अनिवासी वसईकर कुपारी – सॅबी परेरा

अनिवासी वसईकर कुपारी

          मानवी इतिहासात जगण्यासाठी, रोजगारासाठी आणि नवे काही शोधण्या-साठी तसेच युद्धे, लढाया, दंगली आणि वांशिक अत्याचार इत्यादी कारणांमुळे स्थलांतरे होत आलेली आहेत. माणसाच्या या स्थलांतराने जगाची दशा आणि दिशा सतत बदलत राहिली आहे आणि यापुढेही बदलत राहणार आहे. वसईच्या पश्चिम पट्ट्यात (म्हणजे विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला) राहणाऱ्या सामवेदी (कुपारी) आणि वाडवळ ख्रिश्चन समाजातील लोकांनी मागील पन्नास साथ वर्षात जे परदेशात स्थलांतर केले ते मात्र प्रामुख्याने रोजगारासाठीच. मूळचा “ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान” असा अल्पसंतुष्ट स्वभाव आणि त्यावर पोर्तुगीजांच्या सुशेगाद स्वभावाच्या राजवटीचा पडलेला प्रभाव यामुळे सत्तरच्या दशकाआधी वसईतून फार कुणी मोठ्या संख्येने परदेशी जाऊन स्थायिक झाल्याची उदाहरणे नाहीत. सत्तर-ऐशीच्या दशकात वसईतील तरुण नोकरीसाठी आखाती देशात जाऊ लागले आणि १९९०च्या दशकात जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर आखातासोबत, युरोप, अमेरिकेत स्थलांतर करण्याला अधिक वेग आला. उच्च शिक्षण आणि रोजगार ही दोनच या स्थलांतरांमागची प्रमुख कारणे होत.

          स्थलांतरे ही स्वेच्छेने होतात असे आपल्याला भासत असले तरी बऱ्याचदा ती लादलेली असतात. आपण ज्या समाजात, देशात राहतो तेथील आणि इतर प्रगत देशांतील आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती ह्याची तुलना करून, आपल्या देशात राहण्यापेक्षा इतर देशात गेल्यास आपली आर्थिक प्रगती अधिक जोमात होईल, आपल्याला अधिक संपन्न सामाजिक जीवन अनुभवता येईल, उत्तम प्रतीच्या शैक्षणिक, वैद्यकीय आणि पायाभूत सुविधा मिळतील, चांगलं वैयक्तिक जीवनमान जगता येईल, अधिक कार्यक्षम आणि आश्वासक राज्यकर्ते लाभतील अशी जेव्हा लोकांना आशा वाटते तेव्हाच ते स्थलांतराला उद्युक्त होतात. जेव्हा एखादी व्यक्ती एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतराचा निर्णय घेते तेव्हा आपल्या देशातील अभावांपासून दूर जाऊन जेथे आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल अशा देशात जाण्याचा त्या व्यक्तीचा कल असतो. 

          वसई-विरार मधील पश्चिम पट्ट्यात भुईगाव ते अर्नाळा या भागात कुपारी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिश्चन समाजाची साधारण तीसेक हजार लोकांची वस्ती आहे. या समाजातील अनेक मूलनिवासी वसईकर आज कामानिमित्ताने परदेशात आपल्या कुटुंबासहित तात्पुरते किंवा कायमस्वरूपी स्थायिक झालेले आहेत. वसईतील कुपारी समाजातील लोकांनी परदेशी केलेल्या स्थलांतराचे तीन प्रमुख टप्पे सांगता येतील.

 १) निव्वळ पोटासाठी:

          साठ-सत्तरच्या दशकात वसईतील कुपारी समाज हा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे शेती-बागायती आणि दूधदुभते यांवर अवलंबून होता. अल्पभूधारक असल्याने शेती-बागायतीचे उत्पन्न मर्यादित, घरची गरिबीची परिस्थिती, उच्च शिक्षणाची सहज उपलब्धता आणि ऐपत नसल्याने शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या पहिल्या-दुसऱ्या पिढीतील काहींनी शिक्षकी पेशा स्वीकारला तर काही आयटीआय करून कुशल किंवा अर्धकुशल कामगार बनले. या कामगार वर्गापैकी थोडक्या नशीबवान लोकांना चांगल्या कंपन्यात नोकरी मिळाली तर इतरांच्या नशिबात भायंदर, मालाड, गोरेगाव यासारख्या ठिकाणी छोट्यामोठ्या कारखान्यातील अल्प वेतनातील पिळवणूक आली. रोजगाराची शाश्वती नाही, सामजिक सुरक्षा नाही, शेतीच्या आणि नोकरीच्या उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागत नाही, चांगलं घर नाही, विरार, नालासोपारा आणि वसई स्टेशनवरून पाच-सात किलोमीटरवर असलेल्या आपल्या गावात येण्यासाठी धड रस्ते नाहीत, वाहन नाही, विजेची सोय नाही. ग्रामपंचायत आणि सरकारकडे या सर्वावर उपाययोजना नाहीत अशा निराशाजनक परिस्थितीत, ‘इतकं राबायचंच आहे तर त्याबदल्यात चांगला पैसा का मिळवू नये?’ या विचाराने या कामगारांनी तेव्हा नुकताच खुला झालेला आखाती देशाचा पर्याय निवडला. केवळ, आपल्याला आपल्या कष्टाचा सन्मानजनक मोबदला मिळावा आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावं या एकमेव उद्देशाने या पिढीतील तरुणांनी आखाता-तील विविध उद्योगात आणि विशेषतः इमारत बांधणी उद्योगात नोकऱ्या मिळविल्या. आखातात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन मुंबईतील एजेंट लोकांनी कित्येकांची आर्थिक फसवणूकही केली. आपल्या कुटुंबापासून पाच-पाच, दहा-दहा वर्षे दूर राहून, उन्हातान्हात राबून त्यांनी वसईत आपल्या राहण्यासाठी पक्के घर, मुलाबाळांचे शिक्षण आणि कौटुंबिक गरजा पुरविल्या. अगदी सुरुवातीपासूनच, एक दिवस आपल्याला आपल्या मायदेशी, आपल्या मूळ गावी परतायचे आहे हे पक्के डोक्यात भिनलेले असल्याने, कुटुंब स्थिरस्थावर झाल्यावर आखातात गेलेले हे अनिवासी वसईकर, वसईत परत येऊन आपापल्या मगदुराप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे छोटे-मोठे व्यवसाय, नोकरी किंवा शेती करू लागले.

          कुपारी समाजातील अत्यंत गरिबीत जीवन कंठणाऱ्या कुटुंबांना या आखाती नोकरीचे इंजिन जोडल्यानंतर या समाजाचा चेहरामोहरा बदलू लागला. आखातात काम करणाऱ्या अल्पशिक्षित तरुणांनाही लग्नासाठी सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या मुली सांगून येऊ लागल्या. गावातील पोराबाळांच्या अंगावर इंपोर्टेड कपडे दिसू लागले, जुन्या पडक्या घरांच्या जागी बंगले उभे राहू लागले, स्टेशन परिसरात स्थानिक भूमिपुत्रांची दुकाने / व्यवसाय उभे राहिले, लग्न समारंभ धुमधडाक्यात होऊ लागले. आखाताच्या परिसस्पर्शामुळे कुपारी समाजाने एक प्रकारे कात टाकली.

२) पुरेसे धन कमवून मायदेशी परत येण्यासाठी 

        नव्वदच्या दशकात, चर्च संचालित शाळांच्या कृपेने वसईतील तरुण वर्ग जवळजवळ शंभर टक्के साक्षर होऊन त्यातील कित्येक उच्चशिक्षण घेते झाले. जागतिकीकरणाच्या रेट्यात, इंजिनियरिंगच्या विविध शाखांत विशेषतः कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर इंजिनियरिंग शिकलेल्या वसईतील या बुद्धिसंपदा आणि श्रम-संपदेला युरोप-अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्या आकर्षित करू लागल्या. नुकतीच शिक्षण संपवून बाहेर पडलेली ही पिढी मागील पिढीपेक्षा अधिक प्रॅक्टिकल असली तरी त्यांची आपल्या गावाशी, समाजाशी, भाषेशी, संस्कृतीशी नाळ घट्ट जोडलेली होती. त्यामुळे साधारणतः वयाच्या तिशीपर्यंत परदेशी राहून आपल्या शिक्षण-कौशल्याद्वारे चांगला पैसा कमवायचा आणि वयाच्या तिशीच्या आसपास मायदेशी परत येऊन संसार थाटून, इथेच नोकरी-धंद्यात सेटल व्हायचे असा त्यांचा कल होता आणि त्यातील बरेचसे लोक आठदहा वर्षे परदेशात काढून, आपल्या मातीच्या ओढीने वसईत परतले.

          ह्याच सुमारास हॉटेल मॅनेजमेंट किंवा काही तांत्रिक कोर्स केलेले तरुण बोटींवर नोकरीसाठी जाऊ लागले. कामानिमित्त परदेशी भूमीवर राहण्यापेक्षा सुमुद्रात बोटीवर राहणे हे अधिक कष्टाचे आणि मनाच्या खंबीरपणाची परीक्षा घेणारे असले तरी त्या व्यवसायासाठी भारतात मिळत असलेल्या मोबदल्याच्या मानाने बोटीवर मिळत असलेला पैसा कित्येक पट जास्त असल्याने वसईच्या तरुणाईला या बोटी-वरील जीवनाने आकर्षून घेतले. ठराविक महिन्यांनी सुट्टीसाठी घरी यायला मिळत असल्याने या दर्यावर्दींचा आपल्या मातीशी संपर्क टिकून राहतो. ही बाबदेखील समाजप्रिय असलेल्या वसईकर तरुणांच्या पथ्थ्यावर पडली. असं म्हणतात की, आज वसईचा क्रू मेंबर नसलेली बोट समुद्रात सापडणे मुश्किल आहे. इतके हे बोटीवरील जीवन वसईच्या तरुणांना मानवले आहे.  

३) परदेशी स्थायिक होण्यासाठी:

          आताची पिढी म्हणजे ज्याला आपण मिलेनियल जनरेशन म्हणतो त्या पिढीला युरोप, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशातील उत्तम प्रतीच्या उच्च शिक्षणाच्या, वैद्यकीय आणि पायाभूत सुविधा, शिक्षणासोबत कमविता येण्याचा पर्याय, नोकरी-धंद्याच्या संधी आणि त्यातील लवचिकतेमुळे मिळणारं उत्तम वैयक्तिक जीवनमान (Work Life Balance) या बाबींचं आकर्षण आहे. शक्य झाल्यास त्याच देशाचे नागरिक होऊन तिथेच आयुष्य व्यतीत करण्याचा त्यांचा इरादा आहे.

          जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर जगभरात ज्या प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या त्याचा फायदा उठवित परदेशी जाऊन आपला उत्कर्ष करून घेणे ही नैसर्गिक मानवी प्रेरणा असल्याने वसईतील अनेकांनी सातासमुद्रापार जाऊन आपले नशीब अजमावून पाहिले. आजच्या घडीला वसईच्या ख्रिश्चन समाजातील दर तिसऱ्या कुटुंबातील एक सदस्य शिक्षण किंवा रोजगारासाठी परदेशी स्थायिक झालेला आढळून येईल. असे असले तरी या अनिवासी वसईकर ख्रिश्चनांनी आपल्या मायभूमीशी आणि आपल्या संस्कृतीशी असलेले आपले नाते जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे, करीत आहेत.

          परदेशी स्थायिक झालेले वसईकर ख्रिश्चन दरवर्षी नेमाने ख्रिसमसच्या सुट्टी-साठी वसईला येतात. त्यांच्या नात्यागोत्यातील लग्नकार्ये, साखरपुडे, नवीन घरांचे आशीर्वादविधी इत्यादी शुभकार्ये याच काळात योजिले जातात. याच काळात आयोजित केल्या जात असलेल्या कुपारी महोत्सवात मांडलेले पारंपरिक खाद्य-पदार्थ, कपडे, जुन्या काळातील जनजीवनाशी संबंधित देखावे, अस्तंगत होत असलेल्या घरगुती आणि शेतीविषयक वस्तूंचे प्रदर्शन इत्यादीद्वारे परदेशस्थ वसईकरांच्या पुढील पिढीला आपल्या नातेवाईकांची, गावकऱ्यांची, समाजाची, रितीभातींची आणि एकंदर संस्कृतीची ओळख होते. वसईहून पुन्हा आपल्या देशात जाताना ह्या कुटुंबाच्या बॅगा वसईतील कुटुंबाने दिलेल्या पारंपरिक मसाल्यांनी, सुक्या मासळीने, पारंपरिक पक्वान्नांनी, घरगुती लोणचे, सुकेळी, चिकन भुजिंग, गावठी वाल पापडीचे गोळे (दाणे) सारख्या वसईच्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांनी भरलेल्या असतात. बॅगेत भरून नेलेले हे वसईचे खाद्यपदार्थ आपल्या गावच्या आठवणींच्या स्मरणरंजनासह वर्षभर पुरवून पुरवून खाल्ले जातात आणि परदेशातच जन्म झालेल्या नवीन पिढीपर्यंत वसईची कुपारी खाद्यसंस्कृती झिरपत राहते.

          भाषा ही संस्कृतीची वाहक असल्याने संस्कृती टिकवायची असेल रोजच्या व्यवहारात ती भाषा वापरत राहणे आवश्यक आहे. व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या विविध भाषा मुलांना घराबाहेर आणि शाळा-कॉलेजात शिकता येतील.  पण आपली बोलीभाषा त्यांना केवळ आपणच शिकवू शकतो याची सार्थ जाणीव बहुसंख्य परदेशस्थ वसईकरांना आहे. वसईच्या कुपारी समाजाची कादोडी (सामवेदी) बोली-भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून घरात आपापसात बोलताना आणि आपल्या मुलांशी बोलताना हे परदेशस्थ कुटुंब सामवेदी बोलीभाषा म्हणजेच कादोडीचा वापर करतात. वसईत होणाऱ्या कादोडी भाषेतील सांस्कृतिक कार्यक्रमांचे, लोकगीतांचे ऑडिओ-व्हिडीओ परदेशस्थ वसईकरांकडून सहकुटुंब पाहिले जातात. सोशल मीडियावर लिहिल्या जाणाऱ्या कादोडी भाषेतील पोस्ट्स आणि प्रसंगोपात प्रकाशित होणाऱ्या बोलीभाषेतील ऑनलाईन नियतकालिकांचे सहकुटुंब सार्वजनिक वाचन केले जाते. 

         वसईकर कुपारी समाज हा हाडाचा शेतकरी असल्याने परदेशी स्थायिक झालेले कित्येक जण आपल्या परसदारी छोट्या-मोठ्या फळभाज्या, फुलभाज्या पिकवून आपल्यातल्या शेतकरीपणाला खतपाणी घालत असतात. विविध सणसमारंभा निमित्त परदेशात होणाऱ्या स्नेह-संमेलनात कादोडी बोलीभाषेत कार्यक्रम सादर करून, कुपारी वेशभूषा करून, जेवणासाठी वसईचे पारंपरिक पदार्थ बनवून अनेक NRV (Non-Resident Vasaikars) आपल्यातील वसईकर डीएनए जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. सोशल मीडियाच्या आगमनामुळे विविध ग्रुपवर सक्रिय राहून हे NRV आपल्या मातृभूमीच्या संपर्कात राहतात. विविध विषयावर जाहीरपणे व्यक्त होत राहतात. इथल्या लोकांच्या सुखात व्हर्च्युअली सामील होतात. वसईत आणि भारतात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आर्थिक मदतीचा हात पुढे करतात.

          “वसुधैव कुटुंबकम” या सनातन धार्मिक मुल्याप्रमाणे संपूर्ण जगालाच आपलं कुटुंब मानून परदेशी गेलेल्या बांधवांबद्दल अभिमान बाळगायचा की भारता-तील संसाधने वापरून मोठे झालेले लोक परदेशी गेल्यामुळे (Brain Drain) आपल्या मायभूमीच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल खेद करावा हे ज्याच्या त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असले तरी यातील कुणीही आपल्या मातृभूमीला विसरलेले नाहीत ही बाब आश्वासक आहे. आपल्या गावाची, आपल्या देशाच्या मातीची ओढ आणि ओल त्यांनी आपल्या काळजात जपली आहे. आपली माणसं जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी सोबत आपली संस्कृती घेऊन जातात. तिथल्या समाज जीवनात समरस झाल्यावरही आपल्या संस्कृतीचं वेगळेपण जपतात. संस्कृतीच्या विविध घटकांतील जे जे शाश्वत ते ते काळाच्या कसोटीवर टिकेल आणि जे तकलादू ते काळाच्या ओघात नष्ट होईल हा निसर्गाचा न्याय आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आपला गाव, आपली माती, आपला देश सोडून परदेशी जाते तेव्हा आपल्या संस्कृतीचा क्षय होत नसून तिची एक नवी शाखा उघडत असते असा सकारात्मक विचार करणेच समयोचित ठरेल.