अखंडित तेवत राहू दे दीप श्रद्धेचा !
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो
९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
मालाड येथील शाळेतील शिक्षिका जीनल फर्नांडिस यांचा अलिकडेच लिफ्टमध्ये अडकून अकस्मात मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेविषयी व सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवून या जगाचा अकाली निरोप घेतलेल्या तरुण शिक्षिकेविषयी फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केलेल्या शोकभावना…
प्रिय जिनल, शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी तुझे अपघाती निधन झाले आणि सगळा समाज शोकसागरात बुडाला. तुझे वय अवघे २६ वर्षांचे. अलीकडेच तुझे शुभमंगल झाले. तुझ्या अंगावरची हळद अजूनही उतरली नव्हती. तुझा फोटो पाहिला. तू लग्नानंतर केलेला तो साजशृंगार होता. चेहरा पवित्र तारुण्याने मुसमुसलेला. तुझ्या नजरेमध्ये वेगळीच चमक. ते सांगत होते, ‘आम्हांला हे सुंदर जग पाहायचे आहे. माझ्या सद्हदांना हे प्रेम वाटून द्यायचे आहे…’ किती किती स्वप्ने तुझ्या काळजामध्ये दडलेली. आपल्या जीवनसाथीला तू ती सगळी शेअर केलेली असतील. तसे म्हटले तर ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे…’ तू हे जग कायमचे सोडून गेल्याची बातमी कानावर पडली, तेव्हा क्षणभर काळजाचा ठोका चुकला, डोळे ओलसर झाले. मी विचार करतो, तुझे माझे ना नातेगोते, ना आपली ओळखदेख. मग का चुकावा हा काळजाचा ठोका ? का व्हावेत डोळे ओले ? कारण आपले नाते माणुसकीचे आहे. माणूस म्हणून आपण एकमेकांशी गुंतलेले आहोत.
लग्नाच्या दिवशी सासरी निघतेवेळी तू आपल्या आईला मनोमन भेटलीस. तो लग्नाचा दिवस किती आनंदाचा, परंतु सासरी निघताना तुम्ही दोघीही व्यथित झालात. गळ्यात गळा घालून मनसोक्त रडलात. आपल्या सामवेदी बोलीभाषेमध्ये एक गीत आहे,
‘दुये सासऱ्या जातेवेळी
तुये डोळे पाण्याने भरले
तुई आय गळ्या दरी
तुला निरोप देते’
तू सासरी निघालीस, वेशीवरचं तोरण तोडलं गेलं आणि एक नवं नातं जोडलं गेलं तुझं. तू शिक्षिका, दररोज सकाळी लवकर उठून लोकलचा खडतर प्रवास करून मुंबईच्या मालाड येथील शाळेत तू पोहचायची. त्या दिवशी वर्ग संपवून झटपट निघालीस. तुला ठरलेली लोकल गाठायची होती. तू लिफ्टमध्ये चढलीस, काहीतरी बिघडले आणि मृत्यूने तुझा घास घेतला. असे हे अघटित का घडावे ? काही समजत नाही. आपण ते स्वीकारायचे असते. (या अपघाताची पोलिस कसून चौकशी करतीलच.)
तुझे पार्थिव सजविण्यात आले. तुझा तो अचेतन तरी चैतन्यशाली वाटणारा देह शवपेटीमध्ये विसावला होता. तुझी अंत्ययात्रा चर्चकडे निघाली…. जणू स्वर्गाच्या प्रवासाला निघाली. तुझा जीवनसाथी भरल्या डोळ्याने तुझ्याबरोबर चालत होता. त्याच्या काळजात दुःखाचा डोंगर आणि डोळ्यात अनिबंध अश्रूधारा… आकाशातील विजेचा लोळ कोसळावा आणि माडाचे झाड उभे चिरावे तशी त्याची अवस्था झाली होती. तरी तो धिम्या पावलाने तिच्यासोबत विश्रामभूमीकडे निघाला होता… कुठपर्यंत? आपला प्रवास तिथपर्यंतच. त्यानंतर आपल्याला मागे फिरावेच लागते. त्याच्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. तो खाली मान घालून बेसमेनसोबत घरी निघाला. आता तिची सोबत नव्हती… त्याला घर सुनेसुने वाटत होते. जणू खायला येत होते. बेडरूममध्ये शिरावसं वाटत नव्हतं.
मला आठवतात, आपले लाडके तुकोबा महाराज आणि त्यांचा तो गाजलेला अभंग.
कन्या सासुरासी जाय
मागे परतुनि पाहे
तैसे झाले माझ्या जिवा
केव्हा भेटसी केशवा !
तू नव्या सासरी निघालीस. तुझ्या स्वर्गीय पित्याला भेटण्यासाठी…
आपण या जगात येतो आणि एक दिवस जगाचा निरोप घेतो. पान पूर्ण पिकले आणि अवचित वाऱ्याची झुळूक आली आणि ते पान हळूच गळाले तर तो निसर्गक्रम असतो. तुझ्या बाबतीत मात्र निसर्गाने खूप घाई केली. तुझ्या आप्तस्वकियांना शोकसागरात ढकलून तू निघालीस.
आम्हांलाही एक दिवस ह्या जगातून निघायचे आहे. कुठले वर्ष, कुठला महिना, कुठला दिवस, कुठली घटिका, कुठले स्थळ माहीत नाही. श्रद्धेने त्या दिवसाची वाट पाहणे आपल्या हाती आहे. ती वेळ येईल तेव्हा परमेश्वराला सांगायचे, ‘तुझ्या हाती मी माझा आत्मा सोपवितो/ते.’
अकाली मृत्यू पाहिल्यानंतर आपली श्रद्धा कधी कधी डळमळते. त्यावेळी मला आठवण होते, बायबलमधील तरुण लाझरसच्या दुःखद मृत्यूची. प्रभू येशू बेथनीला आले, तेव्हा मार्था घरातून धावत निघाली आणि येशूंना भेटली. ती दुःखाने विव्हळत होती. येशू लाझरसचा मृत्यू का नाही थोपवू शकला ? येशूने तिला म्हटले, ‘पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.’ तरुण भाऊ कबरेत आणि बहीण रिकामी रिकामी. प्रभूने तिला सांगितले, ‘देह नश्वर असला, मृत्यू अटळ असला तरी श्रद्धा अमर आहे.’ अखंडित तेवत राहू दे दीप तुझा श्रद्धेचा!
‘जिनल, तू आता आमच्या अवतीभोवती… आठवणीच्या रूपाने ! तरी तू आता या जगात नाहीस. तुझं सुकुमार, अंतर्बाह्य निर्मळ मन येशूला आवडलं. त्याने तुला जवळ केलं. तू आता त्याच्या सहवासात… त्याच्या अगदी जवळ ! तुझ्या जवळच्यांसाठी निरंतर प्रार्थना करीत राहशील… ही आमची श्रद्धा, आमचा आधार, आमचं सांत्वन !’