अन् आदिती डॉक्टर झाली
(बाबांचं ह्दगीत)
- भरत वाळींजकर, नालासोपारा प.
फोन – 9869461011
“देवा काय मागू तुला, भाग्य दिले तू मला” अगदी अशीच अवस्था झाली माझी. आनंदाने उचंबळून येणं म्हणजे काय असते, हे मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. ‘आनंदाश्रू’चा आनंद घेत होतो. डोळ्यातलं समाधान टिपत होतो. परमेश्वराने अगदी मुक्तहस्ते हे भाग्य आम्हाला दिलं होतं. लाडक्या आकाशनंतर आज माझी लाडली आदिती डॉक्टर झाली होती. MBBS डॉक्टर. एक प्रतिष्ठित पदवी तिने संपादित केली होती.
१८ सप्टेंबर माझा वाढदिवस आणि १९ सप्टेंबर २०१६ ह्या शुभदिनी चार लाखातून जे ६३०० विद्यार्थी एमबीबीएस पदवीसाठी पात्र ठरले, त्यात माझी लेक होती. अहोरात्र अभ्यास करून मेहनतीने आपल्या बुद्धिमत्तेने तिने हा प्रवेश मिळवला होता. मला वाढदिवसाची अनोखी पण हवीहवीशी वाटणारी भेट मिळाली होती.
मला आताही आठवते त्यावेळेस कोर्ट व आरोग्य संचनालय ह्यामध्ये चाललेला घोळ. CET की NEET परिक्षा ह्यामध्ये मुलांचे खरेच हाल झाले होते. पालक म्हणून आम्हांला ते खूप जाणवत होते. माझ्या आदितीने दोन्ही परिक्षा दिल्या आणि NEETच्या माध्यमातून प्रवेश मिळविला. मला अजूनही तो क्षण आठवतो. ५ सप्टेंबर २०१६, ज्या दिवशी आदितीला प्रवेशाबद्दल समजणार होतं. मी जरा लवकरच उठलो. मनाला हुरहुर, धाकधुक आणि उत्सुकता साऱ्या भावना एकाच वेळेस जाणवत होत्या.
परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि मोबाईलवर लॉगिन केले. सिट नंबर पाठ होताच. स्क्रिनवर लगेचच आदितीचा ॲडमिशनचा मेसेज झळकला, जळगाव मेडिकल कॉलेज…
सौ. दिपा व आदिती अजून गाढ झोपेतच होत्या. जणू काही त्यांना ॲडमिशनची खात्री होतीच. मी त्यांना उठवून ॲडमिशनविषयी सांगितलं. त्या खुश झाल्या. लगेचच प्रवासाची तयारी केली. आकाशने सारी काही माहिती काढली. आणि आम्ही जळगावला पोहचलो. खूप छान आणि मोठ्ठा परिसर होता. प्रवेशाचे सारे सोपस्कार पूर्ण केले आणि आदितीचा एमबीबीएसचा अभ्यास सुरु झाला.
नवीन जागा, नवीन अभ्यास, नवीन मैत्रिणी थोडक्यात एका पूर्णपणे नवीन वर्तुळात तिने प्रवेश केला. तिथेही तिने आपल्या आवडीनिवडी जपल्या. डान्समध्ये हौसेने भाग घेतला. कॅरमस्पर्धा जिंकली. गरबा खेळली. सांस्कृतिक कार्यक्रमात आपला ठसा उमटविला. चक्क सिआर झाली. नेतृत्व केलं आणि आपले मुख्य ध्येय अभ्यासाचं, तेही रात्रंदिवस मेहनत करून यशस्वीपणे पूर्ण केलं.
का नाही वाटणार अभिमान माझ्या लेकीचा मला. १८ एप्रिल २०२१ रोजी परीक्षा संपवून आदिती घरी आली. घरी मग रोज दिवाळीच. लॉकडाउनमुळे सौ. दीपा पण घरीच होती. आकाश पण आला होता. चिकन, मटण, पापलेट, हलवा, कर्दी, वाव, आमरस, शहाळाचं पाणी, ताडगोळे, कोथिंबीर वडी इ. सारं अगदी तिच्या मनासारखं.
२६ एप्रिल २०२१. हनुमान जयंतीचा पवित्र, मंगल दिवस. रात्रीचे साधारण नऊ वाजले होते. सोनी टिव्हीवरचा ‘स्वराज्य जननी जिजामाता’ कार्यक्रम नुकताच संपला होता. शिवराय माझे दैवत. एकदा दैवत्व बहाल केल्यावर श्रद्धा ही आलीच. नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सुरु झाली होती. समीर चौगुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर इ. पट्टीचे विनोदवीर. मजा येते.
थोडया वेळाने आदिती हॉलमध्ये आली. तिचा चेहरा थोडा अधिकच खुललेला दिसतो. “पप्पा रिझल्ट लागला. “काय !” खरं म्हणजे तिच्या खुललेल्या चेहऱ्याने रिझल्ट समजला होता. तरीही मी सरसावून बसलो. तिने माझ्या हातात तिचा मोबाईल दिला. स्क्रीनवर तिचा रिझल्ट होता. आदिती भरत वाळींजकर — पास. तिच्या संपूर्ण कॉलेजचा रिझल्ट होता तो. तिने (७२ %)प्रथम श्रेणी मिळवली होती.
माझ्या डोळ्यात अगदी सहजपणे पाणी आलं. कधी कधी भावनेला नाही आवरता येत. नैसर्गिक असतं ते. आनंद, समाधान, अभिमान साऱ्याच भावना डोळ्यात एकवटल्या. आमची लाडली आदिती आज डॉक्टर झाली होती. सौ. दिपाला हाक मारली. “अग आपली आदिती डॉक्टर झाली. आत्ताच रिझल्ट लागला. फर्स्ट क्लास. अभिनंदन आईचं.” सौ. दिपाचा चेहरा खुलला. आपल्या लेकीच्या ह्या धवल यशाने आईचं मन भरून आलं. मनोमन ती सुखावली. “चला, पहिलं देवापुढे साखर ठेऊया.” सर्वांच्याच मनातलं ती बोलली.
देव्हार्यात साखर ठेवली. त्या सर्वज्ञानी परमेश्वराला आम्ही सांगितलं. “आज आदितीचा रिझल्ट लागला. ती फर्स्ट क्लासने पास झाली. डॉक्टर झाली. तुझे मनोमन आभार.” देव्हाऱ्यातील सारे देव थोडे अधिकच प्रसन्न वाटले. त्यांची प्रसन्नता मनोमन जाणवली.
“झाले मनासारखे. आज दोन्ही डॉक्टर मुलांचे आईबाबा झालात.”
“आपली कृपा परमेश्वरा”
दोन मिनिटे डोळे मिटले. ध्यानस्थ झालो. कृतकृत्य झाल्याचं एक वेगळंच समाधान शरिराला अन् मनाला जाणवलं. कर्तव्यपूर्तीचा आनंद ल्यालेल्या आदितीने आमच्या दोघाच्या हातात साखर ठेवली अन मनोभावे आम्हास नमस्कार केला. “यशस्वी भव: सुखी भवः”
“चल आधी आकाश भाऊला मेसेज कर.” मेसेज करताक्षणी दोन मिनिटात डॉक्टर आकाश भाऊचा फोनही आला. कित्ती उत्तेजित झाला होता तो. आपल्या लाडल्या बहिणीच्या उज्ज्वल यशाने भरभरून बोलत होता. खूप छान वाटलं. नंतर शुभांगी आत्या. तिचा स्वर किती भावनावश झाला. “चिमणी डॉक्टर झाली.”
खुप आनंद झाला. बराच वेळ बोलत होती. महेश, सायली, सौरभ साऱ्यानी कौतुक केलं.
हेमा आत्या, खळाळून हास्य. आनंद जाणवला. भास्कर भावोजी, ओम साऱ्यानींच अभिनंदन केले. आदिती कौतुकात न्हाहत होती . अगदी विनम्रपणे कौतुक स्विकारत होती. मग किसन दादा, वहिनी, सागर भाऊ, रितू… साऱ्यांनी अगदी आलिंगन देवून आपला आनंद व्यक्त केला.
सागर, रितू, आकाश आणि आता आदिती एका प्रभूकृपा वास्तूत चार डॉक्टर ! तिची लाडकी सुधा मावशी.. तिच्या बोलण्यातूनही कौतुक ओसंडत होतं. कसं कौतुक करु कसं नको असं तिला झालं होतं. त्या स्वतः डॉक्टर असल्यामुळे शिक्षणाचं महत्व जाणून होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाचा आदितीला नेहमीच फायदा झाला. वंदना मावशी, जयश्री मामी, तसेच नंदूमामाने भरभरून कौतुक केले. घरात अगदी आनंदाच वातावरण होतं. रात्रीच्या जेवणाचं आता लक्षातच नव्हतं. शेवटी १०.३० वाजता जेवलो थोडफार. कारण पोट आधीच आनंदानं भरल होतं.
नंतर आदिती रात्री बराच वेळ सानिका, देवश्री, कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर बोलत राहिली. दुसऱ्या दिवशी मी ग्रुपवर पोस्ट केलं. “आपणा सर्वांच्या आशीर्वाद अन शुभेच्छाने आदिती एमबीबीएस डॉक्टर झाली.” आणि मग दिवसभर अभिनंदनाचे मेसेज अन फोन येत राहिले. रॉकस्टार ग्रुपने तर डीपीवर आदितीचा फोटो ठेवला.
“Congratulations Dr. Aditi Bharat Walinjkar.”
ऑफिस, ट्रेन, गावातील अगदी प्रत्येकाने आदितीचे अभिनंदन केले. बाबा म्हणून मन आनंदाच्या झोक्यावर बराच वेळ झुलत राहिलं. खूप आनंद, समाधान वाटलं. सध्या डॉ. आदिती नायर कॉलेजमध्ये एमडी (पेडेक्ट्रीस) करत आहे.