आणि कॉफीचे पैसे वाचले
- जगदीश अनंत संसारे, मुंबई
खिशात काही नसले तरी आमचे ख्वाब मात्र नवाबी होते. ही गोष्ट आहे जेव्हा आम्ही मित्र पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठात आलो आणि वाकोला ब्रीज (याविषयी नंतर कधीतरी सांगेनच) तिथे पत्र्याच्या चाळीमध्ये रहात होतो. आमच्या मध्ये एक मित्र अतिशय देखणा, उमदा होता पण तो आमच्या बरोबर राहत नव्हता. तो राहत होता किंग्ज सर्कलला आणि त्याचं नाव ‘राजू’. नुकताच त्या वेळेला ‘राजू बन गया जेंटलमॅन’ हा पिक्चर आला होता. आम्ही त्याला चाळीतील शाहरुख म्हणत असू! सकाळीच नव्हे तर रात्री अपरात्री कधीही उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण मोबाईल पाहतो तो मात्र केस विंचरायचा, पावडर लावायचा. कुठे जातोय पट्टया? असा प्रश्न झोपेतच आम्हाला पडायचा. पण मस्त वाटायचं त्याला पाहून. ‘जगावं कसं मस्त मजेत’! याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे आमचा राजू! दिसायला चिकना-चोपडा असल्यामुळे महाविद्यालयात… लय फेमस होता.
अरे हो! हे सांगायचेच राहिले राजू आणि मी दिसायला बरेच सारखे होतो. पण माझ्यापाठी कोणी पोरी मात्र पडल्या नाहीत; चार हात लांबच राहिल्या. राजुला मात्र आज एक तर उद्या दुसरी असं त्याचं नशीब असायचं. महाविद्यालयात तो मला एक वर्षाने दादा (सिनियर) होता. आम्ही एकत्र फिरत असू. राजुच्या सगळ्या प्रकरणांचा मी साक्षीदार होतो. कधी ? कुठे ? कशी ? पोरगी पटवली हे माझ्याशिवाय कदाचित राजुलाही ठीक माहीत नसेल.(अतिशयोक्ती) आज मी तुम्हाला, अशा या राजूची ‘फटकेदार’ कहाणी सांगणार आहे.
पत्राचाळीत आम्ही जेव्हा राहत होतो तेव्हा राजू राहत होता किंग्ज सर्कलला. त्यांचं बी.एड. झाले होते. नोकरी मिळेपर्यंत मस्त कुठेतरी आपलं भटकायचं असा त्याचा उद्योग असायचा. आम्ही मुंबईत आल्यानंतर तो नित्यनियमाने संध्याकाळी वाकोल्यात यायचा. त्याला काही तिकीट काढायची आवश्यकता नव्हतीच. रेल्वेचा जावई असल्यासारखा तो तोऱ्यामध्ये किंग्ज सर्कल ते सांताक्रूझ व्हाया वडाळा रोड असा प्रवास करत असे. कधीच पकडला गेला नाही, हे विशेष! व्यक्तिमत्त्व बघा असं असावं लागतं की, समोरच्याला वाटलं पाहिजे, की याच्याकडे तिकीट असणारच.
तर मित्रांनो एका संध्याकाळी (रम्य म्हणावं की नाही हा तुमचा प्रश्न ) कारण ती संध्याकाळ मार खाण्याची होती, असे तुम्हाला पुढे कळणारच आहे. नित्यानंद नावाचं वाकोला ब्रिजच्या थोडं पुढे गेल्यानंतर एक हॉटेल आहे. आमच्या तिघांच्या म्हणजे राजू-संजू आणि मी आमच्या खिशात दमडी नव्हती. कॉफी प्यायची मात्र प्रचंड इच्छा निर्माण झाली होती. त्या नित्यानंद मधली ‘नेसकॉफी’ भारीच असायची. आज धाडस करून मी म्हटलं, “चला थोडे पैसे माझ्याकडे आहेत मी पाजतो कॉफी”. दोघंही बागेतल्या कारंजासारखे उसळले आणि थुईथुई नाचायला लागले. मग वाकोल्यापासून रमत-गमत गप्पा मारत मारत दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत टिपत मी नित्यानंदपर्यंत पोहोचलो.
आम्ही आपल्या कोपऱ्यातलं टेबल पकडलं आणि तिथे जाऊन बसलो. राजूच्या म्हणण्यानुसार कोपऱ्यातलं टेबल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जणू टेहाळणी बुरुज असतात. तिथून म्हणजे गडावरून जसं येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवता येतं तसं या टेबलवरून अख्ख्या हॉटेलवर लक्ष ठेवता येतं. कोण? कुठे? बसलय, (म्हणजे कोण कुठेsss बसली आहे.) किती चिकणी आहे? कोणाबरोबर आली आहे? याचं सगळं निरीक्षण हे तिथून करता येतं. थोड्या वेळाने वेटर आला. त्याला वाटले तीन बरे दिसणारे आपल्याकडे आले आहेत. जरा चांगली टीप मिळेल. ऑर्डरशी तसं काही त्याच देणं घेणं नव्हतं. पण टीप मिळेल याची खात्री त्याला होती. अगदी अदबीने आम्हाला त्याने विचारलं, “साब जी क्या लाऊ आपके लिये?” (महाराष्ट्र सर्व भाषिकांना वाव देतो) त्याची अदब पाहून माझ्या मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. मी बिल देणाऱ्या आवाजात म्हटले,”दो कॉफी लाओ, तीन मे!” (आम्ही अस्सल मराठी बरं का!) पाठमोऱ्या वळलेल्या वेटरचा चेहरा वाकडा झाला असेल, हे माझ्या लक्षात आले.
कॉफी यायला बराच वेळ होता म्हणून राजूला पोरी निरखून बघायला बराच वेळ मिळाला. अन्यथा हॉटेलमध्ये जास्त वेळ बसता येत नाही ऑर्डर मिळेपर्यंत आणि आपलं पुढ्यातलं खाऊन-पिऊन होईपर्यंत आपण नक्की बसू शकतो. पाच ते सात मिनिटं आम्ही (संजू आणि मी) आपल्या गप्पा मारत बसलो होतो. राजू कोणाकडे एकटक लावून पाहतोय? म्हणून मी वळून पाहिलं. मी वळून पाहताच आमच्या मागच्या टेबलवरची पोरगी जिच्यावर राजूचा नयन कॅमेरा रोखला गेला होता. ‘ती’ चवताळून उठली आणि म्हणाली, “हलकट, कुत्र्या, मेल्या काय बघतोस ? कधी पोरी बघितल्या नाय का ?” माझी भंबेरी वळाली. मी तर तिच्याकडे आताच बघितलं होतं, आली उठून सरळ राजूची कॉलर पकडली आणि राजुला अद्वातद्वा बोलू लागली.
आता राजूची बोबडी वळली. आपल्या मेहुणीकडे कोणीतरी बघतोय हे जेव्हा तिच्याबरोबर असलेल्या भाऊजींना कळलं तेव्हा त्यांनी थेट मोर्चा राजूकडे वळवला. आता हमरा-तुमरीचा प्रश्न आला. मध्यस्थी करण्या इतका प्रौढ, प्रगल्भ, थोर विचारवंत आमच्या तिघांमध्ये मीच होतो. (स्वतःची पाट थोपटून घेतली!) उठलो आणि उसने अवसान आणून विचारले, “काय झाले?””माझ्या मेहुणीकडे हा टक लावून पाहतोय मगाचपासून!” वकीली थाटात मी म्हटले,”भाऊ, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? तुमच्या मेहुणीला कसं बरं कळलं, की तो टक लावून पाहतोय?” (काही पोरी काही कमी नसतात!) या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी मेहुणी आणि भाऊजी दोघेही गारच झाले. तेवढ्यात त्या मेहुणीची बहीण म्हणजे भाऊजीची बायको उठली आणि तिला म्हणाली, “आलीस तू मोठी पतिव्रता, सतीसावित्री! तू काही कमी नाहीयेस. चल उठ इथून. जिथे जाते तिथे तमाशा करते.” जाता जाता बरंच काही माझ्या कानावर पडलं.
राजू चक्क माझ्या पाया पडला आणि म्हणाला, “जगू धन्य झालो. माझ्यावर फार उपकार केलेस. तू नसतास तर फटकेच खाल्ले असते.” (संजू काही कामाचा नाही, राजूला असेच म्हणायचे असावे) ‘मी’ लगेच फुलटॉस पडलेल्या चेंडूवर हिटमॅनचा पूल शॉट षटकार ठोकला आणि राजुला कॉफीचे बिल भरायला लावले. त्यानेही शंभराची कोरी करकरीत नोट (कदाचित शेवटची असावी.) ती काढली आणि वेटरकडे सरकवली. मला खूप बरे वाटले…. राजूचा मार वाचला म्हणून नव्हे तर माझे कॉफीचे पैसे वाचले म्हणून!
या प्रसंगातून मी एक गोष्ट शिकलो! कुणाकडे (पोरीकडे) बघत बसण्यापेक्षा, निसर्गाकडे बघत बसावे, रस्त्याकडे बघत बसावे; वाहतुकीकडे बघत बसावे; आणि मस्त आनंद लुटावा. कॉफी पित पित ‘जगावं कसं मस्त मजेत!’