अवघे धरू पंथ –  स्टॅन्ली गोन्सालविस

अवघे धरू पंथ!

  •  स्टॅन्ली गोन्सालविस.

(stanleyg2013@gmail.com)

         आज बँकेचा स्थापना दिवस साजरा होणार होता. रविवार असूनही कर्मचारी कामावर असल्याप्रमाणे तयारीत गुंतले होते. मुख्यालयातील सभागृहात तो रितीप्रमाणे साजरा होणार होता. व्यासपीठावर एका बाजूला बॅंकेच्या संस्थापक धर्मगुरूंचा अर्धपुतळा ठेवण्यात आला होता. समोर फुलांची सजावट होती. समई तेवत होती. मागे बॅकड्रॉपवर बॅंकेच्या नावाचा फ्लेक्स झळकत होता. 

         चेअरमनसाहेब अभ्यास दौर्‍यावर परदेशात गेल्यामुळे ज्येष्ठ संचालक व उपाध्यक्ष पास्कोल ह्यांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बहाल करण्यात आले होते. संचालकपदाची मुदत संपत आली होती. दोन-तीन महिन्यांत निवडणुका लागण्याची शक्यता होती. त्यामुळे पास्कोल हाती आलेल्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आमंत्रण त्वरित स्वीकारीत असत.

         बॅंकेच्या महाव्यवस्थापक उर्फ सीईओंना काही तांत्रिक कारणांमुळे दीर्घ मुदतीच्या रजेवर जावे लागल्याने सीनियर साहाय्यक महाव्यवस्थापक परेरा कार्यभार सांभाळीत होते. सभागृहाच्या दारात ते व दोन संचालक – एडवर्ड आणि डिकुन्हा पास्कोल साहेबांची वाट पाहत उभे होते. सधन शेतकरी डिकुन्हाला ‘आर्थिकदृष्टय़ा दुर्बल’ गटातून संचालक मंडळावर आणण्यात पास्कोल ह्यांचा मोठा हातभार होता. दहावी पास ‘इंडीपेंडन्ट’ संचालक एडवर्डला संचालक मंडळात पास्कोलशिवाय कोणाचाच आधार नव्हता. पास्कोलनेच त्याची दोन-तीन कमिट्यांवर वर्णी लावली होती. कर्जवसुली कमिटीवर असल्यामुळेच त्याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा भाग्योदय झाल्याचे इतर संचालक खासगीत बोलत असत.

         “वेलकम, सर!” डिकुन्हा व एडवर्ड इतरांना ढकलून पुढे आले आणि त्यांनी पास्कोलशी हात मिळवले. परेरासुद्धा पुढे येऊन वाकून कुर्निसात करीत म्हणाले, “सर, थोडा उशीरच झालेला आहे. आपण स्टेजवरच जाऊ…”

         तिकडे सूत्रसंचालिकेने उपस्थित संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती केली. संस्थापक धर्मगुरूंच्या अर्धपुतळ्याला हार, समई प्रज्वलनाची औपचारिकता पूर्ण झाल्यावर सीनियर मॅनेजर इझाबेल मॅडमनी प्रास्ताविक सुरू केले. बॅंकेची स्थापना वगैरे बोलून झाल्यानंतर तिने सभाध्यक्षांचे लाडीक आवाजात कौतुकपुराण सुरू केले. ते ऐकून पास्कोलना अगदी गुदगुल्या होऊ लागल्या. तिचा एच. ओ. ला बदली मागणारा अर्ज आपल्या टेबलावर आल्याचे त्यांना आठवले. त्यांनी मनोमन त्यावर ओके असा शेरा मारून टाकला!

         सभागृहात कुजबुज वाढलेली पाहून इझाबेल मॅडमनी आपले प्रास्तविक आवरते घेऊन कार्यकारी सीईओ परेरा ह्यांना बोलण्याची विनंती केली. परेरांना आज प्रथमच व्यासपीठावर झळकण्याची संधी मिळाली होती. टायची गाठ नीट करीत ते उठले आणि आपल्या काळात बॅंकेचा टर्नओव्हर किती वाढला आहे, एनपीए कसा खाली आला आहे वगैरे आकडेवारी वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यावर कोपर्‍यातून टाळ्या वाजल्या. त्या टाळ्यांना आणखी प्रतिसाद मिळाल्याचे पाहून परेरा थॅंक्यू म्हणत खाली बसले.

         “आता अध्यक्ष महोदय आपले मनोगत व्यक्त करतील”, असे म्हणून इझाबेल मॅडमनी अध्यक्षांकडे पाहिले. पास्कोल चपापले. स्थापना दिन म्हणजे संस्थापकांबद्दल बोलणे भाग होते. पण एकूण गडबडीत त्यांना त्या व्यक्तीचे नाव -गाव, कार्य काही आठवेना. ते एक धर्मगुरू होते, एवढेच त्यांना ठाऊक होते. त्यांनी समोरच्या अर्धपुतळ्याकडे नजर टाकली. पुतळे काहीच बोलत नसतात. आपणच त्यांच्या मुखी सोयीने काही घालायचे असते, ह्या जाणिवेने ते अजून गडबडले. तशा तालुक्यातील सर्वच सहकारी संस्था कोणी ना कोणी फादरनीच स्थापन केलेल्या असल्याने त्यांना हे फादर नक्की कोण हे काही आठवत नव्हते.

         त्यांनी हळूच डावीकडे बसलेल्या परेरांना विचारले.

         “सर, तुम्ही मघाशी ज्या पुतळ्याला हार घातला ना तेच! ते समोर पाहा!” परेरा मोठ्या खुबीने आपले अज्ञान लपवित म्हणाले.

         “ते ठाऊक आहे मला… नाव सांगा… नाव त्यांचं…” ते तोंडावर हसत, पण मनातून चडफडत म्हणाले.

         तेव्हा परेरा पास्कोलच्या कानाला लागून घाईघाईत म्हणाले,” रेव्हरंड फादर असे म्हणा… धर्मगुरूंचा त्याग, थोरवी, दूरदृष्टी असे काहीतरी द्या ठोकून… चालून जाईल बघा! “

         पास्कोल मान डोलवत उठले. ‘आपली बॅंक’ व ‘आपले फादर’ हे इतरांप्रमाणेच त्यांचेही अगदी जिव्हाळ्याचे, म्हणजेच जिभेवरचे विषय होते. चारचौघांत ते ह्या विषयावर अगदी न थकता बोलत असत. त्यामुळे आज त्या संस्थापकांबद्दल बोलताना त्यांना अगदी भडभडून आले. ते ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले व त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला! पास्कोलनी लांबूनच पुतळ्याला नमस्कार केला व ते खाली बसले.

         त्यानंतर आणखी काही भाषणं, आभार प्रदर्शन वगैरे होऊन कार्यक्रम आटोपला.

         एरवी कार्यक्रम पत्रिकेवर अखेरचा विषय ‘चहापान’ असायचा. पण योगायोगाने रविवार आल्याने ‘भोजन’ असा विषय होता. उपवास काळ चालू असल्याने भोजन ठेवावे की नको ह्यावर बराच काथ्याकूट झाला होता. त्यावर नेहमी ताबोर, वेलंकनी असे नोव्हेने करणारे व आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर दररोज आजचे वाचन, धर्मगुरूंची प्रवचने इ. टाकणारे धर्मपरायण संचालक श्री. रॉय ह्यांनी अशी राय दिली की, रविवारचा दिवस उपवास काळात गणला जात नाही. तो भले ‘कायद्याचा दिवस’ असला तरी ‘फ्री’ असतो! त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि भोजनाचा ठराव बहुत जनांच्या एकमताने संमत झाला!

         त्यामुळेच आज उपस्थिती शंभर टक्के होती. हा सर्व खर्च ‘चहापान’ हेडखाली जाणार असल्याने अकाऊंटंट मॅडमनी खाण्या ‘पिण्याच्या’ व्यवस्थेत हात ढिला सोडला होता.

         मीटिंग संपताच कर्मचारी वर्ग तत्परतेने कामाला लागला. राऊंड टेबलांची झटपट व्यवस्था झाली. टेबलांवर सोडा, पाणी व ग्लास ठेवण्यात आले. संचालक आपापल्या ‘जातीचे’ दोस्त निवडून कोंडाळे करून बसले. संचालक – अधिकार्‍यांचे रंग न्याहाळता येतील, पण कोणाशी नजरानजर होणार नाही ह्या बेताने स्टाफचे लोक थोड्या कोपर्‍यात जागा पकडून बसले होते. काही चलाख कर्मचारी पुढे-मागे आपल्या कामाला येतील अशी माणसं हेरून त्यांच्या सेवेसाठी आजूबाजूला घुटमळत होते. महिला वर्गाने स्टेजजवळचा आडोसा घेऊन दोन-तीन टेबले जोडून आपला ग्रुप जमवला होता. एरवीप्रमाणे एकमेकींच्या साड्या, अलंकार ह्यांऐवजी त्या संचालक व अधिकाऱ्यांचे गट आणि त्यांच्या पुढ्यातील द्रव्याचे रंग ह्यावर बारीक लक्ष ठेवून होत्या.
         बॅंकींग तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेली संचालिका मिस अंजली लग्नाला जावं तशी शालू नेसून, नटून थटून आली होती. महिला स्टाफकडे ढुंकून न बघता पुढच्या टर्मला आपल्याला व्यवस्थापक मंडळावर घेण्यासाठी कोण डायरेक्टर उपयोगी पडतील ह्याचा तज्ज्ञाच्या नजरेने धांडोळा घेत हॉलभर फिरत होती. अनेकांच्या नजरा तिच्याकडे वारंवार वळत होत्या आणि दृश्यमान वळणांवर खिळत होत्या. पण तिच्याशी अशी किंवा ‘तशी’ सलगी नजरेत आल्यास बॅंकभर तो चर्चेचा विषय होण्याची धास्ती असल्याने प्रत्येक जण आपापली सभ्यता सांभाळीत डोळ्याच्या कोपर्‍यातून तिला टिपत होते.

         आणखी एक बॅंकींग तज्ज्ञ (निवृत्त मॅनेजर, एसबीआय) श्री. सिल्व्हा गंभीर मुद्रा करून दुसरे एक संचालक घोसाल मास्तर (तिसरी खेप उर्फ टर्म आणि त्यामुळे साहजिकच स्वतःला बॅंक तज्ज्ञ समजणारे) ह्यांच्याशी आरबीआयच्या नव्या तिमाही पतधोरणावर तावातावाने चर्चा करीत होते. आपण तज्ज्ञ आणि आर्थिक विषयाचे जाणकार असल्याचे दिसूनही यावे म्हणून ते आटोकाट प्रयत्न करीत इंग्रजीमिश्रीत मराठीत बोलत होते. हातातील ग्लास काठोकाठ भरलेला असल्याने त्यांचे बोलणे थांबत नव्हते. त्यामुळे इंग्रजी शिकवण्याचा थर्टी फाइव्ह इयर्स एक्स्पिरियन्स असूनही आपल्याला सिल्व्हांचे इंग्रजी समजत नसल्याने घोसाल मास्तर कमालीचे वैतागले होते.
         तिकडे पास्कोल आपण अजून अध्यक्षपदाच्या खूर्चीत असल्यासारखे सर्वांची ख्यालीखुशाली विचारीत फिरत होते. ते समोर येताच महिला हात जोडून उभ्या राहिल्या. पण त्यांनी हात न जोडता प्रत्येकीचा हात हाती घेत हस्तांदोलन केले व शुभेच्छा दिल्या. पाठोपाठ आलेल्या एडवर्ड आणि डिकुन्हानेसुद्धा हात पुढे केले, तेव्हा सगळ्या जणींनी दोन्ही हात जोडून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला!

         त्यांना पाहून पास्कोलच्या कपाळावर आठ्या चढल्या. आपल्याला चिकटू पाहणारी ही ब्याद कशी कटवावी ह्या विचाराने ते हसत म्हणाले, “तुम्ही प्लीज, आपल्या डायरेक्टर लोकांची व्यवस्थित सोय होतेय का पाहा ना… च्यायला, नायतर मीटिंगमध्ये पकडतील माझा गळा… “

         “येस…. येस सर…” असं म्हणून ते दूर झाले. पास्कोल हॉलभर फिरू लागले. माजी चेअरमन प्रवीणदादांना पाहताच त्यांनी आपला मोर्चा त्यांच्या टेबलाकडे वळवला. समाज विकास पॅनेलचा तो म्होरक्या. बडा डेव्हलपर असल्याने समाजविकासाबरोबर स्वयंविकासाची त्याने उत्तम सांगड घातली होती. हात ढिला सोडीत असल्याने अनेक संचालक त्याच्या मुठीत होते. मागील दोन टर्म तो जवळपास बिनविरोध निवडून आला होता. आताही तसाच येईल. चेअरमनची पोस्ट मिळवण्यासाठी त्याची मोर्चेबांधणी चालू असल्याचे आतील गोटातून पास्कोलच्या कानावर आले होते. त्याला कसा डच्चू द्यायचा ह्याचा प्लॅन पास्कोलकडे तयार होता. पण नॉर्थवाला ग्रुप काय खेळी करेल ह्याचा भरवसा नसल्याने पास्कोल प्रवीणदादाशी खूप सख्य असल्याचा आविर्भाव आणीत म्हणाला, “हाय दादा! तुमच्या ग्रुपमध्ये आम्हाला पण सामील करून घ्या!” ते ऐकून त्याच्या कंपूच्या कपाळावर आठ्या पडल्या.
         प्रवीणदादा मात्र हसत खूर्चीतून उठला आणि आपल्या खूर्चीकडे बोट दाखवत म्हणाला, “अहो अध्यक्ष महाराज, माझी खूर्ची तुम्हाला! या! बसा!”

         “थॅंक्स, दादा!” पास्कोल त्याचा हात हाती घेऊन त्याला खूर्चीत बसवत म्हणाले,”त्या खूर्चीवर फार काळ बसू देत नाहीत हो लोक! सर्वांचाच डोळा असतो तिथे… वर बसल्यावर हार-तुरे पडतात, तशा शिव्याही खायला लागतात! त्यापेक्षा हे उभ्या उभ्याने बरं ना! चालू द्या तुमचं. एन्जॉय फाऊंडर्स डे!”

         सध्या तरी आपल्याला इथे स्थान नाही, ह्याची खूणगाठ बांधत पास्कोल तिथून सटकले. त्यांनी थांबून सभोवार नजर टाकली. परेरा दिसताच त्यांना खूण करून बोलावले. परेरा त्वरेने पुढे आले व पास्कोलना एका आडोशाच्या टेबलाजवळ नेले. पास्कोलनी घड्याळाकडे पाहत पट्कन समोरचा उपडा ग्लास घेतला व त्यात बाटलीतील सोनेरी द्रव्य ओतले. परेरांनी चपळाईने सोड्याची बाटली ओपन करून पास्कोलच्या हाती दिली.

         “बसा सीईओ साहेब! बॅंकेच्या कामात नसलं तरी इथलं तुमचं मॅनेजमेंट एकदम टॉप आहे बरं का! घ्या!” पास्कोलनी बाजूच्या रिकामी ग्लासकडे निर्देश करीत म्हटले.

         हे कोणी ऐकले तर नाही ना, असा विचार करीत परेरांनी इकडे तिकडे पाहिले व तोंडावर हसू आणीत मान डोलवली. व्यवस्थापन क्षेत्रात पारंगत असल्याने त्यांनी स्वतःची व्यवस्था बाजूच्या खोलीत आधीच करून ठेवली होती. अधून मधून तिथे जाऊन ते त्या पेयाचा आस्वाद घेत होते.

         ते नम्रपण म्हणाले, “आपल्या शेजारी बसून घेणे मला प्रशस्त वाटत नाही, सर. प्रथम आपलं होऊ द्या. “

         “बसा हो!” पास्कोलनी त्यांना हाताला धरून समोरच्या खूर्चीवर बसायला लावले. “आपली बॅंक… आपलीच माणसं… सारे मिळून पिऊ…. हॉs हॉs हॉs…” पास्कोल स्वतःच्या विनोदावर खळखळून हसले.

         तो विनोद आवडला नसला तरी परेरांनी बळेच हसून त्याला दाद दिली. परेरांच्या डोक्यात वेगळे विचारचक चालू होते. रजेवर गेलेले सीईओ पुन्हा येतील किंवा नाही ह्याची खात्री नव्हती. मागच्या बोर्ड मीटिंगमध्ये त्यावरून वादंग होऊन बोर्डात दोन तट पडले होते. चेअरमनसाहेबांना ते नको होते हे स्पष्ट झाले होते. विद्यमान तीन साहाय्यक महाव्यवस्थापकांमधून तिथे कोणाची वर्णी लागेल हे सांगता येत नव्हते. प्रत्येक जण आपापली सेटिंग लावून होता. पास्कोल ह्यांचे आमदारांबरोबर बर्‍यापैकी संधान होते, शिवाय संचालक मंडळातील काही विकासक संचालकांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांची पार्टनरशिप होती. त्यामुळेच परेरा पास्कोल ह्यांची मर्जी राखण्यात गर्क होते.

         हसता हसता पास्कोलना पुन्हा खोकल्याची उबळ आली.

         “सर, सर… पाणी घ्या.” परेरांनी पाण्याची बाटली पुढे केली. पास्कोलनी ती बाजूला ठेवली आणि व्हिस्कीचा एक मोठा घोट घेत ते म्हणाले, “परेरा, बघा, आज आम्ही बॅंकेसाठी रक्ताचे पाणी करतोय… पण हे व्हाट्सअपवाले काय काय बदनामी करतात हो आमची? कोणाची शेंडी कोणाच्या बुडाला जोडतात रांडीचे… आजचा प्रोग्रेस आपोआप झालाय का? “

         “सर, सर… जाऊ द्या… आपल्या पडेल मंडळींचे उद्योग हे… दुर्लक्ष करा…” परेरा त्यांना समजावू लागले.

         “इथे येऊन बसा आणि कामं करून दाखवा म्हणाव… सहकार खातं, आरबीआय बांबू घालायची वाटच पाहत असतात…”

         “होय ना, एक साधं कर्ज सॅंक्शन करायचं तरी किती स्क्रुटिनी असते? दोन हप्ते थकले की एनपीएखाली जाणार.”

         “राईट! कर्जे तर गेली पाहिजेत. नुस्त्या ठेवी काय चाटायच्या? कर्जे राईटआँफ करता येतात, ठेवींवर व्याज द्यावंच लागतं…” पास्कोलनी अचानक पॉझ घेतला. हातातील ग्लास संपवून ते म्हणाले, “बरे झाले कर्जाचा विषय काढलात! आपल्या इमानदार इंडस्ट्रीच्या नव्या अर्जाचं कुठवर आलेय? ओके करून टाका लवकर!”

         परेरांनी चमकून पाहिले. ते अस्वस्थ होत म्हणाले,” सर, त्या २३७ प्रकरणांमध्ये ह्यांच्या सिस्टर कन्सर्नचंही प्रकरण आहे. एजीएममध्ये बोंबाबोंब झाली होती. ह्या फ्रेश अर्जात खूप त्रुटी आहेत. त्यांचे असेट्स कमी आहेत. फॅक्टरीत सेकंड हॅंन्ड मशिनरी आहे. उद्या ठपका येऊ शकतो आपल्यावर. “

         “ते काही सांगू नका मला! व्हॅल्यूअरकडून पॉझिटिव्ह रिपोर्ट घ्या. पेपरवर्क बरोबर झालं पाहिजे. बाकी मी बघतो. काय?” पास्कोल बोटाला लागलेली चटणी जिभेने चाखत म्हणाले.

         परेरांना किळस आली. त्यांनी नॅपकीन पुढे केला. पास्कोलनी नॅपकीन घेऊन बोटे-तोंड पुसून पेपरचा बोळा तसाच परेरांच्या हातात दिला. परेरांनी तो झट्कन खूर्चीखाली टाकला व ते हाताची बोटे मोडत बसून राहिले.

         तेव्हा पास्कोल हाताने टेबलावर टकटक करीत म्हणाले, “अहो सीईओ साहेब, एवढे सीरियस होऊन बॅंकेच्या भवितव्याचा विचार करू नका! आपली बॅंक मजबूत आहे.. आता ग्रोथ, विकास हे शब्द ध्यानात ठेवून धोरणं आखायची… विकसित भारत तशी विकसित बॅंक! खी:खी:खी:!” मग ते पुढे झुकून हळू आवाजात म्हणाले,  “विकास साधता आला पाहिजे… तो इमानदारचा शहा येऊन भेटेल तुम्हाला… तो कोणाला नाराज करीत नाही…”

         “पण… साहेब, त्यांचे क्रिसील रेटिंग चांगले नाही. शिवाय आरबीआयच्या नव्या नॉर्मनुसार…”

         “मरो ते नॉर्म्स! तुमचे पॉवर्स वापरा. बोर्डालाही काही अधिकार असतात ना? आम्ही आहोत तिथे. घाबरू नका. करून टाका!”

         परेरांच्या डोळ्यांसमोर संभाव्य प्रश्नांनी थैमान घातले. ते काहीच बोलत नाहीत हे पाहून पास्कोल पुन्हा त्यांना टोकत म्हणाले, “तुम्ही एमबीएवाले खूप विचार करता. नो अ‍ॅक्शन! विचार करता करता वेळ निघून जाते हातची… संधीचा लाभ घ्या… बॅंकेसंबंधी बोलतोय मी… हात लावा…” पास्कोलनी कबाबची बशी ओढली आणि त्यातील एक कबाब परेरांच्या हातात कोंबला. परेरांनी यंत्रवत तो स्वीकारला. त्यांचा चेहरा अतिशय गंभीर बनला होता. परेरा काहीच बोलत नाहीत हे पाहून पास्कोल पुन्हा पुढे झुकून उजव्या हाताने परेरांचा डावा हात दाबत म्हणाले, “…आणि माझ्या लक्षात आहे बरं का ते… सीईओच्या पोस्टसंबंधी… आमदार साहेब सेशनमध्ये आहेत… भेटतोय मी त्यांना पुढच्या आठवड्यात… एकदम वरून काम! हंड्रेड पर्सैंट फत्ते होईल!”

         ते ऐकून परेरांचा नूरच बदलला. त्यांचे डोळे विस्फारले. अख्खाच्या अख्खा कबाब तोंडात टाकीत ते म्हणाले,”हॉय सर, मी करतोच ते कॉम… आय विल गेट इट डॉन.. म्हणजे डॉन….. पण कॉमाचं  विसरू नका तेवढं….” परेरांनी सोड्याची बाटली तोंडाला लावली व समाधानाने ढेकर दिला.

         “नाहीच विसरणार मी. मलाही माझा माणूस माझ्या हाताखाली हवाच आहे. बोर्डाने आणि प्रशासनाने हातात हात घालून काम केले तरच कामं पटापट मार्गी लागतील… आपसात संघर्ष, कोर्टकचेर्‍या करुन काय फायदा? बदनामी बॅंकेची होते. मी नेहमी असा पुढचा विचार करतो… तुमच्या भाषेत ते व्हिजन वगैरे… तरच प्रोग्रेस होईल… तेव्हा लेट्स सेलिब्रेट…!” पास्कोल अगदी खुशीत आले होते. त्यांनी समोरचा रिकामी ग्लास भरला व परेरांच्या हाती दिला.

         परेरांनी डावा हात छातीवर ठेवत उजव्या हाताने तो ग्लास स्वीकारला व मान लववून म्हटले, “इट्स माय प्लेजर, सर!”

         “चिअर्स!” पास्कोल आपला चौथा पेग हवेत उंचावत म्हणाले, “लेट्स हेल्प इच अदर टू ग्रो बियॉंड…!”

         “चिअर्स!” परेरा आपला ग्लास त्यांच्या ग्लासला हलकेच लावत उत्साहाने म्हणाले, “फॉर युवर हेल्थ अँड वेल बिईंग, सर! एकमेकां करू साहाय्य…!”