इतिहासाच्या पानावर अनिल दहिवाडकर
- विनोद जनार्दन शिंदे, अहमदनगर
ख्रिस्ती समाजास लाभलेले एक सव्यसाची लेखक, प्रकाशक, संपादक, संशोधक, ग्रंथपाल, ग्रंथ विक्रेता, संचालक, आयोजक असलेले असे श्रीयुत अनिल दरिवाडकर. त्यांची पहिली कविता ही विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या मासिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर या उपजत प्रतिभावान साहित्यिकाने विविध विषयावरील त्यांचे लेख हे जवळपास ११० नियतकालिकांतून प्रसिद्ध केले. विविध विषयांतील त्यांचा अभ्यास, माहिती, सखोलता त्यामुळे त्यांनी जे लेख लिहिले ते समाज प्रवर्तक व समाजप्रबोधन करणारे होते. अभ्यासूपणे केलेले हे लेखन त्यांच्या साहित्याला अधिक परिपक्व करीत गेले. त्यातूनच त्यांचा अभ्यास, विषयाची व्याप्ती, ज्ञान, व्यासंग वाढत गेला, त्यामुळेच त्यांनी कविता, कथा, कादंबरी, अनुवाद, धार्मिक, आध्यात्मिक, वैचारिक, एकांकिका, नाटके, स्तंभलेखन, शोधपत्रकारीता, बालसाहित्य, विनोदी साहित्य असे विविध साहित्य प्रकार लीलया हाताळले. मुळात मिश्कील स्वभाव असलेल्या या लेखक महाशयांनी त्यांच्या प्रत्येक साहित्य प्रकारांतून नर्म विनोदाची पेरणी केल्याचे दिसून येते.
त्यांनी अनेक मासिकांचे संपादक म्हणूनही काम केले. आपल्या संपादकीयाचा त्यावर ठसा उमटविला. ‘शब्दसेवा’ पुणे ख्रिस्ती साहित्य संघाची वार्षिक पत्रिका. ‘ख्रिस्ती लोकहितवादी’ या मासिकाचे प्रकाशक व संपादक म्हणून त्यांनी काम केले. हे मासिक नव्वद ते दोन हजारच्या काळात बरेच गाजले. ख्रिस्ती साहित्य प्रसारकाचे मुखपत्र असलेले ‘एक मासिक आपले’ ‘शालोम’. त्यासोबतच त्यांनी अनेक ग्रंथांना प्रस्तावनाही लिहिल्या. अनेक ग्रंथाचे चिकित्सकपणे समीक्षण केले आहे.
दहिवाडकरांनी अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. ‘अमेरिकन मराठी मिशनने केलेली मराठी साहित्याची आणि भाषेची सेवा १८१२ ते १९७५’ या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. हा संशोधन लेख खरेतर पुस्तक रुपात प्रसिद्ध व्हायला हवा होता. कारण ख्रिस्ती धर्माचे मराठी साहित्यात कुठलेही योगदान नाही. हा प्रश्न नेहमीच ख्रिस्ती धर्मीयांविषयी विचारला जातो. त्यांची हेटाळणी करणे हा त्या मागील प्रमुख हेतू असतो. त्या पार्श्वभूमीवर हा शोधनिबंध एक ठोस पुरावा ठरू शकला असता. त्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांचे केवळ विषय पाहिल्यास त्यांचा त्या विषयाचा असलेला अभ्यास, त्याची व्याप्ती खोली व त्याची आवश्यकता समजू शकते.
अशा या अभ्यासू संशोधकाने ‘ज्ञानोदयातील ललित साहित्य वास्तव आणि अपेक्षा’ हा शोधनिबंध १९८७ साली प्रसिद्ध केला होता. ज्ञानोदय मासिक आपल्या स्थापनेची जवळपास २०० वर्षे लवकरच पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. ज्ञानोदय हे मासिक मराठी साहित्यातील एक प्रमुख, सातत्याने व नियमितपणे प्रसिद्ध होणारे मासिक आहे. या मासिकाची आजवरची सातत्यपूर्ण कामगिरी ही आम्हासह सर्व महाराष्ट्रातील लोकांना भूषणावह आहे. आज भारत देशास स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्ञानोदयाचा अभ्यास व त्याचे संदर्भ पाहिल्याशिवाय भारत व महाराष्ट्राचा इतिहास पूर्णत्वास जावू शकत नाही. हा इतिहास लिहिण्यासाठी ‘ज्ञानोदय’ महत्वाचे साधन, संदर्भ व सत्यतेची पडताळणी करणारा ऐवज ठरू शकतो. त्यामुळे ज्ञानोदयात प्रसिद्ध झालेले लेख, त्यातील वास्तविकता व त्या लेखांतून अभिप्रेत असलेली अपेक्षा. या विषयावरील शोधनिबंध हा सर्व लेखक महाशयांसाठी दिशादर्शक मार्गदर्शक व त्या विषयाचे आकलन व तो कुठल्या अंगाने लिहिला गेला पाहिजे. त्याचे सामाजिक मूल्य काय असायला हवे? त्या दृष्टीने हा शोधनिबंध अशा प्रकारच्या विषयावरील लेख लिहिणाऱ्यास त्याच्या विषयाची जाणीव करून देणारा ठरू शकतो.
तसेच दुसरा शोधनिबंध ‘ख्रिस्ती प्रकाशने आणि नियतकालिके वास्तव आणि अपेक्षा’ १९९६. ख्रिस्ती समाजात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या अल्प प्रकाशन संस्था आहेत. तीच बाब नियतकालिकाबाबतही आहे. या विषयावरील शोधनिबंध म्हणजे भविष्यात ज्या ख्रिस्ती व्यक्तीस प्रकाशन क्षेत्रातील हा व्यवसायात करायचा असेल, तसेच ज्या कोणाला ख्रिस्ती मासिक प्रकाशित करायचे असेल, त्यांच्यासाठी हा शोधनिबंध बोधप्रद ठरू शकतो. त्यातून निर्माण होणाऱ्या अडीअडचणी, त्यातील मार्ग, त्यातील आव्हाने, त्यातील क्लिष्टता, यासाठी हा शोधनिबंध फार उपयुक्त असा होता. ज्ञानोदयातील ललित साहित्य वास्तव आणि अपेक्षा १९८७ व ख्रिस्ती प्रकाशने आणि नियतकालिके वास्तव आणि अपेक्षा. १९९६ हे दोन्ही शोधनिबंध आजही तितकेच मौल्यवान व दिशादर्शक आहेत.
आदरणीय आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी ख्रिस्ती समाजाला पडलेलं हे इंद्रधनुषी स्वप्नं ! त्यांची २५० पेक्षा अधिक ग्रंथसंपदा आहे. इतकी अफाट साहित्य संपदा पाहून अचंबित व्हायला होते. ज्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे लिखाण केले ते पाहून विस्मय वाटतो. इतकेच नव्हे तर त्यांनी ‘आपण’ या साप्ताहिकातून केलेली निर्भीड पत्रकारिता आजच्या नवीन उमेदीच्या पत्रकारांसाठी तो एक वास्तुपाठ ठरू शकतो. या पत्रकाराचे अग्रलेख हे महाराष्ट्रभर गाजले आहेत. या परखड अग्रलेखांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता. अशा या विचारप्रवर्तक व द्रष्ट्या पत्रकारावर शोधनिबंध लिहिणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ख्रिस्ती समाजात आजही अग्रस्थानी असलेला हा पत्रकार व त्यांचे ‘आपण’ हे साप्ताहिक आमच्यासाठी एक मौल्यवान ठेवा आहे. त्यामुळेच ‘आचार्य सूर्यवंशी पत्रकारिता आणि इतर साहित्य’ हा १९९० साली लिहिलेला शोधनिबंध म्हणूनच खूप उपयुक्त व या पत्रकाराची महती व त्याचे अवलोकन करणारा होता.
त्याचप्रमाणे त्यांचे इतरही शोधनिबंध हे खूप मौल्यवान व ऐतिहासिक आहेत. १९८८ साली लिहिलेला ‘विनोद आणि ख्रिस्ती साहित्य’ या विषयावरील शोधनिबंध तसेच २००५ साली लिहिलेला ‘ख्रिस्ती दलित साहित्याची वाटचाल’ या व त्याच्या अलीकडच्या काळात दलित ख्रिस्ती हा नवीन विचार प्रवाह ख्रिस्ती समाजात आपले अस्तित्व निर्माण करू पहात होता. त्यास अनेकांचा विरोध होता. कारण दलित हा शब्द अनेक विचारवंताना अभ्यासकांना, समाजधुरीणांना न पचणारा होता. त्यात कितीही सत्यता असो वा नसो. त्यातील वास्तविकता आम्हाला मान्य असो वा नसो. दलित या शब्दास कडाडून विरोध केला गेला. ही पार्श्वभूमी असलेला हा शोधनिबंध अभ्यासाच्या दृष्टीने तितकाच महत्वाचा वाटतो. कारण ख्रिस्ती साहित्यातः ‘ख्रिस्ती दलित साहित्याची वाटचाल’ या विषयीचे मत. भूमिका व अभ्यासू दृष्टीकोन या शोधनिबंधातून प्रगट झाला आहे.
वरील सर्व शोधनिबंधाच्या विषयाचे महत्व व त्याची उपयुक्तता जाणून व लक्षात घेता या सर्व शोधनिबंधाचा एक समग्र ग्रंथ प्रकाशित व्ह्यायला हवा होता. तो इतिहासाच्या दृष्टीने व अभ्यासकांसाठी महत्वाचा ठरला असता. म्हणूनच दहिवाडकरांनी लिहिलेले शोधनिबंध महत्वाचे व ख्रिस्ती साहित्यात मोलाची कामगिरी बजावणारे ठरू शकतात. कारण त्या मागे व्यासंग, चिंतन, मनन आहे.
दहिवाडकरांनी ‘मृत्युवेध’ या शीर्षकाचे ६४० कडव्यांचे प्रभू येशू ख्रिस्ताचे दीर्घ स्वरूपातील काव्यमय चरित्र लिहिले आहे. ६४० कडव्यांत त्यांनी येशू ख्रिस्ताचा जीवनपट मांडलेला आहे. ‘काळासूर्य’ १९७९ साली प्रकाशित झालेली एकूण ९३ पृष्ठांची ही कादंबरी आहे. त्यात त्यांनी ख्रिस्ताच्या धर्मसेवेस वाहून घेतलेल्या एका धर्मगुरूच्या वाताहत झालेल्या कुटुंबाची कथा रेखाटली आहे. ख्रिस्ती धर्मगुरू हा जरी ख्रिस्ती समाजाच्या केंद्रस्थानी असला तरी त्यांस म्हणावी तशी व तितकी आदराची वागणूक मिळत नाही. त्यास नेहमीच लोकनिंदेला सामोरे जावे लागते. समाजाला कायम त्याच्याकडून भरमसाठ अपेक्षा असतात, तो, त्याचे कुटुंब हे आदर्शच असले पाहिजे, त्याची वर्तणूक ही कायम सोशिकच असली पाहिजे, तो गरीब दिनदुबळा असायला हवा. हे समाजाच्या दृष्टीने ख्रिस्ती धर्मगुरूचे परिमाण आहेत. या परिमाणांविरुद्ध एकही कृती हा समाज सहन करु शकत नाही. त्या दृष्टीने ‘काळासूर्य’ हे या कादंबरीचे नावच या कादंबरीचा मतितार्थ सांगतो. दहिवाडकरांनी ‘जंगबहादुर रावसाहेब कवडे’ ‘बाळक्या’ ‘म्हातारीचा डोंगर’ या नावाच्या बालकादंबर्याही लिहिल्या आहेत. त्यांनी कविता लेखन व त्यांचे भाषांतरही केले आहे.
दहिवाडकरांचे “करंदीकरांस पत्रे’ हे पुस्तक १९९० साली खूप गाजले. कोणाच्यातरी आयुष्यात, प्रसंगात, भानगडीत डोकावण्याची मनुष्य प्रवृत्ती असते. त्यात आम्हाला एकप्रकारचा आसुरी आनंद मिळतो. त्यातील तव्यांचा आम्ही शोध घेत नाही किंवा ते तपासून पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही. अशा घटना, प्रसंग, भानगडी, हे आमचे मनोरंजन करीत असतात. त्यातून सामाजिक बोध वा संदेश आम्हाला जे काही सांगत असतो त्यावर समाज विशेषतः ख्रिस्ती समाज हा खूप गंभीर भूमिका घेणारा असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच आमच्या अनेक धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्था या डबघाईस आल्या तरी त्या आमच्या लेखी अदखलपात्र असतात.
‘करदीकरांस पत्रे’ सत्य प्रकाशन पुणे, मार्च १९९० पृष्ठे २८२ किंमत ७५ रुपये. Bombay Tract and Book Society चे काम करंदीकर नावाचे ग्रहस्थ खूप पूर्वीपासून पहात होते. या संस्थेद्वारे ‘उपासना संगीत’, ‘मंगलधाम’ या धार्मिक साहित्यांचे प्रकाशन केले जात होते. त्यांस परदेशातून मदत मिळत असावी. ही एक आर्थिकदृष्ट्या संपन्न अशी संस्था होती. तसेच येथील प्रमुखांस ख्रिस्ती समाजात मोठा मानही होता. हे ग्रहस्थ काही काळ ज्ञानोदय या मासिकाचे संपादक होते. तसेच अमेरिकन मराठी मिशनमधील ते एक बड़े प्रस्थ होते. ख्रिस्ती समाजातील उच्चभ्रू वर्गात त्यांची गणना होत असे. या पार्श्वभूमीवर दहिवाडकरांनी ‘करंदीकरांस पत्रे’ या पुस्तकात Bombay Tract and Book Society चा सर्व भ्रष्टाचार उघड केला होता, तो काळ मला अंधुकसा आठवत आहे. त्याकाळी करंदीकरांस पत्रे हे प्रकरण ख्रिस्ती समाजात खूप गाजत होते. परंतु ते काय प्रकरण आहे? ते अधिक काही समजू शकले नाही. तसेच या प्रकरणाचे पुढे काय झाले ? हेही समजले नाही. ख्रिस्ती समाजाचे एक मोठे वैगुण्य म्हणजे कुठलेही प्रकरण हे तडीस गेल्याचे माझ्या तरी पाहण्यात वा ऐकिवात नाही. हे कदाचित माझे अज्ञानही असू शकते. एक मात्र झाले की एका भ्रष्टाचारी व्यक्तीस (कायद्याची बाजू माहित नाही) ग्रंथात बंदिस्त करण्याचे धाडस दहिवाडकरांनी दाखवले.
दहिवाडकरांनी जी पुस्तके लिहिली, संपादित केली वा अनुवादित केली त्यापैकी ‘जिवंत जाळले’ जी. एल. एस. पब्लिशिंग या संस्थेने सन २००० या वर्षी प्रकाशित केलेले हे पुस्तक मला खूप मौल्यवान वाटते. ख्रिस्ती साहित्यात या पुस्तकाने मोलाची भर घातलेली आहे. ते यासाठी की ख्रिस्ती धर्म प्रसारक, सुवार्तीकांनी, स्वयंसेवी संस्थांनी जे काम सेवाभावी वृत्तीने केले. त्यातून त्यांनी ख्रिस्त गाजविला. ख्रिस्ताची प्रीती सर्व जगास सांगितली. निरपेक्षपणे, मिशनरीवृत्तीने केलेली कामे त्यांच्यामुळे जगापुढे आली. त्यासाठी त्यांना जो त्रास झाला. त्यांचा जो छळ झाला तो इतरांसाठी प्रेरक ठरला आहे.
ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांची दोन मुले (वडील मुलगा १० व लहान मुलगा ६ वर्षांचा) यांना ओडीसातील मनोहरपूर येथे दिनांक २३ जानेवारी १९९९ रोजी जिवंत जाळले. या निर्घुण अमानवीय घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. सर्व जगातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. ग्रॅहम स्टेन्स हे ओडीसा येथे १९६५ पासून ‘मयूरभंज लेप्रेसी होम’ या संस्थेद्वारे कुष्ठरोग्यांची सेवा करीत होते. तसेच त्या अदिवासी भागातील खूप गरीब व पिडीत अदिवासी लोकांची सेवा करीत होते. या लोकांना जबरदस्तीने धर्मांतरित केले जात असल्याच्या कारणास्तव येथील काही कट्टरवादी हिंदू लोकांनी या तिघांना जाळून मारले होते. पुढे न्यायालयात हा आरोप सिद्ध झाला नाही. या घटने नंतरही ग्रॅहम स्टेन्स यांच्या पत्नीने ‘ग्लेडीस’ यांनी स्टेन्स यांचे काम २००४ पर्यंत चालूच ठेवले होते. २००५ मध्ये पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च सन्मान त्यांना या कामासाठी बहाल करण्यात आला होता. तसेच २०१६ मध्ये सामाजिक कामासाठी ‘मदर तेरेसा मेमोरियल अंतरराष्ट्रीय अवॉर्ड’ हाही देण्यात आला होता. असो. या सर्व प्रकरणाची अधिक माहिती आपणास आहेच.
या घटनेवर आधारित ‘बर्नंटू अलाइव्ह’ या पुस्तकाचा अनुवाद म्हणजे ‘जिवंत जाळले’ हे पुस्तक होय. या पुस्तकाचे सहलेखक प्रा. डी. आर. आवळे हे आहेत. या मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकाने, ख्रिस्ती सेवकांची जिवंत साक्ष इतिहासात कायमस्वरूपी पुस्तकरूपाने कोरण्याचे काम केले आहे. ही तत्परता, महत्व, आवश्यकता दहिवाडकरांनी दाखवली आहे. त्यांच्यातील समयसूचकतेला मराठी भाषिक वाचकांनी धन्यवाद द्यायला हवे. अशा जिवंत घटनेवरील पुस्तक मराठी साहित्यात असणे म्हणजे केवळ मराठी ख्रिस्ती साहित्याचेच दालन त्यामुळे समुद्ध होत नाही तर त्याने भारतीय मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यात अशा अनेक विकृत प्रवृत्तीच्या लोकांना विचारप्रवृत्त करण्याचे काम हे पुस्तक करू शकते. त्यामुळे या ग्रंथाचे महत्व खूप अधिक आहे. अनेक काल्पनिक कथा कादंबर्यांच्या तुलनेत असा जिवंत अनुभव देणारे हे पुस्तक खूप अव्वलस्थान मिळवणारे आहे. आजचा तरुण वाचकवर्ग अशा वस्तुनिष्ठ व सत्यवादी साहित्य वाचनास पसंती देत असल्याचे जाणवते.
अनिल दहिवाडकरांनी १९८९ साली पुणे येथील ख्रिस्ती साहित्य प्रसारक या संस्थेचे संचालक व कार्यकारी विश्वस्त म्हणून पदभार स्विकारला. त्यानंतर अतिशय जोमाने आणि कार्यक्षमतेने त्यांनी या संस्थेस चालना देत अनेक पुस्तकाचे प्रकाशन व संपादन केले. ‘आजचा मान्ना’ हे पुस्तक ख्रिस्ती साहित्य प्रसारक, पुणे या संस्थेद्वारे १ जानेवारी २००८ साली प्रकाशित करण्यात आले. त्यात ‘आजचा मान्ना’ म्हणजे दररोजच्या कौटुंबिक भक्तीच्या उपासनेचा कार्यक्रम या पुस्तकात दिलेला होता. तसेच विशेष दिवसांचे महत्व जाणून त्यासाठी देखील विशेष उपासनेचा मान्ना दिलेला आहे. या पुस्तकात कालमर्यादा असल्यामुळे हे पुस्तक होऊ शकत नाही. कारण एखादे कुटुंब रोजच्या कौटुंबिक भक्तीत या पुस्तकाचा उपयोग करू शकत नाही. कारण त्याला विषयाची मर्यादा पडते. केवळ एका वर्षाकरीताच त्याचा उपयोग होऊ शकतो असे मला वाटते.
‘लॉक किया जाय’ एक प्रश्नमंजुषा असलेले हे पुस्तक आहे. त्यात बायबलमधील ५२५ प्रश्न आहेत. ‘एक्लेसिया गीतसंग्रह’ ‘एक्लेसिया निवडक गीते’ ‘दैनंदिन उपासना गीते’ ‘पवित्र उपासना गीते’ ‘पूर्ण झाले आहे’ ‘वधस्तंभावरील सात शब्दावर सात अभ्यासू लोकांचे मनन व चिंतन’ त्यात आहे. १९९० साली त्यांनी ‘ख्रिस्ती दैनंदिनी आणि पंचांग’ ही दैनंदिनी प्रकाशित केली आहे. साधारण प्रार्थना पुस्तक मंडळीतून केले जाणाऱ्या विविध विधींची माहिती त्यात दिलेली आहे. हे पुस्तक संग्रही ठेवण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. मंदिरातील भक्तीप्रसंगी उपयोगात येणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या पुस्तकाचे प्रकाशन व संपादन त्यांनी केले आहे.
तसेच ख्रिस्ती साहित्य प्रसारक, पुणे यांच्या वतीने त्यांनी अनेक ध्वनिफिती प्रसिद्ध केल्या होत्या. साधारणपणे ऐशी ते दोन हजार सालापर्यंत म्हणजे दोन ते तीन दशके ध्वनिफिती टेपरेकॉर्डरवर ऐकण्याचा तो काळ होता. काळाप्रमाणे चालणे ही व्यावसायिकता व लवचिकता संचालक व कार्यकारी विश्वस्त असलेल्या दहिवाडकरांमध्ये दिसून येते. त्यामुळेच रमण रणदिवे व त्यांच्या सहगायकांच्या आवाजातील ‘भजनांजली’ व ‘ख्रिस्ती भावगीते’ या दोन ध्वनिफिती महाराष्ट्रातून खूप नावलौकिक पावल्या. या ध्वनिफितीतील या भजनांचे व भक्तीगीतांचे स्मरण ख्रिस्ती कुटुंबाना आजही झाल्याशिवाय राहणार नाही. इतक्या त्या कर्णमधुर होत्या. त्यातील गीत, संगीत व स्वर हा महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती कुटुंबातून व्यापून राहिला होता. ही समज व दूरदृष्टी दहिवाडकर या नावाच्या संचालकांत होती.
ही सर्व छोटी मोठी साहित्यसेवा करीत असतानाच दहिवाडकरांतील अभ्यासू, जिज्ञासू, व्यासंगी, तपस्वी, संशोधकाने साहित्यातील इतिहासाच्या पानावर अधोरेखीत होईल व सुवर्णाक्षरात लिहिले जाईल असे अद्वितीय काम केले ते म्हणजे “बायबल : देवाचा पवित्र शब्द” हा एकत्रित त्रिखंडात्मक ग्रंथ लिहिला असून, पारंपारिक बायबल पेक्षा बायबलच्या अनुषंगाने येणारी व त्यास पूरक असणारी माहिती त्यात दिलेली आहे. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास अधिक सखोलपणे, अभ्यासकाला व विश्वासणाऱ्या व्यक्तीस करता येऊ शकतो हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
पारंपारिक बायबल व्यतिरिक्त संपूर्ण बायबलचे लिखाण महाराष्ट्रातील केवळ तीन विद्वान व्यक्तींनीच केले आहे. ते म्हणजे महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई यांनी मूळ इब्री आणि ग्रीक भाषांतून पवित्र शास्त्राचे भाषांतर केले. पंडिता रमाबाई मुक्ती मिशनने ते प्रकाशित केले. दुसरे म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ‘सुबोध बायबल’ राजहंस, पुणे या प्रकाशन संस्थेने जून २०१० साली प्रकाशित केले आहे. या ग्रंथाची पृष्ठ संख्या ११२५ इतकी असून त्याची किंमत सातशे पन्नास रुपये आहे. या ग्रंथाचे बाह्यस्वरूप हे मोठ्या आकारातील आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे ख्रिस्ती व ख्रिस्तेतर वाचकांसाठी बायबलचे आकलन सहज सुलभ व्हावे म्हणून सोप्या व मराठमोळ्या भाषेत बायबलची पूर्ण ओळख त्यात करून दिली आहे. भरपूर तळटिपा, छायाचित्रे यांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. तसेच मूळ बायबलमध्ये काही ठिकाणी जाणवणारी दुर्बोधता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथासाठी २०११ साली महाराष्ट्र राज्याचा साहित्य पुरस्कार व २०१३ साली साहित्य अकादमी, नवी दिल्लीचा साहित्य पुरस्कार त्यांस लाभला आहे.
मराठी भाषेतून संपूर्ण बायबल लिहिणाऱ्या तिसऱ्या व्यक्ती म्हणजे पुणे येथील अनिल दहिवाडकर हे होत. त्यांनी लिहिलेले “बायबल : देवाचा पवित्र शब्द” हा होय. हा एकत्रित असा द्विखंडात्मक ग्रंथ आहे. ख्रिस्ती साहित्य प्रसारक, पुणे यांनी तो १० जुलै २०१२ रोजी प्रकाशित केला असून त्याची पृष्ठे २००८ असून त्याची किंमत दोन हजार सातशे रुपये इतकी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात ८५ आलेख. १७५ चित्रे. चौकटी, १४४ नकाशे, भूगोल, ९०,००० समानार्थी संदर्भ व टिपा इत्यादी माहितीने परिपूर्ण असलेले संग्राह्य बायबल मराठीत प्रथमच प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय देवाची नावे. येशू ख्रिस्ताविषयी पूर्ण झालेली भविष्यवाणी, बायबलमधील संख्या विशेष, प्राचीन व अर्वाचीन भूगोल. बायबलमधील इंग्रजी नावाचे मराठी पर्याय. एका वर्षात संपूर्ण बायबल वाचनाचा तक्ता त्यात दिलेला आहे. देवपरीज्ञानविषयक इंग्रजी मराठी संज्ञा कोश इत्यादी पूरक माहिती असणारे मराठीतील हे एकमेव बायबल आहे.
दहिवाडकरांनी हे बायबल अधिकाधिक आकर्षक, वाचकाभिमुख, संग्राह्य असे केले आहे. ठळक गोष्टींचे महत्व जाणून त्याचा अंतर्भाव त्यात करण्यात आला आहे. मूळ बायबलचीच भाषा त्यात असून भाषेबाबत त्यांनी कुठल्याही दुरुस्त्या केलेल्या दिसत नाहीत. या ग्रंथासाठी कुठला संदर्भ ग्रंथ म्हणून कुठल्या पुस्तकांचा आधार घेतला आहे ? याचा त्यात किंवा अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या सूचित त्याचा उल्लेख नाही, आपल्या नियमितच्या वाचनातील बायबलची पृष्ठ संख्या ही साधारणपणे तीनशे ते चारशेच्या आसपास असते. पंडिता रमाबाईच्या बायबलची पृष्ठ संख्या दीडहजार पेक्षा अधिक आहे. फादर दिब्रिटो यांच्या सुबोध बायबलच्या पुटांची संख्या ही दीडहजारच्या आत आहे.
परंतु दहीवाडकर यांच्या “बायबल देवाचा पवित्र शब्द” या ग्रंथाची संख्या मात्र २००८ इतकी आहे. त्यामुळे या ग्रंथाच्या खरेदीची किंमत वाढलेली आहे. सर्वसामान्य लोकांना ती परवडणारी नाही. कुठल्या तरी संस्थेने हे पुस्तक पुरस्कृत केल्यास ते अनेक वाचकांपर्यंत पोचू शकते. असे असले तरीही दहिवाडकरांनी वयाच्या एकहत्तराव्या वर्षी इतके भव्य, कठीण, क्लिष्ट, आव्हानात्मक काम हाती घ्यावे यातून त्यांची ख्रिस्तनिष्ठा, धर्मनिष्ठा, समाजनिष्ठा दिसून येते. पवित्रशास्त्रातील अंतरंगाची ओळख अधिकाधिक अभ्यासक व सर्व सामान्य व्यक्तीला व्हावी ही त्यामागील भूमिका दिसून येते. ख्रिस्ती धर्मप्रसारक, धर्मगुरू, सुवार्तिक, शाब्बाथ शाळेतील वा व्ही. बी. एस. च्या विद्यार्थी व शिक्षकांना, बायबल मधील घटना, माहिती अधिक चांगल्याप्रकारे उलगडून दाखविता येऊ शकतात. पवित्र शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यादृष्टीने या बायबलला विविध पैलू, कंगोरे आहेत. त्यामुळे मराठी भाषेतील भविष्यातील हा एक दुर्मिळ संदर्भ ग्रंथ ठरला आहे. हा ग्रंथ अनिल दहिवाडकर हे नाव मराठी साहित्याच्या इतिहासात कोरून ठेवील यात शंका नाही.
अनिल दहिवाडकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, तितकंच ते उमदं, हरहुन्नरी आणि मिश्किलही त्यांचा मूळ पिंड हा संशोधकाचा! असे त्यांच्या एकूण व्यक्तीमत्वावरून दिसून येते. त्यांना सतत कसला तरी शोध घ्यायचा असतो. ही शोधक वृत्ती त्यांनी जोपासली, सांभाळली. त्याचाच परिणाम त्यांनी ख्रिस्ती साहित्य प्रसारक, पुणे या संस्थेच्या माध्यमातून प्रथम छोटे छोटे संशोधनात्मक प्रयोग केले. ते म्हणजे बृहन्महाराष्ट्र ख्रिस्ती नामसूची आणि दैनंदिनी पुणे जिल्हा ख्रिस्ती नामसूची आणि दैनंदिनी, मुंबई, नवी मुंबई, ठाणे ख्रिस्ती नामसूची आणि दैनंदिनी अशा प्रकारच्या बहुविध सूचीची त्यांनी निर्मिती करून त्या प्रकाशित केल्या, याचा उपयोग ख्रिस्ती समाजाला झाला.
या संशोधनाचीच पुढील व्यापक प्रक्रिया म्हणजे ‘स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा’ याची सूची त्यांनी तयार केली. त्याची सुरुवात मिरज येथे बायसिंगर मेमोरियल लायब्ररीचे संचालक म्हणून (डिसेंबर १९७० ते मार्च १९८१) या काळात कार्यरत असताना झाली. मिरज येथे त्यांनी ख्रिस्ती साहित्य संघाची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून विद्यमान साहित्यिकांचा परिचय कोश तयार करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी एक फॉर्म तयार करण्यात आला. एकूण ४४ लेखकांची माहिती या फॉर्मच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झाली.
त्यानंतर १९७७ साली जयसिंगपूरचे प्रा. डॉ. आर. टी. अक्कोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या विद्यापीठात अमेरिकन मराठी मिशनने केलेली मराठी सेवा या विषयात पीएच. डी. साठी संशोधन सुरु केले. खरे पाहता विद्यापीठाला एक दर्जेदार संशोधक व उत्कृष्ट Academician लाभला असता. हे काम जरी पूर्णत्वास गेले नाही तरी त्यासाठी घेतलेले कष्ट वाया गेले नाहीत. अमेरिकन मराठी मिशनच्या केंद्रांना व अनेक लेखकाना त्यांनी भेटी दिल्या. या ग्रंथ संशोधन यात्रेत २०० लेखकांच्या हजारभर पुस्तकांची माहिती हाती लागली. याचदरम्यान मिरज सोडून पुण्यात ख्रिस्ती साहित्य प्रसारक या संस्थेचे संचालक व कार्यकारी विश्वस्त म्हणून ते रुजू झाले. दरम्यानच्या काळात वरील प्रकल्प तब्बल ४० वर्षे दंड बासनात बंद होऊन पडला होता.
ही अस्वस्थता व अपुरे राहिलेले काम याच्या ध्येयामुळे या प्रकल्पाने सप्टेंबर २०१९ मध्ये नवे रूपधारण करीत तो पुढे आला. ते म्हणजे हाती असलेल्या साधनांच्या मदतीने ‘ख्रिस्ती लेखकांचा परिचय कोश आणि ग्रंथसंपदा’ या स्वरूपाच्या कोश निर्मितीची उसीं त्यांच्या मनात आली. मधमाशीने कणकण मध गोळा करून तो पोळ्यात साठविण्याचे काम सुरु झाले. आजच्या या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते खूपच सुकर झाले. जलदगतीने संपर्क करण्याची किमया त्यामुळे साध्य झाली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून भरघोस प्रतिसाद मिळाला. पुन्हा संशोधकाच्या वृत्तीतील उत्साह द्विगुणीत झाला. या ग्रंथातील नोंदी अचूक करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले गेले. कुठे चूक, त्रुटी किंवा उणीव राहू नये या साठी डोळ्यांत तेल घातले जात होते. त्यासाठी अपेक्षित माहितीचे संकलन, वर्गीकरण करणे. संकलनासाठी पाठपुरावा करणे हा संशोधनाचा आत्मा त्यासाठी व्याकुळ होत होता. ही खूप कष्टप्रद व किचकट प्रक्रिया होती. तिला मूर्तरूप येऊन १० जुलै २०२१ रोजी ‘स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा’ या सूचीची निर्मिती करण्यात आली. या सूचीचा कालखंड इ.स. १६१६ ते २०२१ पर्यंतचा एकूण ४०५ वर्षांचा इतका हा विस्तृत कालखंड आहे. मराठी ख्रिस्ती साहित्यातील मानदंड ठरणारा हा ग्रंथ म्हणून गौरविला जात आहे.
“स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा” या सूचीचा हा ग्रंथ महत्वपूर्ण व मराठी ख्रिस्ती साहित्यातील एक महत्वाचा टप्पा मानण्याचे कारण काय ? भारतात आलेले पहिले इंग्रज जेजुइट मिशनरी फादर थॉमस स्टीफन्स यांनी १०,९६२ ओव्या असलेले ‘ख्रिस्तपुराण ची इ. स. १६१६ मध्ये निर्मिती केली. मराठीत रचलेले हे ओवीबद्ध प्रासादिक महाकाव्य संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ महाराज यांच्या काव्याची अनुभूती देते. फादर थॉमस स्टीफन्स यांनी मराठी भाषेच्या गौरवार्थ ४०० वर्षांपूर्वी लिहिलेले व अजरामर काव्य ख्रिस्तपुराण या ग्रंथात सापडते. त्यामुळेही ख्रिस्तपुराण हा ग्रंथ मौल्यवान ठरतो.
जैसी हरळांमाजि रत्नकिळा |
कि रत्नांमाजि हिरा निळा ||
तैसी भाषांमाजि चोखळा ||
भाषा मराठी || १२२ ||
४०० वर्षांपूर्वी मराठी भाषेच्या गौरवार्थ लिहिलेले हे काव्य आजही किती जिवंत आहे. याचा प्रत्यय या ओव्यांतून येतो. मराठी भाषेचे महात्म्य सांगणारे लिखाण इतक्या सुंदर शब्दांत कोणीही मांडले नाही. तिचे केलेले असे हे रसाळ व गौरवपूर्ण वर्णन मराठी वाडमयात क्वचितच पहावयास मिळते.
‘स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा’ या ग्रंथाचा अभ्यास करतांना दहीवाडकरांनी जी प्रस्तावना लिहिली आहे तोच एक मोठा शोधनिबंध आहे. तो वाचल्यानंतर या ग्रंथाचे श्रेष्ठत्व समजून येते. अनेक गुपितांचा व दडलेल्या माहितीचा आम्हाला शोध लागतो. आमच्या पूर्वजांनी मराठी वाड:मयासाठी केलेले अभूतपूर्व काम पाहून अभिमानाने उर भरून येतो.
तेव्हा कळते की आमच्या उशाला हिरा आहे परंतु तो आम्हाला माहीतच नाही ! मराठीतील सर्व साहित्य प्रकाराचे लेखन ख्रिस्ती साहित्यिकांनी केले आहे. त्यात धर्म प्रचारार्थ धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, खगोलविद्या, पदार्थविज्ञान, तर्कशास्त्र, शरीरशास्त्र, आरोग्य, पंचांग, गणित, पशुशास्त्र, भूगोल, बखर, इतिहास, ज्योतिषशास्त्र, नीतिकथा, कुटुंबनियोजन, व्यसनाधीनता, स्त्रीशिक्षण, क्रमिक पुस्तके, न्यायव्यवस्था, बालसाहित्य, शिशुसंगोपन, उपदेशपर साहित्य, विधवा विवाह, संस्कृती, कौटुंबिक स्वास्थ्य, निबंध काव्य, कादंबरी, नाटक, प्रहसन, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन, प्रवासवर्णन, कामगार चळवळ, सामाजिक सुधारणा, देशभक्ती आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भरपूर वैचारिक मंथन करणारे लेखन ख्रिस्ती साहित्यिकांनी मराठी ख्रिस्ती साहित्यात केले गेले. आहे. अस्पर्श असे विषय कोणतेही त्यानी ठेवले नाहीत. इतकी व्यापकता व समृद्धता मराठी ख्रिस्ती साहित्यात आहे. त्या सर्व पुस्तकांची सूची म्हणजे स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा होय.
इतकेच नव्हे तर ख्रिस्ती लेखकांत शंभरहून अधिक पुस्तके लिहिणारे तीन शतकवीर आहेत. ते म्हणजे आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, यांनी २५० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. बाबा पद्मनजी यांनी १०३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांची दोन इंग्रजी भाषेतीलही पुस्तके आहेत. म्हणूनच त्यांना मराठी वाड:मयाचे जनक भीष्माचार्य म्हणून रेव्ह. भा. कु. उजगरे यांनी त्यांच्या गौरवार्थ म्हटले आहे. तर जेष्ठ साहित्यिक व संशोधक गं. बा. सरदार म्हणतात की त्यांच्या इतकी ग्रंथरचना त्या काळच्या दुसऱ्या कोणत्याही लेखकाच्या हातून झाली नाही, त्याचप्रमाणे बोरिवलीचे जोसेफ तुस्कानो यांनी शंभर पुस्तके लिहूनही अद्याप त्यांचा हात लिहिताच राहिला आहे.
मराठी साहित्यातील अनेक वाड:मय प्रकारात प्रथम निर्मितीचा मान ख्रिस्ती लेखकांकडे जातो. याबाबत प्रसिद्ध संशोधक अ. का. प्रियोळकर म्हणतात की एकोणीसाव्या शतकात मराठी गद्याच्या बाबतीत मात्र युरोपियन लोकांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. मोल्सवर्थ यांनी मराठी इंग्रजी कोशाची १८३१ मध्ये रचना करून मराठी भाषेचा पायाच रचला आहे असे म्हणावयास हरकत नाही. अशासारखा कोश कोणत्याही इतर देशी भाषेत त्या काळी झाला नाही. अद्यापही या कोशाचे महत्व कमी झालेले नाही.. कँडीचा १८४७ मधील इंग्रजी-मराठी शब्दकोशही उपयुक्त आहेच परंतु कँडीने मराठी भाषेला नियमबद्धता व एकरूपता आणून दिली ही त्याची मोठीच कामगिरी होय. जांभेकर, दादोबा पांडुरंग यांच्यासारख्यांच्याही मराठी लिखाणातील चुका दाखवून कॅंडीने एकेकाळी त्यांना सळो की पळो करून सोडले होते. कोश वाड:मयाचा त्याचप्रमाणे व्याकरणाचा पाया या ख्रिस्ती लोकांनी घातला आहे. मराठीच काय पण भारतातील बहुतेक भाषेची आरंभीची व्याकरणे व कोश यांची निर्मिती विदेशी लेखकांकडून झालेली दिसते.
ललित वाड:मयात पहिल्या मराठी निबंधाचे कुटुंबप्रवर्तननीति (१८३५)चे कर्तुत्व मिसेस फरार यांचेकडे जाते. मराठीतील पहिल्या कादंबरीचा मान बाबा पदमनजींच्या यमुना पर्यटन या १८५७ साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीला आहे. रेव्ह. विल्यम केरी यांनी इ.स. १८०५ मध्ये प्रकाशित केलेल्या मॅथ्युचे शुभवर्तमान हे मराठी भाषेतील भाषांतरित पुस्तक सेरामपूर (कोलकत्ता) येथे प्रसिद्ध झाले होते. महाराष्ट्रा बाहेर प्रसिद्ध होणारे हे पहिले मराठी पुस्तक होय. मॅथ्युचे शुभवर्तमान या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर खिस्ती लेखकांची ग्रंथनिर्मिती बहरलेली दिसते. अनेक वाडमय प्रकार प्रथम प्रकाशित करण्याचे श्रेयही ख्रिस्ती लेखकांना जाते. ख्रिस्तायन हे महाकाव्य रे. ना. वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक आणि देवदत्त टिळक या तिघांनी लिहिले आहे. वडील, आई व मुलगा यांनी लिहिलेले हे जगातील एकमेव महाकाव्य आहे.
ख्रिस्ती साहित्याचा आणि ख्रिस्ती लेखकांच्या साहित्यिक कामगिरीचा समग्र आणि एवढा तपशीलवार इतिहास मराठी वाड:मयाच्या इतिहास येणे शक्य नाही. म्हणून स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा या सूचीची ग्रंथ निर्मिती करण्यात आल्याचे प्रकाशक अनिल दहिवाडकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भविष्यात व आजही हा महत्वपूर्ण ग्रंथ इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला आहे. त्याची उपयुक्तता दीर्घकाळसाठी आहे. परंतु भविष्यात या सूचीचे Revised Edition करण्याचे आव्हानात्मक काम पुढील पिढीला पेलावे सोसावे लागणार आहे. हे दुर्लक्षूनही चालणार नाही. आजवर स्वदेशी व विदेशी ख्रिस्ती लेखकांनी जवळपास पाच हजार ग्रंथ लिहिले आहेत. त्याची प्रक्रिया पुढेही अव्याहतपणे चालूच राहणार आहे. या सुचीत १२२८ ख्रिस्ती लेखकांच्या ४७९५ ग्रंथांचा समावेश आहे. यात ग्रंथकर्त्यांचा नामनिर्देश नसलेली ७९९ पुस्तके आहेत. तर ५४७ विदेशी ख्रिस्ती लेखकांनी लिहिलेल्या १२७९ आणि स्वदेशी ख्रिस्ती लेखकांनी लिहिलेल्या २७१७ पुस्तकांचा समावेश आहे. ही ग्रंथसूची अधिकाधिक अद्यायावत करण्याचे काम करण्यात आले आहे. त्यात काही किरकोळ चुका दुरुस्त्या आहेत परंतु त्याने खूप काही फरक पडत नाही.
या सूचीचे काम १९७६ पासून सुरु झाले. या सूचीचे तीन विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे.
विभाग एक – लेखक, संपादक वा अनुवादक यांपैकी कोणाचेही नाव पुस्तकावर नसलेले ग्रंथ.
विभाग दोन – विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा
विभाग तीन – स्वदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा
लेखकाचा पत्ता, मोबाईल क्रमांक आणि इमेल त्यात दिला आहे. पुस्तकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, वर्ष, आवृत्ती, पृष्ठ संख्या, किंमत आणि त्याखाली ग्रंथपरीचय या क्रमाने माहिती दिलेली आहे. स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांचा परिचय आणि त्यानी निर्माण केलेली ग्रंथसंपदा यांची चार शतकांची माहिती देणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. त्यामुळे त्याचे अनन्यत्व असाधारण आहे. अभ्यासकांना या ग्रंथाच्या आधारे मराठी वाड:मयाच्या वाटचालीचा आणि त्यात ख्रिस्ती लेखकांच्या असलेल्या वाट्याचा वेध घेता येईल. मराठी साहित्याचा विकास आणि वैभव तसेच मराठी ख्रिस्ती वाड:मयाचे स्वरूप व कार्य आणि मराठी सारस्वतातील त्यांचे योगदान त्याचे मूल्यमापन करता येईल.
या सूचीसाठी ऐशीव्या वर्षी कष्ट घेणारे दहिवाडकरसरांचे मराठी व मराठी ख्रिस्ती वाड:मयातील योगदान हे अपूर्व आहे. त्यासाठी त्यांना अनेकांची मदत, सहाय्य लाभले आहे. फा. फ्रान्सिस कोरिया, प्राचार्य स्टीफन आय. परेरा, श्री स्टॅन्ली गोन्साल्वीस, प्रा. डॉ. सुभाष पाटील, रेव्ह. अतुल अधमकर या सर्वांचे सहाय्य मनोबल उंचावणारे व ऊर्जा देणारे ठरले आहे. तसेच रेव्ह. विक्रांत लोंढे यांनी आकर्षक व समर्पक मुखप्रुष्ठ तयार केले आहे. तसेच डी. टी. पी. आणि ग्रंथ मांडणीचे काम श्री. रघुवीर व सौ. अनुश्री भागवत यांनी केले आहे. या सूचीचे पहिले हस्तलिखित सुवर्णा किशोर करंजावणे यांनी अतिशय कष्टपूर्वक तयार केले. राजेंद्र शिवदे यांनी टाइपिंगचे काम केले. या सर्व सहकार्यांच्या योगदानाशिवाय हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे दुरापास्त होते. या व्यासंगी, वयोवृद्ध व्यक्तीची उर्जा व कार्यप्रवणता त्यासाठी प्रेरक ठरली. तसेच वसईतील बसीन कॅथलीक बँकेने, रेव्ह. अतुल अधमकर, बावतीस पेडीकर, नंदाखाल, सायमन लोबो या सर्वांचे अर्थसहाय्य या ग्रंथ निर्मितीसाठी लाभले आहे.
अॅडव्होकेट हर्षवर्धन निमखेडकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो. प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी या ग्रंथाचे महत्व विषद करून दहिवाडकरांची प्रशंसा केली आहे. तर असा हा मौल्यवान ग्रंथ निर्माण करून अनिल दहिवाडकरांनी मराठी ख्रिस्ती साहित्यात मैलाचा दगड ठरावा असे अभूतपूर्व काम केले आहे. त्यांच्या या योगदानास मनापासून धन्यवाद व सलाम करावासा वाटतो.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून आजही आपलं अस्तित्व जिवंत ठेवणारे, ब्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करणारे असे हे अतिशय उत्साही तरुण म्हणजे दहिवाडकरसर. त्यांच्याकडून आमच्या तरुणांनी प्रेरणा, स्फूर्ती घ्यायला हवी. सोशल मिडीयावर दहिवाडकरांची छोटी गोष्ट च्या माध्यमातून सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे त्यांचे मार्मिक स्फुटे, कविता त्यांच्यातील तरल वैचारिक क्षमता, सर्जनशीलता, नाविन्याची दृष्टी निखळ विनोदबुद्धी दिसून येते. अशा या गुणग्राहक, प्रशंसक, अचूक टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीच्या एकूण वर्तनात कुठेही आत्मप्रौढी दिसून येत नाही. किंवा मला मोठे म्हणा, माझी तारीफ करा, मला पुरस्कृत करा, मी किती मोठा! माझ्यात किती क्षमता ? माझे साहित्य ! माझ्या साहित्याची नोंद घ्या असे कुठेही हा बुद्धिवान प्रतिभावंत म्हणतांना दिसून येत नाही. त्यांच्यासोबतच्या अल्प परिचयातून मला तसे आढळून आले नाही. प्रत्यक्षात माझी वा त्यांची आजपर्यंत भेटही झाली नाही.
दहिवाडकरांची विद्वत्ता त्यांनी मिळविलेल्या विविध पदव्यांतून दिसून येते. गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या व आईने समाजसेविकेचे व्रत घेतलेल्या मातापित्याच्या संस्कारातून, सामाजिक बांधिलकी जोपासणारा गुणधर्म त्यांच्या वर्तनातून दिसून येतो. विद्येचा प्रसार करण्याचा व्यवसाय स्वीकारलेले दहिवाडकर म्हणूनच ग्रंथपालाचा धर्म प्रामाणिकपणे निभाऊन वाचक प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, गुजरात, गोवा या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून ग्रंथ विक्रीचे दौरे काढले. त्यासाठी वर्षाला वीस पंचवीस हजार किलोमिटरचा प्रवास केला. एका ग्रंथपालाला आपले ग्रंथालय वाचकाभिमुख कसे करावे, हे त्यांनी उत्तम ग्रंथपालाच्या भूमिकेतून दाखवून दिले. आपल्या पदाला त्यांनी योग्य न्याय दिला म्हणूनच ते ग्रंथपालाची डिग्री संपादन करताना पुणे विद्यापीठात प्रथम श्रेणी मिळवून अव्वल ठरले होते. त्यांच्यातील ख्रिस्ती धर्माचा अभ्यासक चर्चेसमधून प्रवचने देत राहिला. समाजप्रबोधनासाठी त्यांच्यातील कार्यकर्ता मोर्चे काढीत होता. मिशन संस्था व त्यांची मालमत्ता वाचविण्यासाठी लढा उभारत होता. सांस्कृतिक चळवळीचा ध्यास असलेला संस्कृती रक्षक कथाकथन, काव्यवाचन, गीतगायन स्पर्धा, परिसंवादाचे आयोजन करीत होता. साहित्यावर प्रेम करणारा साहित्यिक त्याच्या विकासासाठी अनेक साहित्यिक उपक्रम राबवीत होता. लेखक, वाचक संवाद, भाषांतर शिबिरे, उत्तम ग्रंथांना पुरस्कार, कथालेखन स्पर्धा, होतकरू साहित्यिकांना लिहिते करण्यासाठी अशा योजना राबवीत होता. अशा विविध अभिनव कल्पनांचे आयोजन करीत असतांनाच सामाजिक रोष पत्करून डोळसपणे ख्रिस्ती दलित संमेलने आयोजित करीत होता. त्यातून समाजाची दुटप्पी भूमिका मांडत होता. असा हा संवेदनशील व्यक्ती समाजात नवनव्या संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करीत होता.
अशी प्रचंड उर्जा असलेल्या या वयोवृद्ध अनुभवी, दूरदृष्टी, व्यासंगी, तपस्वी प्रयोगशील प्रतिभावान असलेल्या एक्याऐंशी वर्षे तरुण असलेल्या विविध कंगोरे लाभलेल्या, जीवनाची सखोलता अनुभवलेल्या, मानापमानाचे जहर पचविलेल्या, कुठेही आकसबुद्धी प्रतीत न करणाऱ्या, तरीही स्वाभिमानाने पेटून उठणाऱ्या व्यवस्थेसोबत तादात्म्य पावलेल्या काळाच्या हातात हात घालून निघालेल्या, पुसटशीही नकारात्मकतेची रेषा आपल्या भाळावर वा वर्तनात उमटू न देणाऱ्या सकारात्मक विचार जोपासणाऱ्या या तरुण मनाच्या ज्ञानी पुरुषास मानाचा मुजरा करावासा वाटतो.
आज महाराष्ट्रातून ख्रिस्ती साहित्यिकांची जी पिढी हयात आहे त्यांस प्रगल्भ, सशक्त, अभिमानास्पद, नावलौकिक, ऐतिहासिक करण्याचे काम दहिवाडकरांनी त्यांच्या साहित्यनिर्मितीने केले आहे. या कालखंडातील साहित्यिकांचा मान त्यांनी वाढविला आहे. या कालखंडाचा उल्लेख करताना अनिल दहिवाडकर हे नाव निसंशयपणे अग्रक्रमाने घेतले जाईल, याची आम्हा सर्व साहित्यप्रेमींना खात्री वाटते आहे. त्यांचा हा आदर्श व त्यांचा हा संशोधनात्मक वारसा भविष्यात जोपासण्याची जबाबदारी व प्रेरणा दहिवाडकरांच्या साहित्याचा मागोवा घेऊन मिळेल ही आशा व्यक्त करतो. कारण त्यांनी एक आशादायी चित्र ख्रिस्ती साहित्यिकांसाठी निर्माण केले आहे. साहित्यिक परंपरांचा ऐतिहासिक खजिना आमच्यासाठी त्यांनी स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा या रुपेरी पात्रातून साठवून ठेवला आहे. अशा व्यक्ती आमच्या समाजाचे वैभव, परंपरांचे निवेशक, संस्काराचे केंद्र असतात. म्हणूनच त्यांच्या आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी निरंतर प्रार्थना करावीशी वाटते.