इथे(एकत्र कुटुंब) तिथे (विभक्त कुटुंब)

नि:शब्द एकाकी अश्रू

  • मेलवीन डाबरे- वसईकर, गिरीज- वसई

इथे दहा जणांचं  कुटुंब

तिथे तिघं वा चौघांचं  कुटुंब

नावं मात्र एकत्र नि विभक्त कुटुंब/१/

इथे वाढली एका पाठोपाठ दहा-बारा                   

तिथेही वाढली एक वा दोन  

इथे संस्कार अनेकांचे 

तिथे मात्र दोघांचेच/२/

इथे शेती-वाडी मोलमजुरी करून कुटुंब जोपासली

तिथेही कंपनी-व्यवसाय-ऑफिस करून कुटुंबं उभारली

इथे मनाने श्रीमंत तर

तिथे धन-संपत्तीने /३/

इथे घर जणू वाडा माणसांनी भरलेला

तिथे घर म्हणजे आलिशान बंगला

सुख-सुविधांनी सुसज्ज असा/४/

वाड्यातून पडले एकेक बाहेर

नाव मिळालं झाले विभक्त

मी आणि माझं कुटुंब

वाडा झाला पडका नि वाड्यातील परके/५/

आई एक महिना माझ्याकडे व बाबा तुझ्याकडे

झाल्या दोघांच्या वाटण्या

या, नाहीतर रहा एकाकी वाड्यात

काहींची रवानगी झाली वृद्धाश्रमात तर काहींची अंधा-या खोलीत /६/

‘इथे’ला मिळाली तिलांजली

इच्छेविरुद्ध धावले तिथे मिळण्या सावली

पण पोटच्या गोळ्याने 

जगण्याची हवाच काढली/७/

“करावे तसे भरावे’ या उक्तीप्रमाणे

तिथेही दोन्ही मुलं  झाली स्थाईक परदेशी

म्हणाली,ना करिअर वा ब्राईट फ्युचर स्वदेशी

सर्वकाही आहे ते विदेशी/८/

वाड्याप्रमाणे जमीन जुमला नि बंगला ही पडला ओस

कधी येणार,कधी येणार ही वाट पाहत

लागला त्यांना पाहण्याचा व नातवंडांना कुरवाळण्याचा सोस/९/

झालो बाळगी जाऊन वारंवार  परदेशी

पण ओढ सदैव मनात

‘गड्या अपुला देश बरा’ 

म्हणत परतले मायदेशी  /१०/

इथेही नाहीत,तिथेही नाहीत

आहेत फक्त जुने क्षण

राहून राहून एवढंच आठवतं

ह्याचसाठी केला होता का अट्टाहास 

पण नाही होत विस्मरण /११/

नाही जवळी कुणी समजून घेण्या, संवाद साधण्या

आहेत केवळ आठवणी आणि

ओघळणारे पण नि;शब्द एकाकी अश्रू/१२/

मी राहिलो ना माझा नि ना  झालो इतरांचा

माझे झाले परके ,विसरले नाते

अशा या कठिणप्रसंगी ,हे ईश्वरा केवळ नि केवळ 

तुझीच आठवण येते रे देवा 

तुझीच आठवण येते……/१३/