- डॅनिअल मस्करणीस, वाघोली, वसई
सकाळचे अकरा वाजले होते. सायमन घराच्या मागच्या बाजूस, परसदारी खुर्ची घेवून पेपर वाचत बसला होता. पलीकडे रिटा कोयती घेवून शहाळ्याचे पाणी काढत होती. नारळ फोडून त्यातील पाणी ती स्टीलच्या भांड्यात जमा करीत होती. समोर बसलेल्या सायमनला तिचे श्रम दिसत होते पण त्याचा नाईलाज होता. तीन मोठे पेले भरतील एवढे शहाळ्याचे पाणी निघाले होते. तिने बाकीचे नारळ तिथेच राहू दिले. नारळाची करवंटी व इतर कचरा तिने बाजूच्या टोपलीत भरला व ती लगबगीने स्वयंपाकघरात शिरली. दुपारच्या जेवणाची तयारी करण्याची वेळ झाली होती. सायमननेही नाश्ता केलेल्याला तीन तास होत आले होते. तिने घाई घाईने सकाळी साफ करून ठेवलेली मच्छी करण्यास घेतली. त्याला कोथिंबिरीची वडी आवडते म्हणून तिने बाजूच्याच शेतातून खुडून आणलेली कोथिंबिरीची जुडी कापण्यास घेतली.
तोच घराची बेल वाजली. दोन्ही मुले, नेल्सन व सिल्विया क्लासनिमित्ताने बाहेर गेलेली होती. रिटा स्वयंपाक घरातून उठली व तिने घराचा दरवाजा उघडला. पुढे उभी असलेली ती व्यक्ती पाहून ती प्रथम थोडी बावरली व नंतर थोडी अवघडली. ‘हे का आले असतील बरे ? ह्यांना काही कळले तर नाही?’ असा विचार करीत ती तिथेच घुटमळली, मग तिने स्वतःला चटकन सावरून त्यांना आत येण्यास सांगितले. ती व्यक्ती म्हणजे त्यांच्या गावातीलच करारी व्यक्तीमत्व असलेले अण्णा हे होते.
इथे सायमनने घराची बेल वाजली ते ऐकले होते. कुणीतरी पाहुणेमंडळीच आलेली असणार असे वाटून तो पुन्हा विचार करू लागला , ‘रिटा काही लपवत तर नसेल ? काय झाले असेल बरं मला ? पोटातली आतडी दुखतेय म्हणून आपण दोन महिने अगोदर डॉक्टराकडे पहिली फेरी घेतली होती. आणि त्यानंतर लिवरला सूज आल्यामुळे आपलं पहिलं ऑपरेशन एक महिन्यापूर्वीच झालेलं. ‘हा आजार ६-७ महिने राहतो, त्यात चिंता करण्याचे काही कारण नाही. फक्त थोड्या वेदना सहन करीत थोडी विश्रांती घ्यावी लागेल’ हेच काय ते रिटाने आपल्याला सांगितलेलं. आता तिने सांगितलेलं आहे म्हणजे ते खरंच असणार. पण त्यात पाहुण्यांना एवढी माझ्याकडे लगबगीने येण्याची काय गरज ? पण कदाचित असेही असू शकेल. माझी पाहुण्यांना खरंच काळजी असावी. आणि का नाही ? मी रिटाच्या आणि माझ्या सगळ्या पाहुण्यांच्या दुखण्या खुपण्यासाठी गेलेलो आहे. रिटा पूर्ण दिवस कामानिमित्त बाहेर. त्यामुळे तिचे पाहुणेही मीच घेतलेले.
एवढ्यात ‘अरे सायमन, काय बोलतोस ? कशी आहे तब्येत ?’ असे विचारत अण्णांनी सायमनची तंद्री भंग केली. सायमन वर मान करून पाहतो तो काय, साक्षात अण्णा पुढे उभे. त्याला क्षणभर काय बोलावे हेच सुचले नाही, ‘उम्म्म.. हो… ठीक आहे आता’, असे म्हणत सायमनने आपली मान खाली घातली. ‘नीट खातपीत जा. स्वतःची काळजी घे’, असे म्हणून अण्णा निघून गेले.
‘रिटा… ‘ सायमनने क्षीण पण काहीश्या अस्वस्थपणे रिटाला हाक दिली.
‘हो… आले’
‘रीटा, तुला माहीत आहे ना, माझा तुझ्यावर किती विश्वास आहे तो?’
‘हो… तुमच्या स्वतःपेक्षाही जास्त’, रिटा त्याच्या नजरेला प्रेमाने नजर भिडवित म्हणाली.
‘अण्णाने आपल्याला किती त्रास दिला आहे हे तुला माहिती आहे. तो माझा किती द्वेष करतो हे देखील तुला माहिती आहे. तरीही आज तो माझ्या या लिव्हरच्या आजारासाठी माझ्याकडे का आला ?’. ‘रिटा, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? काय झाले आहे गं, मला ?’
‘अहो’ रिटा त्याला मध्येच तोडत म्हणाली, ‘काही नाही, ते का कुणी परके आहेत. जमिनी जमिनी वरून भांडणे कुणा परकीयात नाही होत, आपल्या माणसातच होतात ! ते आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत. कुणाच्या दुखण्या-खुपण्याला ते नेहमी जातात. तुम्ही उगाच कशाचा कशाशीही संबंध जोडता. चला मी आता पटकन जेवण करते. आज आपल्याला संध्याकाळी डॉक्टराकडे जायचंय, लक्षात आहे ना ? रिक्षा ४ वाजता येईल’, असे म्हणत ती लगबगीने आतमध्ये गेली.
अण्णा हे सायमनच्या गावातील ज्येष्ठ व्यक्ती. त्यांचा शेती जुमला सगळ्यात जास्त. त्यांचा दराराही तसाच मोठा. तो दरारा मग शेतीतही दिसून यायचा. त्यांच्या शेतीसाठी दुसऱ्यांचे पाणी अडवणे. दुसऱ्यांच्या शेतीमध्ये कुरघोडी करणे, शेतीचा बांध फोडणे, या बाबत तो काहीसा कुप्रसिद्ध होता. सायमन अण्णाविषयी हे अगोदरपासून जाणून होता परंतु अण्णाबरोबर त्याचा प्रत्यक्ष संबंध येईपर्यंत त्याला त्याची धग जाणवली नव्हती. आठ वर्षापूर्वी सायमन ज्या कंपनीत काम करत होता, ती कंपनी अचानक बंद पडली. वाढलेलं वय, तुटपुंजे शिक्षण ह्यामुळे दुसरी नोकरी काही त्याला गवसली नाही. मग शेवटी घरातील शेतीकडे त्याने पूर्णवेळ लक्ष देण्यास सुरुवात केली. शेती कसताना अण्णाच्या वागण्याचे चटके त्यालाही जाणवू लागले. सायमन जरी कमी शिक्षित असला तरी तो आपल्या हक्काच्या बाबतीत कमालीचा जागरूक होता. त्याला हे खचितच पटणारे नव्हते. आणि ह्यावरून त्यांचे नेहमीच खटके उडायचे. ३-४ महिन्यापूर्वी तर अण्णाने हद्दच केली होती. गावातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याची शेती शिंपण्यासाठी एक दिवस आणि एक वेळ आखून दिलेली असताना, नेमका सायमनच्या वेळेअगोदर अण्णाने मोटर चालूच ठेवली आणि विहिरीचे संपूर्ण पाणी वाया घालवले. सायमनला त्याची शेती शिंपण्यासाठी पाणीच उरले नव्हते. हा अन्याय असह्य होऊन मग दोघांमध्ये बरीच जुंपली होती. हे प्रकरण चर्चच्या फादरापर्यंत पोहोचले होते. त्या दिवसापासून दोघांमध्ये संभाषण नव्हते. ‘खरंच, अण्णा मनाने मोठे असावेत. माझ्याशी कितीही वाद झालेला असला तरी माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ते माझ्या घरी आले. त्यांचा स्वभाव कसाही असला तरी ते आपल्याला वडीलधारी आहेत. आपण उगाच त्यांच्याशी वाद घातला’ काहीसा असा विचार, सायमन परसादाराकडून दिसणाऱ्या लांब शेतीच्या शिवाराकडे नजर लावीत स्वतःशी करू लागला.
दुपारी चार वाजता ठरल्याप्रमाणे रिक्षा आली. रिटा सायमनला घेवून हॉस्पिटलला पोहोचली. अगोदर घेतलेल्या अपॉइंटमेंटप्रमाणे डॉक्टरांनी सायमनला तपासले.
‘काही औषधे द्यावी लागणार आहेत. त्याला ह्याचं शरीर कसं साथ देते ते तपासण्यासाठी याला आजची रात्र इथेच काढावी लागेल’
‘हो चालेल डॉक्टर, मी राहीन ह्यांच्या बरोबर’
डॉक्टर आणि रिटा ह्यांचं संभाषण सायमन ऐकत होता. त्याच्या पोटात अचानक सुरु झालेल्या वेदना सहन करण्यावाचून तो काहीच करू शकत नव्हता. रिटाने जनरल वॉर्डमध्ये एक खाट बुक केली.
संध्याकाळचे आठ वाजत आले होते. डॉक्टरांनी सायमनला दोन इंजेक्शने आणि काही औषधे दिली. डॉक्टरांनी सूचना दिल्याप्रमाणे नर्सने सर्व काही फाईलमध्ये व्यवस्थित लिहून ठेवले. हळूहळू रुग्णांना भेटण्यास आलेले आप्त-नातेवाईक ह्यांची पांगापांग होत होती. त्या जनरल वॉर्डमध्ये जवळजवळ १५ एक खाटा होत्या. प्रत्येक रुग्णांचे कोणी ना कोणी नातेवाईक त्यांबरोबर वस्तीला थांबलेले होते. सायमनने असह्य वेदना होत असूनही पाहिले कि आलेल्या रुग्णाबरोबर थांबलेले त्यांचे नातेवाईक हे सगळे पुरुष आहेत. ‘आपल्या रिटाला ह्या परपुरुषांबरोबर इथे हॉस्पिटलमध्ये अख्खी रात्र काढावी लागणार’ ह्या कल्पनेने तो व्यथित झाला.
‘रिटा, प्रश्न फक्त एका रात्रीचा आहे, तू प्रायवेट मध्ये जागा असेल तर तिथे मला शिफ्ट कर. माझ्यावर आता औषधांचा अंमल चढला कि मी झोपी जाईन, पण ह्या सगळ्या पुरुष मंडळीत मला तुझी सुरक्षितता जास्त महत्वाची वाटते’ असे सांगून त्याने रिटाला प्रायवेट रूममध्ये त्याची खाट हलविण्यास सांगितले.
जसजशी रात्र चढत गेली तसतसा औषधांचा अंमल त्याच्यावर चढत गेला. तो गाढ झोपी गेला.
रिटा मात्र त्याच्या शेजारी बसून त्याच्या मलूल होत चाललेल्या शरीराकडे पाहत होती. ‘इतक्या वेदना होत असूनही, याला मात्र माझी काळजी. मी एक तर ही अशी काळी सावळी. त्यात व्यापामुळे आणखीनच ओबडधोबड झालेले माझे शरीर. कोणी माझ्यावर कसं आणि का बघेल? पण सायमनला मात्र अजून मी सुंदरच वाटते. याचं किती रे माझ्यावर प्रेम’.
‘खरंच, आता दोन महीने होतील सायमन बिछान्यात पडून, पण आता त्याची किंमत कळते आहे. शेतातील कामे, घरातील दैनंदिन कामे, बाजारहाट, मुलांच्या अभ्यासावर लक्ष देणे. नातेवाईकांकडे ये जा करणे. सगळं किती हा सुंदररित्या करीत होता. मी फक्त कामावर जावून येऊन संध्याकाळी स्वयंपाक करणे एव्हढेच काय ते मला माहित. देवही किती क्रूर? कसलंही व्यसन नव्हतं ह्याला. तरीही ?’.
तिला तो दिवस आठवला. अचानक दुपारी कामावर असताना सायमनचा फोन आला, ‘अगं, मी इथे एका अनाथ आश्रमात आलो आहे, आज माझ्या दादीचा वाढदिवस, त्यामुळे इथल्या मुलांना पाच किलो बिर्याणी आणली होती मी. जवळपास २० एक मुले आहेत. काय गोड मुलं आहेत गं, आपल्या नेल्सन आणि सिल्वियासारखीच. त्या बिच्चार्यांचं कोणीच नाही गं ह्या जगात. मी त्यांना सांगितलंय. माझी दोन्ही मुलं दहावी बारावीच्या परीक्षेला बसली आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा ती पास झाली कि मी पुन्हा तुमच्या साठी पेढे घेऊन येणार’. सायमनच्या बोलण्यात इतका आनंद होता कि, ‘किती पैसे संपले ?’ अशा प्रश्नांना काहीच किंमत नव्हती !
रिटाला तिच्या नवऱ्याचा तेव्हा खूप अभिमान वाटला होता. ‘इतर बायकांचे नवरे जरी ऑफिसला जाणारे असले तरी स्वतःच्याच व्यसनात मश्गुल असतात. आणि इथे माझा त्यांच्या तुलनेत ‘अडाणी, बायकोला कामाला पाठवून घरी बसणारा नवरा’ किती श्रेष्ठ होता! खरंच सायमनचे हृदय किती सुंदर आहे आणि तो माझ्यावर किती निस्सीम प्रेम करतो’, रिटा त्याच्याकडे डोळे भरून पाहतच राहिली. रात्रीचे बारा वाजत आले होते. काही वेळाने तीही बसल्या जागेवरच डोळे बंद करून पडून राहिली.
‘रिटा, उठून थोडं पाणी देतेस का, घसा जर कोरडा वाटतोय’ ह्या बोलण्याने रिटा पटकन भानावर आली. सकाळ झाली होती. तिने डोळे चोळून लगेचच बाजूच्या बाटलीमधून त्याला ग्लासमध्ये पाणी दिलं. तो पाणी पीत असतानाच नर्स खोलीत आली.
‘गुड मॉर्निंग, आता कसं वाटतंय ?’
”सिस्टर, रात्री काही जाणवलं नाही, सगळं झोपेत गेलं. पण आता पुन्हा तशीच वेदना जाणवतेय हो’
‘हो, औषधांचा प्रभाव ओसरला कि असंच’, असं म्हणत तिने सायमनला चेक करून काही डिटेल्स फाईलमध्ये नोट करून ठेवले व जाताना त्याच्या देखत रिटाला म्हणाली,
‘डॉक्टर, आज मुंबईला गेले आहेत, पण त्यांनी टाटामध्ये ह्यांच्यासाठी पुढच्याच आठवड्यात, शुक्रवारी अपॉइंटमेंट घेतली आहे, तुम्ही तिथे त्यांना डायरेक्ट तिकडे घेऊन जा’ असे म्हणत नर्स खोलीबाहेर निघून गेली.
‘टाटा’ !! शेवटच्या स्टेजला आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची शेवटची आशा. आणि हा संदर्भ सायमनला माहित होता. त्याचा पाण्याचा घोट तसाच तोंडातून बाहेर आला व तो बिछान्यात कोसळला. रिटा धावत त्याला सावरण्यासाठी धावली. तिलाही आता सायमनला कसे सावरावे हे कळत नव्हते. क्षणात, गुपित हे गुपित राहिले नव्हते. ती तिथेच त्याच्या छातीवर डोके ठेवून रडण्यास लागली. आणि तो अगोदरच खोल गेलेल्या नजरेतून आणखीच शून्यात नजर लावून पाहू लागला….
त्याला घरी आणून दोन दिवस झाले होते. नातेवाईकांची वर्दळ सुरूच होती. कोणी रिटाकडे ‘हा गरीबाच्या घरी श्रीमंत पाहुणा कसा आला ?’ म्हणत सहवेदना दाखवत होता तर, ‘माझ्या दोन्ही मुलांबरोबर मीही या वर्षी आयुष्याच्या परीक्षेसाठी बसलो आहे’ असं सायमन उपहासाने आलेल्या नातेवाईकाबरोबर वेदनेने कण्हत बोलत होता. दोघा मुलांनाही आपले पप्पा आता आपले थोड्या दिवसाचेच साथी आहेत हे कळून चुकले होते. एका रात्री त्याने आपल्या दोन्ही, नेल्सन आणि सिल्विया ह्या मुलांना जवळ बोलावले, ‘मुलांनो, माझे बाबा जेव्हा मरण पावले तेव्हा मी फक्त ४ वर्षाचा होतो. जे काही मला जमले ते माझ्या कुवतीने केले, पण तुम्ही १४ वर्षाचे आहा, व्यवस्थित रहा आणि मम्मीची काळजी घ्या’
शेवटी ती काळरात्र आली. मुले नेहमीप्रमाणे अभ्यास करीत खोलीत बसलेली होती. आणि रिटा सायमनच्या शरीराला थंड पाण्याने लेप देत होती. केमोथेरपी आणि इतर जड औषधांमुळे त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. तो असह्यपणे खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या नारळाच्या काळोख्या स्तब्ध प्रतीकृतीकडे तेवढ्याच निपचीतपणे पाहत होता. थोडा वेळ निघून गेला व त्याला पोटात अचानक अस्वस्थ वाटू लागले, ‘मी जरा शौचालयात जाऊन येतो’ असे म्हणून तो कसाबसा उठून परसदारी शौचालयात गेला. थोडा वेळ होत नाही तोच त्याने रिटाला साद घातली. नैसर्गिक विधी उरकण्यास त्याला त्रास होत होता. आजाराने भंगलेले त्याचे शरीर त्याला आता साथ देत नव्हते अश्या परिस्थितीत, नैसर्गिक विधी उरकण्यास त्याला त्याच्या अर्धांगीनीची साथ हवी होती. त्याने अगतिकपणे तिला साद घातली…
एकवेळ दुसऱ्याच्या मनातील घाण साफ करणे सोप्पे आहे, पण दुसऱ्याच्या शरीरातील घाण साफ करणे? तिथे फक्त त्या व्यक्तीवर असलेले अमर्याद व निस्सीम प्रेमच एखाद्याला तसे करण्यास प्रवृत्त करू शकते. नवऱ्याचे हे अकाली आलेले मोठे आजारपण, रात्री-अपरात्री त्याची डोळ्यात तेल घालून केलेली सेवा, डॉक्टरांचे झिजवलेले उंबरे, पैशासाठी केलेली धावपळ, घर-संसाराची जबाबदारी, पाहुण्यांचे आदळणारे लोंढे अशा वेगवेगळ्या पातळ्यावर रिटा हे मागील काही महीने तडफदारपणे लढत होती. सायमनच्या आजारपणामुळे अगोदर काहीशी बुजरी, शांत असणारी रीटा ही एकदम झुंझार आणि धीट झाली होती. तिला तसे बनण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता म्हणा. नियती जणू जीवनाच्या रंगमंचावर कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेसाठी तिला तयार करीत होती.
‘घाबरू नका मी ही आलेच’ असे म्हणत, ती रणरागिणी तडक हातात जुने फडके घेऊन शौचालयात धावली. अर्धा-एक तासाच्या अथक परिश्रमानंतर तिच्या मदतीने त्याने तो नैसर्गिक विधी उरकला. रात्रीचे ११ वाजत आले होते. सायमन पलंगावर पहुडला. आजाराने पोखरलेल्या त्याच्या शरीराला आता बरे वाटू लागले होते. त्याच्या वेदनामय चेहरा आता शांत वाटत होता. रिटालाही त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून खूप बरे वाटले. तिने ह्या आजारपणात त्याला केलेल्या मदतीचे व दिलेल्या साथीचे मोल कोणत्याच शब्दाने भरून निघणारे नव्हते. त्यालाही ते माहित होते. त्याने फक्त कृतार्थपूर्ण नजरेने तिच्याकडे पाहिले. व तो शांतपणे झोपी गेला. खूप दिवसांनी सायमनला असे शांतपणे झोपताना पाहून तिलाही बरे वाटले. तो जास्त वेळ जगेल अशी उगाच खोटी आशा तिला वाटून गेली. पण सायमन शांतपणे झोपी गेला होता तो कधीच पुन्हा न उठ्ण्यासाठी, त्याने घेतलेली निद्रा ही अनंतकाळाची होती.
सकाळी अंत्यविधीच्या वेळी ती जोरजोरात ‘धन्या, मला एकटे सोडून तुम्ही कुठे निघून गेलात’ म्हणून जोरजोरात आक्रोश करीत होती. त्या आक्रोशात वेदना होती, दुःख होते पण हतबलता नव्हती. तिला तिच्या जोडीदाराला त्या दुर्धर आजारातून बाहेर काढण्यास सफलता आलेली नसली तरी ‘काहीच करू शकले नाही’ अशी विफलताही नव्हती. तिला जे काही शक्य होते ते तिने अगदी मनापासून केले होते. तिचा साथीदार जरी दूरदेशी निघून गेला असला तरी त्याला शांतपणे पाठविता आले याचे मोठे समाधान तिच्याकडे होते. राजा राणीची कहाणी जरी अधुरी राहिली असली तरी उरलेला उरलेला अर्धा डाव ती तिला नव्याने गवसलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आणि सायमनच्या आठवणीच्या बळावर पूर्ण करणार होती.
(प्रकाशित: सुवार्ता, ऑगस्ट, २०१४)