आयज

  •  बेर्नादेत रूमाव, बोरीवली

सामवेदी ख्रिस्ती समाजातील लग्नात ‘आयज’ पाठवण्याचा एक कार्यक्रम असतो. लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी वराकडून वधूसाठी पाठवल्या जाणाऱ्या भेटवस्तू म्हणजे ‘आयज’. त्यात दागदागिने, शालू, अबोलीची मोठी वेणी, नारळ, गूळ आणि केळी यांचा समावेश असतो. दागिन्यात मंगळसूत्र, कर्णफूलं आणि बेसाची (आशीर्वादाची) अंगठी असते. हल्ली त्यात दोन बांगड्या, नाजूक नेकलेस, छोटं मंगळसूत्र अशा आणखीन एक-दोन दागिन्यांची भर पडली आहे. नवऱ्या मुलाची आर्थिक बाजू भक्कम आहे हे दाखविण्याचा त्यात प्रयत्न असतो. अलीकडे तेरा-चौदा हजार किंमतीच्या शालूसोबत आणखीन दोन वजनदार डिझाईनर साड्या पाठविण्याची प्रथा रुढ झाली आहे. लांब कलाबूत असलेली अबोलीची वेणी ही उत्तर वसईच्या लग्नसंस्कृतीची ओळख आहे, तसेच नारळ हे शुभकार्याचे, गूळ हे गोडव्याचे प्रतिक म्हणून पाठविण्याची रीत आहे. काही टारगट व्याहीमंडळी ढेकूळ आणि वा​लाच्या शेंगाची सालं पाठविण्याचा फार्स करतात.

आयज घेऊन येणारी मंडळी ही खास मानाची असते. त्यात मानापमानाचं मोठं नाटक दडलेलं असतं. रीतीप्रमाणे आयज घेऊन येणाऱ्या मंडळीचा आकडा पाच! पण हल्ली त्यात चार-पाच व्यक्तींची भर पडून हा आकडा दहावर गेला आहे. आयज घेऊन कोणाला पाठवायचे ? हा प्रश्न गुद्द्यावरही येऊ शकतो, म्हणून वरमाय या मंडळींना आधीच हेरून ठेवते. आयज घेऊन येणाऱ्या मंडळीत नवऱ्या मुलाचा मामा म्हणजे वरमायचा भाऊ मस्ट असतो. तो नसेल तर मामाचा मान त्याच्या मुलाकडे जातो. नवऱ्याची मावशी, आत्या यापैकी कुणी सिस्टर (नन्) असेल आणि काका, मामा, आते-मामेभाऊ यापैकी कुणी सेमेनरीत असतील तर आयज घेऊन जाण्यात त्यांची हमखास वर्णी लागते. व्याहीमंडळीच्या आर्थिक बाजूबरोबरच आध्यात्मिक बाजू देखील दणकट असल्याची ही मंडळी प्रतिनिधीत्व करतात. त्यानंतर नंबर लागतो तो करवलीचा म्हणजे नवऱ्या मुलाच्या बहिणीचा, भावोजीचा आणि त्यांच्या चिल्ल्या-पिल्ल्यांचा. मामाच्या लग्नात जास्त भाव खाऊन जातात ती ही भाचेकंपनी ! तर आयज चढविण्याच्या कार्यक्रमाची ही कथा.

दूरवरून येणारा बॅण्डचा आवाज आता हळूहळू वाढत होता. आता तो अगदी कानाजवळ वाजत असल्यासारखा वाटत होता. ‘स्टेफीऑ आयेज आलॉ भाटते!’ लग्नघराला कुणकुण लागली आणि लगबग सुरू झाली. उद्या पंचक्रोशीत पाच लग्नं होती, त्यामुळे वाजणारा प्रत्येक बॅण्ड आपल्याच व्याहीमंडळीचा आहे, असं वाटून लग्नघरातील मंडळी कानोसा घेत होती. त्यातच अर्ध्या तासापूर्वी भाटोरी आळीत मन्या मिनेझच्या घरी आयज घेऊन जाणारी मंडळी चुकून बस्त्याव कुण्यातच्या मांडवात घुसली होती. पण चूक ताबडतोब लक्षात येऊन दोन्हीकडून खुशीत असणाऱ्या मंडळीत हास्याचे फवारे उडाले होते. मांडवदारी ‘स्टेफी वेड्स स्टिफन’ आणि ‘वेलकम’ चा बोर्ड लावणारा पोऱ्या अजून आला नव्हता. त्यामुळे आयज घेऊन आलेल्या व्याहीमंडळीची गफलत झाली होती. पलिकडच्या जेवणाच्या मांडवात टेबलावर दोन्ही बोर्ड आमनेसामने येऊन पडले होते. आणि हातोडी, टेक्स विसरलो, पटकन घेऊन येतो असं सांगून बोर्ड लावणारा पोऱ्या केव्हाच सटकला होता. त्याला जावून आता तासभर झाला होता. लग्न सराईचे दिवस म्हणजे त्याच्या कमाईचे दिवस होते. डेकॉरेशनच्या मिळतील तेवढ्या ऑर्डर्स त्यांनी घेऊन ठेवल्या होत्या. आणि आता ऐन वेळी हाताखालच्या मजूरांनी त्याला दगा दिला होता. सगळ्यांना ‘होऽऽ होऽऽ, आता आणतो, आता करतो, पाच मिनिटांत येतो.’ म्हणताना त्याचं पुरं घामटं निघालं होतं.

‘आरे, पयलॉ तॉ बोरड लाऑन घ्या.’ कुणीतरी सूचना दिली.

‘तो बोर्ड लावणारा पोऱ्या कुठे गेला?’ बस्त्याव कुण्यात खिशातून मोबाईल रिसिव्ह करता करता घाईत म्हणाले.

‘तॉस तर शोधित्याव. पण तू घाबरों नका. म्यें त्याला आत्ते फोन लावित्यें.’ गावचा नारायण राजूने सबुरीचा सल्ला दिला. आणि आता मांडवादारात आयज घेऊन आलेली मंडळी आपलीच आहे याची दोन्ही बाजूंनी खातरजमा करून घेतले. व्याहीमंडळी मांडवदारी येऊन ठेपली आणि इच्छित स्थळी डेरेदाखल झाल्यामुळे की काय बॅण्डवाल्यांना स्फुरण चढले. ढोलवाला हात वरती खाली नाचवत ढाम् ऽऽ दुम ऽऽ ढाम् ऽऽ ढुम ऽऽ ढाम् ऽऽ ढुम ऽऽ ढोल बडवित होता. ट्रॅम्पेटवाला बाजाचा मोठा भोंगा सावरित एकदा उजवीकडे अन् एकदा डावीकडे ट्रम्पेट वळवून मध्येच डाव्या डोळ्याची भुवई वर उचलून समस्त बॅण्डवाल्यांना आपल्या तालावर नाचवित होता. त्याचे दोन्ही गाल ट्रॅम्पेटमध्ये हवा भरताना टम्म् फुगत होते. मानेखालच्या शिरा ताणल्या जावून तटतट फुगत होत्या आणि ठसठशीतपणे बाहेर येत होत्या. सारी शक्ती एकवटून तो तालासुरात ट्रम्पेटमध्ये हवा सोडत होता. उद्या संध्याकाळी वरात (नावळ) वळेपर्यंत (मुलीला सासरी सोडेपर्यंत) त्याला बाज्या वाजवायचा होता. हीच कृती पुन्हा पुन्हा करायची होती. फुप्फुसे, गळा आणि ओठ यांचा मेळ साधताना बॅण्ड मास्तर बॅण्ड वाजविण्याचे पंचवीस-तीस हजार का घेतो. हा विचार मी ट्रम्पेटवाल्यापाशी येऊन कोपर्‍यात पचकन थुंकला, पांढरे फटके ओठ पाहून मी माझा ‘महागडा बॅण्ड’चा शोध थांबवला. ओठाच्या चंबूत बारीक पिपाणीची जिवणी पकडून बॅण्डमास्तर सगळ्या पथकावर नजर ठेवून होता. पण साऱ्या बॅण्डचा महाराजा होता तो मोठ्या तोंडाचा ‘टॉ ऽऽ टॉ ऽऽ टॉ ऽऽ ‘ करीत वाजणारा ट्रॅम्पेट !

‘आयज आलाँ वाटाते ?’ म्हणत शेजारच्या पशीकाकीने आपल्या हातातलं काम सोडून दिलं आणि माजघरात चमचा-वाटीने खेळत बसलेल्या नातवाला लगबगीने कमरेवर उचलून घेत ती ओटीवर आली. बॅण्ड वाजत होता. शेजारी-पाजारी पटापट घरातून ओटीवर, हिंदोळ्याजवळ आली आणि बस्त्याव कुण्यातच्या मांडवाच्या दिशेने तोंड करून उभी राहिली. पशीकाकीचा नातू बॅण्डच्या तालावर पाय हलवू लागला. मग नातवाचा हात वरती धरून विधवा पशीकाकीने ताल धरला. ‘टॉ ऽऽ टॉ ऽऽ टॉऽऽऽ’ करीत आजीनातवाची जोडी उभ्या जागी हलू लागली. मांडवदारात बॅण्ड तालासुरात बाजू लागला. बॅण्डकरी दोन्ही बाजूला रांगेत उभे राहिले आणि मध्ये रस्ता तयार झाला त्यातून आयज घेऊन आलेल्या मंडळीना त्यांनी मानाने मांडवाच्या उंबऱ्यापाशी आणून सोडले. पण मांडवदारी नवरीमुलीकडून स्वागताला कुणी उभं नव्हत म्हणून आयज घेऊन आलेल्या मंडळीने आजूबाजूला नजर फिरवली. आयज घेऊन आलेला नवऱ्याचा हौशी मामा फरशा मग सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, ‘आरे, आयज पाय, गा पा नाय. गा आमी तहेस वळते जाव.’ (आयज हवा की नको की आम्ही परत जाऊ).

‘आरे, आमसाँ पॉर पसांद हाय, गा नाय? का हाय ता आत्तेस हांगा रे!’ (अरे आमचा मुलगा पसंद आहे किंवा नाही ते आत्ताच सांगा.) मामाची री ओढत नवऱ्या मुलाचा मोठा भावजी अंद्रेस म्हणाला. त्याबरोबर सगळे जण खीखी करत हसू लागले. मांडवात खसखस पिकली. आयज घेऊन जाणाऱ्यात अशी मज्जा मज्जा करणाऱ्या मंडळीची खास निवड केली जात असे. वेळ मारून नेणाऱ्या, पडल्यास दोन-चार ताशेरे ओढणाऱ्या हजरजबाबी मंडळीची वर्णी आयज नेण्याच्या कार्यक्रमात लागत असे.

‘आयज आलॉऽऽ आयज आलॉऽऽ’ स्टेफी नवरीच्या घरात लगबग सुरू झाली. कामाला वेग आला. मागच्या दारी स्वयंपाक्याला सिलिंडर काढून देत असलेला वधूपिता बस्त्याव कुण्यात मग लगबगीने हात पुसत धावत पळत मांडवदारी आला. आणि ‘सॉरीऽऽ सॉरीऽऽ’ म्हणत त्यांनी हसतमुखाने सगळ्या व्याहीमंडळीशी हातमिळवणी केली. त्यापाठोपाठ मोठा शेंडा त्यावर कलाबूत घातलेला अबोलीचा झेल्ला, काठपदराची साडी, गळाभर दागिने आणि कोपऱ्यापर्यंत सोन्याच्या बांगड्यांनी लगडलेली नवरीची (आय) वधूमाय साडीच्या निऱ्या सावरीत चटचट पुढे आली. तोंडभर हसू पसरवित तिनेदेखील सगळ्यांशी हस्तांदोलन केले आणि व्याहीमंडळीला मानाने आत आणून मांडवात बसवलं. ऐंशी-नव्वदच्या दशकापर्यंत मांडवात मोठ्या लाकडी फलाटी असत. खास बॅण्डवाल्यांसाठी त्या राखून ठेवलेल्या असत. मांडवाच्या एका कोपऱ्यात खास नवी कोरी सोलापुरी चादर अंथरूण एक खाट कायम सज्ज केलेली असे. व्याहीमंडळी मांडवात आली की हक्काने खास राखून ठेवलेल्या या बाजेवर बसत. नव्या चादरीचा नवा कोरेपणा सिद्ध करण्यासाठी चादरीवरचा गोलाकार आणि आयताकृती स्टॅम्प काढण्याची तसदी कुणीही घेत नसे. ते काम बच्चेकंपनी येता जाता करीत असत.

बॅण्डकरी मांडवात आले. स्थानापन्न झाले. बॅण्ड वाजू लागला. आवाज घुमू लागला, त्या आवाजानी कोण काय म्हणतं, काय सागतंय, कोणती सूचना देतो, सगळं सगळं ऐकू येईनासं झालं. एक एक गोष्ट चार-चार वेळा कानात मोठ्यांनी सांगावी लागू लागली, तरीदेखील कुणी वैतागत नव्हतं. चिडत नव्हतं. आयज आला म्हणजे धावपळ मस्ट ! गरज असो किंवा नसो. पण उगीच आपली पळापळ लगबग सुरू होते. पूर्वानुपार चालत आलेली ही रीत!

बॅण्ड वाजत होता. त्यांना हुरूप यावा म्हणून नवरीकडील एक-दोन हौशी-नवशीमंडळी, साळकाया-माळकाया मांडवात उतरल्या आणि त्यांनी फेर धरला. नवश्याने बॅण्डवाल्यांना थांबवलं आणि आपल्या पसंतीचे गाणे तो पेश करु लागला.

‘स्टेफीच्या ओटीवर चप्पल कुणाशें

स्टिफन गॅलॅ कामाला.. स्टेफी चप्पल कुणाशें..’

‘आरे, तॉ नाय… तॉ नाय… मॅ हांगाते तॉ गाणॉ वाजवा.’ हवश्या म्हणाला.

बॅण्डकरी थांबले आन् गाण्याची फर्माइश ऐकू लागले. पण हवश्या नवश्यात एकमत होत नव्हतं. एक म्हणतो मी सांगितलेलं गाणं वाजवा तर दुसरा म्हणतो आधी माझी फर्माइश पूर्ण करा. या दोघांच्या जुगलबंदीत बॅण्डवाल्यांना आपसूक पाच मिनिटांचा ब्रेक मिळाला. तेवढ्यात खुळखुळा वाजविणाऱ्या मिंग्याने तंबाखूची गोळी करून गालाखाली सरकवली. ट्रम्पेटवाल्याने ट्रम्पेटची तोटी जमिनीच्या दिशेने हलवून त्यात गेलेली भुंकी बाहेर काढली. ढोलवाल्याने शर्टची कॉलर मागे सरकवून खांद्या-मानेवरचा घाम पुसला. बॅण्डमास्तरने सुवर्णमध्य काढत पिपाणी तोंडात घातली. साळकाया-माळकाया खुशीत येऊन नाचू लागल्या. ओटीवरून, हिंदोळ्यावरून न नाचणारी मंडळी त्यांना निरखू लागली.

व्याहीमंडळीतील स्त्रियांची नजर दाराकडे लागली होती. नवरी मुलगी कधी बाहेर येते, कशी दिसते बरं, साडी कोणती नेसली, मेकअप आणि दागिने कसे आणि कोणते याकडे लागली होती. आतल्या खोलीत ब्युटिशियन नवरीला सजवण्यात गुंतली होती. बॅण्डचा आवाज कानी येताच तिच्या कामाला वेग आला होता. तिच्या अवती-भोवती नवरीच्या आते, मामे, चुलत बहिणींचा गोतावळा जमा झाला होता. प्रत्येक जण नवरीला काय उठून दिसतं, कोणती हेअरस्टाईल, कोणता रंग उठून दिसेल यावर आपआपली मते, सूचना देत होते.

‘स्टेफी एकदम भारी दिखाता हा!’ एकजण म्हणाली.

‘मग, ती भाशी कुणाई हाय ?’ मामीने तोंड घातलं.

‘स्टेफीला नाय मेकअपशी गरज ना दागिन्याई.’ इतका वेळ थांबून राहिलेली नवरीची मावशी म्हणाली. स्टेफीने जराही मान न हलवता केवळ हसून सर्वांच्या सदिच्छांचा, शुभेच्छांचा स्वीकार करीत होती आणि ब्युटिशियनच्या सूचनांचे पालन करीत होती. तिचे डोळे हसत होते. शरीर हसत होते. आनंदाचे कारंजे जणू तिच्या अंतःकरणात उचंबळून आलं होतं. तोच लगबगीने वधूमाय आत आली, ‘स्टेफी, जाली गा तयारी? शोभा जरा हात चालव. व्याहीमंडळींना घाई हाय.’

‘हं…. हं…. झालं आता. एवढा ब्रूच लावते की नवरी तयार. फक्त पाच मिनिटं लागतील.’ शोभा ब्युटिशियनने आश्वासन दिले. एवढ्यात स्टेफीचा दीड-सव्वा वर्षाचा लाडका भाचा आईच्या हातातून टेपीमावशीकडे झेप घेऊ लागला. सगळ्यांचा लाडका पहिला वहिला एकुलता एक भाचा. पण आज टेपी मावशीला त्याच्याकडे पाहायला सवड नव्हती. सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या छोटूची जागा आज मावशीने घेतली होती. थोडी वाट पाहून त्याने ठेवणीतले अस्त्र काढलं. ‘प्रिया, त्याला रडवॉ नाका.’ स्टेपी मावशी गहिवरली. तिने लाडक्या भाच्याला कौतुकाने मांडीवर घेतले. तसा तो लबाड शांत झाला आणि खुदकन हसू लागला. ‘बोयले ना माय मरो, आन् मावशी जगो.’ छबी मावशीने जगाचा नियम सांगितला.

तेवढ्यात नवरीच्या छोट्या मावशीची तरातरा एन्ट्री झाली. ‘शोभा, आते जॉला तॉडॉ मेकअप बास् जालॉ लवकर बार सला. आयज सढव्यासा वारणा कऱ्यादो गावात जा लागे. सल पटकन.’ भाचीला पुढे लावून मावशी मागे चालू लागली. मावशी भाची गावात वारणं करायला गेली. मधली मावशी व्याहीमंडळीच्या जेवण्याच्या तयारीला लागली. सोबत मदतीला बस्त्याव कुण्यातची बहीण आली. ती उकडलेली अंडी सोलू लागली. मामी अॅपल कापून त्याच्या प्लेटी भरू लागली. मामा गारेगार बियर घेऊन आला. नारायण राजूने एकवार खोलीत डोकावून व्याहीमंडळीच्या चहा-पाण्याची व्यवस्था नीट आहे किंवा नाही याची चाचपणी केली. आणि लगबगीने मागल्या दारी निघून गेला. तेथून त्यांनी जेवण्याच्या प्लेटस्, टिश्यू पेपर, चिकन, मटन, भात, पाव ह्याचे बोळ भरून आतल्या खोलीत पाठवले आणि सगळं मावशीच्या हाती सुपूर्द केल्याची खातरजमा करीत म्हणाला, ‘काही लागलं सवरलं तर सांगा, मी मागल्या दारी कूकच्या बाजूलाच आहे.’ नारायण जसा लगबगीने आला तसाच निघूनही गेला. आयज आल्यापासून मामा, मावशी, मामी, काका, काकी, आत्या यांना दिलेली प्रत्येक छोटी मोठी जबाबदारी मानाची होती. त्यामुळे कोण, केव्हा, कधी, कसा दुखावेल याची गॅरंटी नव्हती. बस्त्याव कुण्यात आणि सांतानबायने सगळ्या गोष्टी हसत हसत घेण्याचे आधीच ठरवले होते. पंधरा दिवसापूर्वी कुमारी-कुपारीचं जेवण झालं, त्या दिवशीच दोघांनी मिळून कामाची वाटणी पक्की केली होती. प्रत्येक लग्नात नातेवाईकांचे रूसवे फुगवे सांभाळणं हे माथ्यावरचा झेल्ला आणि गळ्यातील मणभर दागिने सांभाळण्यापेक्षा भारी होतं. ‘खूपदा भीक नको, पण कुत्रं आवर’, अशीच वरमायची अवस्था असायची. पहिल्या लग्नाच्या अनुभवातून वरमाय आता शिकली होती.

नवरी मुलगी स्टेफी, बेस्ट गर्ल मावशीसोबत मांडवात उतरली. तेव्हा तिच्या बदललेल्या रूपाकडे सगळे जण टक लावून पाहू लागले. नवरीने सगळ्यांशी हस्तांदोलन करून हसतमुखाने सर्वांचे स्वागत केले. आणि मावशीला सोबत घेऊन ती गावातील प्रत्येक घराघराची पायरी चढू लागली. प्रत्येक दारात दादय, काकय छान तयार होऊन केवळ नवरीमुलीचं आमंत्रण स्वीकारण्यासाठीच दारात उभ्या होत्या. ‘आयज सडव्यासा वारणा’ प्रत्येक घराच्या पायरीवर चढून नवरीने व्यक्तिशः आमंत्रण दिले. चौथ्या घराची पायरी चढताना स्टेफीला रडू कोसळलं. आज या गावातला शेजोळ्यातील तिचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर ती या गावात ‘पाहुणी म्हणून’ येणार होती. उद्यापासून हे सगळे ऋणानुबंध, प्रेमळ माणसं आणि हा सर्व गोतावळा मागे सोडून तिला सासरी जायचे होते. केवळ या विचाराने तिला भरून आले व तिच्या डोळ्यातून आसवं गळू लागली. ‘स्टेफी, ई का? आज रड्यासा नाय. उद्या हांशेपारा नावळ डेवरताना ई सगळा कऱ्यासा.’ नवरीची मावशी तिला समजावू लागली. जणू काही गळा भरून येणं, डोळ्यांतून आसवांचा पूर येणं हे रंगमंचावर नाटक वठविण्यासारखं होतं जणू!

सगळ्या आळीत घराघराची पायरी चढून स्टेफीने आयज चढविण्याचं आमंत्रण दिलं आणि मावशी सोबत ती मांडवात परत आली. तोपर्यंत ओटीवर एकासमोर एक खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. त्यावर स्वच्छ नवे कोरे टर्किश टॉवेल टाकलेले होते. आयज चढविण्याची पूर्वतयारी झाली होती. त्यानंतर एका खुर्चीत नवरी मुलगी स्टेफीला बसवण्यात आलं. दुसऱ्या खुर्चीत मुलाचा मामा बसला. जुन्या जाणत्या बायकांनी ताल धरला. नव्या लग्न झालेल्या सुना-लेकी कानांनी गाणं ऐकू लागल्या. पण त्यांची नजर स्टेफीच्या आयजाकडे लागली होती. आयज चढविण्याच्या विधीची सगळेजण आतुरतेने वाट पाहू लागले. स्त्रियां लग्नगीतं गाऊ लागल्या.

‘आयज घेती, आयल्यात गे सखे,

सासरे गे, सखे मामसासरे गे,

पायाला वाळे घेऊन आयल्यात गे सखे,

सासरे गे सखे नंणदोये’.

मामाने नवरीच्या कानांत कुडे घातली. त्याचे मळसूत्र मावशी फिरवू लागली. मामाने मंगळसूत्र, अंगठी उपस्थितांना दाखवून ती वरमायच्या हाती दिली. मग नवरीची नणंद पुढे आली. तिने नवरीच्या पायांत पैंजण घातली आणि शालूची घडी मोडून ती नवरीच्या उजव्या खांद्यावर ठेवली आणि तोंडभर हसून फोटोसाठी छान पोझ दिली. सिस्टर मावशीने दुसरी डिझायनर साडी नवरीच्या डाव्या खांद्यावर ठेवली व कपाळावर पवित्र क्रुसाची खूण काढण्याची अॅक्शन करीत फोटो काढला. उरलेल्या पिशव्या मामाने नवरीच्या आत्याच्या हातांत सुपूर्त केल्या. आयज घालण्याचा कार्यक्रम उरकला. व्याहीमंडळीकडून आलेला मोठा अबोलीचा झेल्ला मावशीने फ्रीजमध्ये नेऊन ठेवला. नवरीच्या आत्याने शालू व इतर साड्यांच्या पिशव्यांचा ताबा घेतला आणि सगळ्यांच्या साड्या पाहून झाल्यानंतर त्या व्यवस्थित घड्या घालून संबंधित बॉक्समध्ये ठेवल्या. नारळ, गूळ, केळ्याची पिशवी स्वयंपाक घरात गेली. आयजाच्या पेट्या वरमायने नीट कपाटात ठेवल्या आणि चाव्या पुन्हा कमरेला लावल्या. व्याहीमंडळीचा ताबा नवरीच्या आतूच्या नवऱ्याने घेतला. त्याच्या मदतीला मावशी होती. एका मोठ्या प्रशस्त खोलीमध्ये जेवणाची, चहापानाची जय्यत तयारी केली होती. कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, उकडलेली अंडी छान कापून प्लेट सजवलेल्या होत्या. ते पाहूनच व्याहीमंडळीची तब्येत खूष झाली. जेवणं आटोपली. बॅण्डकरी सरबत घेऊन गार झाले होते. ते नव्या दमाने वाजवू लागले. जेवून तृप्त झालेली व्याहीमंडळी मग आनंदाने निघून गेली. जेवण मंडपात गावकऱ्यांच्या पंक्ती उठू लागल्या. लग्नाचा पहिला विधी सुखरूप पार पडला. तसं बस्त्याव कुण्यातने आपलं लक्ष जेवण मंडपाकडे वळवलं.

‘सगळं पुरेसं आहे ना? काही कमी वगैरे…?’

‘’कय काळजी करो नाका. म्यँ सगळा अडे बघिते. तू एकदम निरधास्त रे.’ नारायण राजूने छातीवर हात ठेवत जेवणाविषयी निश्चिती दर्शविली आणि पहिला दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे बस्त्याव कुण्यातने देवाचे आभार मानले व उद्याची पुढची सगळी सूत्रे देवावर सोपवून तो आपल्या जवळच्या नातेवाईकांसमवेत शेवटी भोजनास बसला.