असल्याने एक वेगळचं कुतूहल असतं. ‘ब्रास बॅंड’ हा या पट्ट्यातील संगीताचा आत्मा. ज्या प्रमाणे बोलीभाषा, खानपान, लोककला इत्यादींमुळे संस्कृती समृद्ध होते, त्याचप्रमाणे वसई पट्ट्यातली आगरी, कोळी, वाडवळ, इस्ट इंडियन संस्कृती ही ‘ब्रास बॅंड’ ने समृध्द केलीये असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यात मग ‘ब्यांजो’ असणं म्हणजे ‘तृप्ती’चा परमावधी. केवळ वसईतच नव्हे तर पुढे उत्तनपासून गोराई, मनोरी, मार्वे, मढ सारख्या किनारपट्टीवरील गावागावांतून ‘ब्रास बॅंड’चे तेच सोनेरी सुर मनांवर अधिराज्य करतात. सुरांचा हा साज मुंबईतल्या कोळीवाड्यांतूनही अनुभवायला मिळतो. त्यामुळे आम्ही कान टवकारून तयार होतो आणि तासाभरात प्रोग्राम सुरू होतो.
ड्रमस्टीक्स एकमेकांना भिडतात आणि त्या इशाऱ्यासरशी चकचकणारी ब्रासची वाद्य वाजू लागतात. ट्रंपेट, क्लेरीनेट, सेक्साफोन मी या पूर्वीसुद्धा ऐकलेले पण आज प्रथमच ‘ट्युबा’ ऐकायला मिळतो. ब्यांजो न वापरता निव्वळ ड्रम्सच्या मदतीने काही विलक्षण खुबसुरत सुरांची निर्मिती होते. ‘येऊ कशी प्रिया’, ‘खेळ मांडला’, ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’ ही गाणी किबोर्डशिवाय देखिल इतक्या सुंदर प्रकारे वाजवली जाऊ शकतात ह्यावर यापूर्वी कधी विश्वास बसला नसता. नव्या जुन्या मराठी-हिंदी चित्रपटगीतांची नुसती मैफिलच्! तसं पाहिलं तर हिंदी चित्रपटांचं मराठी गाण्यांशी त्यातही खास करून कोळीगीतांशी जूनं नातं. अमिताभच्या ‘मच गया शोर..’ च्या सुरवातीला वाजवलेलं म्युझिक हे ‘या गो दांड्यावरनं नवरा कुणाचा येतो..’ या गाण्यावरूनच घेतलंय हे जाणकारांना वेगळं सांगावं लागत नाही. त्यामुळे ८०च्या दशकातली गाणी ट्रंपेटवर ऐकताना अगदी ऑर्केस्ट्राचा फील येतो. ‘पंचम’दांची आठवण झाल्याखेरीस रहावत नाही. लक्ष्मीकांत-प्यारेलाल पासून अजय-अतुल पर्यंत झक्कास उजळणी होते. गावातले १-२ लोकल बॅंड झाल्यावर खास मुंबई-नवी मुंबईची नामवंत बॅंड पथकं आपली कला सादर करतात. पण एक कमी मात्र कायम जाणवत रहाते. वसईत मैफिल सजलेली असूनदेखिल ट्रंपेटवर एकही ‘इस्ट इंडियन’ लोकगीत किंवा ‘कोळीगीत’ ऐकायला मिळू नये हे खटकतं. पण आजचा दिवसंच खास होता, मनात यावं आणि पुढल्या क्षणाला सादर व्हावं तशी ‘टेलिपथी’ जुळते आणि नवी मुंबईहून आलेल्या ‘दिवाळे’ कोळीवाड्यातल्या पथकातर्फे सुंदर कोळीगीतंही ‘पेश’ केली जातात. कोळीगीतं ‘लाईव्ह’ ऐकणं हे जर स्वर्गसुखाचा असेल तर ‘ब्रास बॅंड’वर ऐकणं म्हणजे मोक्ष प्राप्तीची सुरुवातच्! ‘मी डोलकर’ मधल्या ‘रात पुनवंला.. नाचून करतंय मौजा’ या ‘मौजा’ नंतर उमटलेले सुर कानांवाटे काळजात उतरतात. ‘आssरं संगतीनं तुझ्या मी येणार न्हाय’ म्हणत प्रत्येकवेळी नकार देणारी गोमू जेव्हा होकार देत ‘संगतीनं तुझ्या मी येणार…’ म्हणते त्यावेळचा ‘पॉझ’ आणि त्यानंतरच्या ‘हाssय’ पाठोपाठ वजवलेला ‘म्युझिक पीस’ हृदयाला स्पर्श करतो.
अडीज-तीन तास त्या सुरावटीत चिंब भिजून आम्ही परतीच्या वाटेला लागतो. डिमेलोंच्या घरी जेवणाचं आमंत्रण मी मोठ्या मुष्किलीने टाळतो आणि घरचा रस्ता धरतो. एका सुंदर दिवसाची सांगता होत असते. नंदाखालपासून सोपाऱ्यापर्यंतच्या शांत, निर्मनुष्य रस्त्यावरून ज्या आनंदीसोबत सकाळी रिक्त मनाने प्रवासाला सुरूवात केली तीच्याचसोबत परतीच्या प्रवासात मन आनंदाने आणि समाधानाने परिपूर्ण झालेलं असतं; या क्षणाला नीरव आभाळात मला सोबत करणाऱ्या चंद्रासमान!
पुढले २-४ दिवस या मन याच हिंदोळ्यांवर तरंगणार; वसईतल्या इस्टर, ‘दया माता’ आणि ब्रास बॅंडच्या सुरावटीत..